कोल्हापूर : ‘भाजप’च्या मुंबई मेळाव्यासाठी कोल्हापुरातून कार्यकर्ते रवाना, विशेष रेल्वेची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 07:11 PM2018-04-05T19:11:19+5:302018-04-05T19:11:19+5:30
भाजपच्या ३८ व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबई येथे होणाऱ्या महामेळाव्यासाठी कोल्हापुरातून सुमारे दहा हजार कार्यकर्ते गुरुवारी रवाना झाले. त्यासाठी पक्षातर्फे कोल्हापूरमधून दोन आणि मिरज येथून एका विशेष रेल्वेची सुविधा केली होती.
कोल्हापूर : भाजपच्या ३८ व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबई येथे होणाऱ्या महामेळाव्यासाठी कोल्हापुरातून सुमारे दहा हजार कार्यकर्ते गुरुवारी रवाना झाले. त्यासाठी पक्षातर्फे कोल्हापूरमधून दोन आणि मिरज येथून एका विशेष रेल्वेची सुविधा केली होती.
या वर्धापनदिनानिमित्त मुंबईतील बीकेसी मैदानावर महामेळावा आज, शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता होणार आहे. यासाठी गुरुवारी दुपारी सव्वा दोन वाजता आणि साडेचार वाजता कोल्हापुरातील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्स येथून दोन विशेष रेल्वेतून कार्यकर्ते रवाना झाले. रेल्वे स्थानकावर दुपारी बारा वाजल्यापासून कार्यकर्त्यांची गर्दी होऊ लागली. तासभरात रेल्वे आणि स्थानकाचा परिसर त्यांच्या गर्दीने फुुलला.
पक्षाच्या विजयाच्या घोषणांनी स्थानक परिसर दुमदुमून गेला. कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसून आला. कार्यकर्त्यांना रेल्वेतून रवाना करण्यासाठी येथे आमदार अमल महाडिक, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, जिल्हा संघटन मंत्री बाबा देसाई, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, नगरसेवक किरण नकाते, हेमंत आराध्ये, वैशाली पसारे, प्रभा इनामदार, सुलभा मुजुमदार, किशोरी स्वामी, सुरेश जरग, आदी उपस्थित होते.
दरम्यान, याबाबत देवस्थान समितीचे अध्यक्ष जाधव यांनी सांगितले की, मुंबईतील या महामेळाव्यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मार्गदर्शन करणार आहेत. कोल्हापुरातून या मेळाव्यासाठी सुमारे दहा हजार कार्यकर्ते रवाना झाले आहेत. या महिला कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय आहे. रेल्वे रवाना झालेल्या कार्यकर्त्यांना अल्पोपहार, पाण्याची सुविधा पक्षाने केली आहे. विशेष रेल्वेचे भाडेदेखील भरले आहे.
रेल्वे विभागाकडून ‘डेमू’ची चाचणी
भाजपच्या महामेळाव्यासाठी कोल्हापूर आणि मिरज येथून रवाना होणाऱ्या रेल्वे यांना अतिरिक्त डब्यांची गरज होती. त्यासाठी मध्य रेल्वे विभागाने सोलापूरहून दोन डीजेल मल्टिपल युनिट (डेमू) कोल्हापूर आणि मिरज येथे तात्पुरत्या स्वरूपात आणल्या. याद्वारे कोल्हापूर-मिरज शटल सर्व्हिस सुरू करण्याच्या अनुषंगाने ‘डेमू’ची चाचणीदेखील घेण्यात आली, असे स्टेशन प्रबंधक विजय कुमार यांनी सांगितले.
ते म्हणाले, कोल्हापूरसाठी तीन ‘डेमू’ मंजूर झाल्या आहेत. मात्र, त्यांच्या देखभाल-दुुरूस्ती आणि चालकांला प्रशिक्षण देण्याची सुविधा कोल्हापुरात उपलब्ध नाही. या सुविधेसाठी ६ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
कोल्हापूर-मिरज या मार्गावर शटल सर्व्हिसच्या माध्यमातून ‘डेमू’ धावण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागणार आहे. दरम्यान, याबाबत पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी सांगितले की, ‘डेमू’तील दोन रेल्वे या बारा आणि एक पंधरा बोगींची आहे. या रेल्वेमुळे कोल्हापूरकरांची गेल्या अनेक वर्षांपासूनची असलेली कोल्हापूर-मिरज मार्गावरील शटल सर्व्हिसची मागणी पूर्ण होणार आहे.