कोल्हापूर : ‘सावली’तील कार्यशाळेने झाली ‘पांढऱ्या काठी’शी मैत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 12:47 PM2018-10-27T12:47:45+5:302018-10-27T12:52:08+5:30
कोल्हापूर येथील ‘सावली केअर सेंटर’मध्ये आयोजित करण्यात आलेल्या अंध व्यक्तींसाठीच्या कार्यशाळेचा तीन जिल्ह्यांतील १९ अंधांनी लाभ घेतला. दोन दिवसांची ही कार्यशाळा पार पडली.
कोल्हापूर : येथील ‘सावली केअर सेंटर’मध्ये आयोजित करण्यात आलेल्या अंध व्यक्तींसाठीच्या कार्यशाळेचा तीन जिल्ह्यांतील १९ अंधांनी लाभ घेतला. दोन दिवसांची ही कार्यशाळा पार पडली.
रोटरी क्लब आॅफ मिडटाऊन, कोल्हापूर यांच्या सहकार्याने ही कार्यशाळा घेण्यात आली. सांगली, कोल्हापूर, सावंतवाडी, पुणे येथील अंध व्यक्तींनी यात सहभाग घेतला. रोटरी क्लब आॅफ मिडटाउनचे अध्यक्ष निशिकांत सरनाईक, खजानिस सचिन लाड, स्वयंसेवक शैला आठल्ये, अनुजा नेटके, ‘सावली’चे विश्वस्त किशोर देशपांडे, सोनाली नवांगुळ, अंधशाळेचे शिक्षक बी. आर. पाटील, वेदिका फडके यांची कार्यक्रमास उपस्थिती होती.
या प्रशिक्षणात पांढऱ्या काठीच्या साहाय्याने रस्त्यातील अडथळे शोधणे, पायऱ्या व खडकाळ भाग शोधून कुणाच्याही मदतीशिवाय नीट चालता येणे, रस्त्यावरचे आवाज, वास घेत-ऐकत आवश्यक त्या ठिकाणच्या खुणा मनात नोंदवीत समाजात मिसळणे, धान्ये-कडधान्ये, भाजीपाला ओळखू शकणे, नोटा व नाणी ओळखता येणे अशा अनेक गोष्टी शिकवून त्यांचा सराव घेतला गेला.
अंध व्यक्तींसाठीच्या कार्यात गेली तीस वर्षे समर्पित असणारे कार्यशाळेचे मुख्य प्रशिक्षक स्वागत थोरात म्हणाले, २०२० पर्यंत अधिकाधिक अंध व्यक्तींनी संगणकाचे ज्ञान घेऊन आपल्या परीक्षा रायटरशिवाय द्याव्यात व अधिक सक्षम व्हावे.
समारोपावेळी निशिकांत सरनाईक म्हणाले, सामाजिक कामांमध्ये ‘रोटरी’चा नेहमीच पुढाकार असतो व भविष्यातही ‘सावली’ने अशा प्रकारची शिबिरे घेऊन अधिकाधिक बांधवांना स्वावलंबी बनवावे. विविध आजारांमुळे अथवा अपघातांमुळे प्रौढ वयात अचानक अंधत्व आलेल्या व्यक्तींसाठी लवकरच स्वागत थोरात व ‘रोटरी’च्या मदतीने आम्ही नवे शिबिर जाहीर करीत आहोत, असे किशोर देशपांडे यांनी सांगून आभार मानले.
माझ्या शाळेत स्पेशल शिक्षक होते; पण पांढरी काठी कशी वापरायची आणि तिच्या आधारे स्वत: अडथळ्यांचे रस्ते कसे पार करायचे, लिफ्ट कशी वापरायची, हे कधीच शिकवलं गेलं नाही. प्रशिक्षक स्वागत थोरात यांनी घेतलेल्या या मोबिलिटी प्रशिक्षणात जे शिकलो, ते कौशल्य वापरून मी अधिक आत्मविश्वासाने पुण्याला परततो आहे.
- विश्वनाथ नवले
(मूळ सांगोला, जि. सोलापूर, सध्या पुणे येथे बॅँक आॅफ इंडियामध्ये कार्यरत)