कोल्हापूर : यंदाच्या फुटबॉल हंगामास २४ पासून प्रारंभ, के.एस.ए.लीग स्पर्धेने सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 04:07 PM2018-11-13T16:07:10+5:302018-11-13T16:08:56+5:30
कोल्हापूरच्या फुटबॉल पंढरीतील फुटबॉल हंगामाची सुरूवात शनिवारी (दि. २४) पासून के.एस.ए.लीग फुटबॉल स्पर्धेने होत आहे. यात हंगामाचा किक आॅफ संध्यामठ तरूण मंडळ व ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ यांच्यातील लढतीने होणार आहे.
कोल्हापूर : कोल्हापूरच्याफुटबॉल पंढरीतील फुटबॉल हंगामाची सुरूवात शनिवारी (दि. २४) पासून के.एस.ए.लीग फुटबॉल स्पर्धेने होत आहे. यात हंगामाचा किक आॅफ संध्यामठ तरूण मंडळ व ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ यांच्यातील लढतीने होणार आहे.
शाहू स्टेडीयमवर सुरू होणाऱ्या या हंगामाची सुरूवात के.एस.ए. लीग स्पर्धेने होणार आहे. यात सुपर सिनिअर गटात ८, तर सिनिअर गटात ९ संघ असे एकूण १७ संघांचा समावेश आहे. यात पाटाकडील (अ)व (ब), शिवाजी तरूण मंडळ, प्रॅक्टिस फुटबॉल क्लब (अ) व (ब), बालगोपाल तालीम मंडळ,खंडोबा तालीम मंडळ (अ), दिलबहार तालीम मंडळ (अ) व (ब), कोल्हापूर पोलीस संघ, मंगळवार पेठ फुटबॉल संघ, फुलेवाडी क्रीडा मंडळ, ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ, संयुक्त जुना बुधवार तालीम मंडळ, उत्तरेश्वर प्रासादीक वाघाची तालीम मंडळ, संध्यामठ तरूण मंडळ, साईनाथ स्पोर्टस, यांचा समावेश आहे.
सर्व संघांनी वरचे स्थान पटकाविण्यासाठी कंबर कसली आहे. विशेषत: संघाना फिटनेसचे महत्व पटवून देण्यासाठी खास फिजीकल ट्रेनरही काही संघांनी नियुक्त केले आहेत. त्यामुळे आघाडीच्या खेळाडूंना ४०-४० मिनिटांच्या सत्रात संपूर्ण वेळ खेळण्यासाठी विशेष तयार केले जात आहे. त्यादृष्टीने त्यांच्याकडून कसून सराव करून घेतला जात आहे. मागील वर्षी के.एस.ए. लीग स्पर्धेत १५ संघ व ४९ सामने झाले होते. यंदा मात्र, १७ संघ व ६४ सामने होणार आहेत.
हंगामाची सुरूवात के.एस.ए.लीग स्पर्धेने २४ नोव्हेंबरपासून होत आहे. हंगामाची सुरूवात संध्यामठ तरूण मंडळ व ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ यांच्यात दुपारी दोन वाजता होणाऱ्या सामन्याने होणार आहे. तर त्याच दिवशी दुपारी चार वाजता पाटाकडील तालीम मंडळ (अ) व संयुक्त जुना बुधवार तालीम मंडळ यांच्यातही दुसरा सामना होणार आहे. हंगामाची सुरूवात दमदार संघातील लढतीने होणार आहे. त्यामुळे या पहिल्या सामन्यांबद्दल आतापासूनच फुटबॉल रसिकांना उत्सुकता लागून राहीली आहे.
यांच्या कामगिरीकडे विशेष लक्ष
काही संघांनी प्रतिमहिना १० ते ६५ हजारांपर्यंतचा मेहनताना देवून १३ आंतरराष्ट्रीय, तर २० राष्ट्रीय आणि ११ राज्यस्तरीय फुटबॉलपटूंना आपल्या संघातून स्थान दिले आहे. त्यामुळे पेठांपेठांतील फुटबॉल समर्थकांचे या खेळाडूंच्या खेळीकडे विशेष लक्ष लागून राहीले आहे.