"मला आता सहन होईना"'; एकाच गावातील तरुण-तरुणीची एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 10:03 AM2021-02-17T10:03:14+5:302021-02-17T10:03:32+5:30
Kolhapur Girl And Boy Commits Suicide: एकाच गावातील तरुण-तरुणीनं एकाच दिवशी संपवलं जीवन; गावात हळहळ व्यक्त; तरुणीनं आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी
कोल्हापूर : कोल्हापुरात एकाच गावातील दोघांनी एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कोल्हापुराजवळील चुये गावातील तरुण-तरुणीनं एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या करून जीवन संपवलं. तरुणानं त्याच्या राहत्या घरी तर तरुणीनं पाचगाव येथे नातेवाईकाच्या घरी आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे (Girl And Boy Commits Suicide).
तरुणाने आपल्या राहत्या घरी मंगळवारी दुपारी, तर तरुणीनं पाचगाव येथे नातेवाईकाच्या घरी विष पिऊन आत्महत्या केली. अनिकेत पाटील असं तरुणाचं, तर सानिका व्हनाळकर असं तरुणीच नाव आहे. दोघांनाही उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दोघांनी एकाच दिवशी आत्महत्या केल्यानं गावात चर्चेला उधाण आलं आहे.
प्रेमाला विरोध झाल्यानं दोघांनी टोकाचं पाऊल उचललं असावं, अशी चर्चा गावात सुरू आहे. पण तरुणीने लिहिलेल्या चिठ्ठीत लग्नासाठी कर्ज व्हायला नको, यासाठी आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे. 'मामी, मामा, आई, मम्मी मी हे पाऊल उचलत आहे. कारण माझ्यामुळे मम्मीला त्रास नको. माझ्या लग्नाचं कर्ज व्हायला नको तिच्या डोक्यावर. पप्पा असे वागतात. मला आता सहन होईना झालंय. सोन्याचं आणि नयनचं आयुष्य व्यवस्थित करा. यात मामींना दोष देऊ नका, त्यांना यातलं काहीही माहित आणि जमलं तर माफ करा मला… तुमची सानिका', असा मजकूर आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आहे.
मृत अनिकेत पाटील हा बीएससीचं शिक्षण घेत होता. काल दुपारी तो महाविद्यालयातून घरी आला, त्यानंतर त्यानं विषारी औषध प्राशन केलं. तर सानिकाचा विवाह ठरला होता. त्यामुळे ती पाचगाव परिसरात वास्तव्यास असलेल्या तिच्या नातेवाईकांकडे राहण्यासाठी गेली होती. इथेच तिने विषारी औषध प्राशन केलं. गावातील तरुण तरुणीचा एकाच वेळी असा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे.