कोल्हापूर : युवतीने लगावली तरुणाच्या कानशिलात, मोपेडला धक्का देऊन पळून जाण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 07:15 PM2018-03-13T19:15:01+5:302018-03-13T19:15:01+5:30
भरधाव वेगात मोपेडला धक्का मारून गेलेल्या तरुणाचा एक किलोमीटर पाठलाग करून तरुणीने भररस्त्यावर तरुणाच्या कानशिलात लगावल्या. मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास मिरजकर तिकटी येथे घडलेला हा प्रकार येथील एका दुकानाच्या समोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाला आहे. या धक्कादायक प्रकाराने शहरातील युवतींची सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.
कोल्हापूर : भरधाव वेगात मोपेडला धक्का मारून गेलेल्या तरुणाचा एक किलोमीटर पाठलाग करून तरुणीने भररस्त्यावर तरुणाच्या कानशिलात लगावल्या. मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास मिरजकर तिकटी येथे घडलेला हा प्रकार येथील एका दुकानाच्या समोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाला आहे. या धक्कादायक प्रकाराने शहरातील युवतींची सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.
शहरात युवती-महिलांच्या छेडछाडीचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांच्या निर्भया पथकांना शहरात फेरफटका मारून अशा उपद्व्यापी तरूणांचा चांगलाच बंदोबस्त केला आहे. युवतींनी स्वत:चे स्वरक्षण करावे, यासाठी पोलीस दलाच्यावतीने कराटेचे प्रशिक्षणही दिले आहे. शाळा-महाविद्यालयांत कार्यशाळा घेतल्या आहेत.
निर्भया पथकाकडून कारवाईसत्र सुरू असतानाही काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांवर फरक पडलेला दिसत नाही. मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास संभाजीनगरहून २२ वर्षांची युवती मोपेडवरून शहरात येत होती. पाण्याचा खजिना येथे तिच्या मोपेडला पाठीमागून दुचाकीवरून भरधाव आलेल्या तरुणाने धक्का देत पुढे निघून गेला. यावेळी युवतीने ‘दाद्या थांब,’ अशी हाक दिली. मात्र, तो सुसाट निघून गेला.
युवतीनेही हिम्मत सोडली नाही. त्याचा सुमारे एक किलोमीटर थरारक पाठलाग करून मिरजकर तिकटी परिसरात त्याच्या आडवी दुचाकी लावून त्याला थांबविले. खाली उतरून तीन-चार कानशिलात लगावल्या. भर रस्त्यावर युवती तरुणाला मारहाण करत असल्याचे पाहून नागरिकांनी गर्दी केली.
या घटनेची माहिती समजताच जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे दोन कॉन्स्टेबल घटनास्थळी आले. त्यांनी तरुणाला दुचाकीसह ताब्यात घेतले. युवतीने या प्रकरणी तक्रार न दिल्याने गुन्हा दाखल झाला नाही. हा प्रकार येथील एका दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाला आहे. तो सर्वत्र व्हायरल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली.