कोल्हापूर : पंचगंगा पुलावरून उडी मारून तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 07:59 PM2018-04-18T19:59:47+5:302018-04-18T19:59:47+5:30
शिरोली येथील पंचगंगा नदी पुलावरून उडी मारून तरुणाने आत्महत्या केली. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्याबाहेर काढला.
कोल्हापूर : शिरोली येथील पंचगंगा नदी पुलावरून उडी मारून तरुणाने आत्महत्या केली. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्याबाहेर काढला.
बाबूराव नवनाथ भोसले (वय ३५, रा. सावंत गल्ली, पुलाची शिरोली, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. तो व्यसनाच्या आहारी गेला होता. दारू पिऊन त्याने जीवनयात्रा संपविल्याची चर्चा गावात होती. बुधवारी दुपारी ही घटना घडली. यावेळी पुलावर बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.
अधिक माहिती अशी, बाबूराव भोसले हा कामधंदा करत नव्हता. तो दारूच्या आहारी गेला होता. नेहमी दारू पिवून असे. बुधवारी दुपारी दारूच्या नशेत त्याने शिरोली पंचगंगा नदी पुलावरून पाण्यात उडी मारली.
या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी पुलावर गर्दी केली. भोसले याची पाण्यात हात-पाय हलवत जीव वाचविण्याची धडपड सुरू असताना पुलावरून लोक पाहत होते. काहींनी त्याचे मोबाईलमध्ये व्हीडीओ चित्रीकरणही केले. मात्र, त्याला वाचविण्यासाठी कोणी पुढे सरसावले नाही किंवा प्रयत्न केले नाही.
लोकांच्या डोळ्यांसमोर तो पाण्यात बुडाला. या प्रकाराची वर्दी मिळताच महापालिका अग्निशामक दलाचे जवान नवनाथ साबळे, रवींद्र ठोंबरे, माणिक कुंभार यांनी घटनास्थळी धाव घेत गळाच्या सहाय्याने शोध घेत भोसले याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला.
त्यानंतर तो सीपीआरला शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.