दुचाकी अपघातात कोल्हापूरच्या युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:25 AM2021-03-16T04:25:58+5:302021-03-16T04:25:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क निपाणी : कोल्हापूरहून गडहिंग्लजच्या दिशेने जात असलेल्या दुचाकीवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात युवकाचा जागीच मृत्यू झाला. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
निपाणी : कोल्हापूरहून गडहिंग्लजच्या दिशेने जात असलेल्या दुचाकीवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात युवकाचा जागीच मृत्यू झाला. गणेश ज्ञानदेव पवार (वय २२) असे मृत युवकाचे नाव आहे. अनुराग मनोज बागडेकर (वय २३) हा गंभीर जखमी झाला आहे. तवंदी घाटाच्या पायथ्याशी असलेल्या चिंधी पीर नजीक सोमवारी दुपारी ४च्या सुमारास हा अपघात झाला.
या घटनेची अधिक माहिती अशी की, कोल्हापुरातील सुभाषनगर येथील गणेश व अनुराग हे दोघे दुचाकी घेऊन गडहिंग्लजच्या दिशेने निघाले होते. तवंदी घाटाच्या पायथ्याशी असलेल्या चिंधीपीर नजीक आले असता अनुराग याचा गाडीवरील ताबा सुटल्याने त्याने महामार्गाच्या बाजूला असलेल्या संरक्षक खांबांना जोराची धडक दिली. या धडकेत अनुराग गंभीर जखमी झाला, तर गणेश याचा जागीच मृत्यू झाला.
गणेश याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. धडक इतकी जोरात होती की दोन खांबांचे नुकसान झाले असून, दुचाकी उलटी होऊन पडली होती.
घटनेची माहिती मिळताच निपाणी शहर पोलीस स्थानकाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जखमी अनुराग याला रुग्णवाहिकेतून गडहिंग्लज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर मृत गणेश याचा मृतदेह महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आला. शवविच्छेदन करून मृतदेह रात्री कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.
फोटो :
निपाणी : अपघात झाल्यानंतर दुचाकी उलटी होऊन पडली होती.