कोल्हापूर : युवा मल्ल ‘नीलेश’ची प्रकृती गंभीरच, कऱ्हाडच्या ‘कृष्णा’मध्ये दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 06:37 PM2018-04-04T18:37:46+5:302018-04-04T18:37:46+5:30
बांदिवडे (ता. शाहूवाडी) येथे तीन दिवसांपूर्वी कुस्ती खेळताना मानेवर पडून गंभीर जखमी झालेला मल्ल नीलेश विठ्ठल कंदूरकर (रा. बांदेवाडी) याची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्याला मुंबईला हलविण्याचा निर्णय नातेवाइकांनी घेतला. दरम्यान, कऱ्हाडपर्यंत गेल्यानंतर नीलेशची प्रकृती आणखीच बिघडल्यामुळे त्याला कऱ्हाडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये मंगळवारी दुपारी दाखल करण्यात आले आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकमत आॅनलाईन’ने सोमवारी (दि. २) सायंकाळी प्रसिद्ध केले होते.
कोल्हापूर : बांदिवडे (ता. शाहूवाडी) येथे तीन दिवसांपूर्वी कुस्ती खेळताना मानेवर पडून गंभीर जखमी झालेला मल्ल नीलेश विठ्ठल कंदूरकर (रा. बांदेवाडी) याची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्याला मुंबईला हलविण्याचा निर्णय नातेवाइकांनी घेतला. दरम्यान, कऱ्हाडपर्यंत गेल्यानंतर नीलेशची प्रकृती आणखीच बिघडल्यामुळे त्याला कऱ्हाडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये मंगळवारी दुपारी दाखल करण्यात आले आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकमत आॅनलाईन’ने सोमवारी (दि. २) सायंकाळी प्रसिद्ध केले होते.
अवघ्या १९ वर्षांच्या नीलेशचे कुस्तीवर अपार प्रेम आहे. त्यामुळे माजी कुस्तीगीर असलेले वडील विठ्ठल कंदूरकर यांनी त्याला वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे कुस्ती संकुलात कुस्तीचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेण्यासाठी घातले. भारदस्त शरीरयष्टीचा असलेला नीलेश मनमिळावू व नम्र स्वभावाचा आहे.
तीन दिवसांपूर्वी बांदेवाडी येथे एका मैदानात प्रतिस्पर्धी मल्लाने एकचाक डाव टाकताना नीलेश मानेवर पडला. त्यात त्याच्या मणक्यांना जबर मार लागला. त्यामुळे नीलेशच्या शरीराची हालचाल पूर्णपणे मंदावली. त्याला शाहूपुरी येथील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्याच्या प्रकृतीत काहीच फरक पडत नसल्याने नातेवाइकांसह सर्वजण चिंतेत होते.
मुंबईत होणारा खर्च कंदूरकर कुटुंबीयांना न परवडणारा होता. त्याच्या कुटुंबीयांवर आकाश कोसळल्याने काय करावे हे त्यांना सुचत नव्हते. पुढील उपचारासाठी मुंबईला हलविण्यासाठी आर्थिक मदतीचे पाठबळ आवश्यक होते.
दरम्यान, सोमवारी सायंकाळी ‘लोकमत आॅनलाईन’ला याबाबत सविस्तर बातमी प्रसिद्ध झाली. त्याची दखल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली. त्यानुसार त्यांनी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस विजय जाधव यांना हॉस्पिटलमध्ये पाठविले.
तेथे नातेवाइकांशी झालेल्या चर्चेनंतर नीलेशला अधिक उपचारांसाठी मुंबईतील के.ई.एम. रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मंगळवारी दुपारी त्याला मुंबईला हलविण्यात आले. दरम्यान, कºहाड येथे पोहोचपर्यंत त्याची प्रकृती आणखी बिघडली. त्यामुळे कºहाड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आले.
कृष्णा हॉस्पिटलमध्ये नीलेशवर उपचार सुरू झाले आहेत. त्याची प्रकृती स्थिरावल्यानंतर येत्या दोन दिवसांत त्याच्यावर येथेच मणक्यावरील शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
-संदीप पाटील,
प्रशिक्षक, वारणा कुस्ती केंद्र