कोल्हापुरातील बेपत्ता अल्पवयीन मुलीसह युवक पोलिसांच्या ताब्यात, कर्नाटकातून घेतलं ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 11:38 AM2022-11-03T11:38:46+5:302022-11-03T11:39:13+5:30
भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांनीही बुधवारी आंदोलन करीत संशयित का सापडत नाही, असा जाब पोलिसांना विचारला होता.
कोल्हापूर : अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची आठ पथके विविध ठिकाणी रवाना झाली होती. त्यातील स्थानिक गुन्हे अन्वषेण शाखेच्या एका पथकाने संबंधित युवक व मुलीस बुधवारी रात्री संकेश्वर येथून ताब्यात घेतले. तत्पूर्वी दिवसभरात आंदोलन आणि मोठ्या घडामोडी घडल्या, तर संशयित तरुणाच्या जवळच्या नातेवाइकांसह मित्रमंडळींची कसून चौकशी करण्यात आली होती.
याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनीही संशयिताचा माग काढण्यासाठी दोन, तर सायबर पोलिसांसह विशेष शाखेचे प्रत्येकी एक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची चार, अशी एकूण आठ पथके या दोघांच्या शोधासाठी गोवा, कर्नाटक, पुणे, उत्तर प्रदेशात रवाना झाली आहेत. संशयित तरुणाच्या जवळच्या व अन्य नातेवाइकांचीही पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे, तर त्याच्या मित्रांनाही चौकशीसाठी बोलावून घेण्यात आले होते. याप्रकरणी बावीस वर्षीय तरुणावर जुना राजवाडा पोलिसांनी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याचा तपास संथ गतीने सुरू असल्याचा आरोप मुलीच्या नातेवाइकांनी केला आहे.
भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांनीही बुधवारी आंदोलन करीत संशयित का सापडत नाही, असा जाब पोलिसांना विचारला होता. दिवसभरातील वेगवान घडामोडी आणि पोलिसांच्या आठ पथकांपैकी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अल्पवयीन मुलगी व संबंधित संशयित युवकास रात्री ताब्यात घेतले. या दोघांना घेऊन पोलीस मध्यरात्री कोल्हापुरात आले.
दिवसभरात वेगवान घडामोडी
सकाळपासून भाजपासह हिंदुत्ववादी संघटनांनी पोलिसांना विचारलेला जाब आणि त्यानंतर पोलिसांनी आठ पथकांची निर्मिती करून वेगवान हालचाली करीत संबंधित युवक व अल्पवयीन मुलीस रात्री उशिरा ताब्यात घेतले. दिवसभरात संघटनांनी केलेल्या आंदोलनाची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती. त्यानंतर रात्री या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले.