कोल्हापूर : जिल्हा परिषदेत विरोधकांपेक्षा सत्तारूढच आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 11:30 AM2018-05-12T11:30:38+5:302018-05-12T11:30:38+5:30
आराखडा मंजूर करण्यासाठी जी कामे धरली आहेत, ती सदस्यांनाही माहीत नाहीत. असं दडवून काही ठेवू नका. जिल्हा परिषदेचा कारभार पारदर्शी ठेवा, अशा शब्दांत सत्तारूढ भाजपचे गटनेते अरुण इंगवले यांनीच विशेष सभेत घरचा आहेर दिला. शौमिका महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी दुपारी राजर्षी शाहू सभागृहात ही सभा पार पडली. सत्तारूढांनीच नेहमीप्रमाणे आक्रमक भूमिका याही सभेत बजावली.
कोल्हापूर : आराखडा मंजूर करण्यासाठी जी कामे धरली आहेत, ती सदस्यांनाही माहीत नाहीत. असं दडवून काही ठेवू नका. जिल्हा परिषदेचा कारभार पारदर्शी ठेवा, अशा शब्दांत सत्तारूढ भाजपचे गटनेते अरुण इंगवले यांनीच विशेष सभेत घरचा आहेर दिला. शौमिका महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी दुपारी राजर्षी शाहू सभागृहात ही सभा पार पडली. सत्तारूढांनीच नेहमीप्रमाणे आक्रमक भूमिका याही सभेत बजावली.
कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीचा सन २०१८-१९ चा वार्षिक आराखडा मंजूर करण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तुषार बुरुड, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारीअधिकारी राजेंद्र भालेराव, सुषमा देसाई यांच्यावर यावेळी प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली.
शिक्षण सभापती अंबरीश घाटगे यांनी शाळाखोल्या बांधताना निधी कसा दिला जाईल, हे सांगून सहकार्याचे आवाहन केले. यावेळी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, सभापती विशांत महापुरे, शुभांगी शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.
या आराखड्यात बदल करण्याचा अधिकार नसताना सभा घेतलीच कशाला? अशीही विचारणा करण्यात आली. यावेळी आरोग्य, शिक्षण, स्वच्छता व पाणीपुरवठा, ग्रामपंचायत, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सदस्यांनी धारेवर धरले.
या आराखड्यातील बांधकाम विभागाची कामे सदस्यांना माहीत नसल्याबद्दल इंगवले यांनी हल्लाबोल केला. करवीरचे सभापती प्रदीप झांबे्र यांनी इस्पुर्ली प्राथमिक केंद्र बंद असल्याचा मुद्दा उपस्थित करून डेंग्यूचे रुग्ण सापडत असताना दवाखाना बंद का? अशी विचारणा केली.
यावेळी याच ठिकाणी असलेला खासगी दवाखाना मात्र रुग्णांनी भरला होता, असे सांगत सतीश पाटील यांनी हा दवाखाना कुणाचा आहे, अशी विचारणा केली. तेव्हा जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. उषादेवी कुंभार यांनी तो आपल्या मुलाचा आहे, असे सांगून टाकले. मात्र दवाखाना बंद ठेवल्याबद्दल डॉक्टरांना नोटीस काढल्याचे त्यांनी सांगितले. एकीकडे कॉँग्रेसच्या झांब्रे यांनी हा मुद्दा उपस्थित केला असताना दुसरीकडे भाजपच्या संध्याराणी बेडगे यांनी माहिती देत हे प्रकरण सौम्य केले.
शाहूवाडीच्या सभापती डॉ. स्नेहा जाधव यांनी शिक्षकांचा मुद्दा उपस्थित केला, तर प्रसाद खोबरे यांनी सहा शिक्षकांना चुकीचे मेसेज टाकल्याने त्यांचे नुकसान झाल्याचे सांगितले. तेव्हा शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले माहिती देत असताना बांधकाम सभापती सर्जेराव पाटील-पेरीडकर यांनी त्यांना चुकीची माहिती देऊ नका, अधिकाऱ्यांना पाठीशी घालू नका, असे सांगितले. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांनी स्वागत केले. यावेळी गुणवंत पुरस्कार मिळाल्याबद्दल मधुकर अंधारे यांचा सत्कार करण्यात आला.
तुमच्याच आग्रहामुळे पत्र दिले
साजणी आणि कबनूर पाणी योजनेचा विषय सदस्या विजया पाटील यांनी उपस्थित केल्यानंतर लगेचच राहुल आवाडे आणि अरुण इंगवले उभे राहिले. गुन्हा दाखल करण्याबाबत जर-तरची भाषा वापरून पत्र कसे दिले, अशी त्यांनी मोठ्या आवाजात विचारणा इंगवले यांनी केली. तेव्हा तुमच्याच आग्रहामुळे हे पत्र दिल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई यांनी सांगितले. तेव्हा ‘आता तुमचीच चौकशी करावी लागेल,’ असा इशारा इंगवले यांनी देसाई यांना दिला. राष्ट्रवादीच्या सतीश पाटील यांनी, ‘असे कुणाच्या आग्रहाने पत्र कसे देता?’ अशी विचारणा करीत या वादाला फोडणी घातली.
वादळवाऱ्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्या
गुरुवारी (दि. १०) झालेल्या वादळ आणि पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. तेव्हा या सर्व नुकसानीचे पंचनामे करून वस्तुस्थितिदर्शक नुकसानभरपाई मिळावी, असा ठराव यावेळी करण्यात आला. राहुल आवाडे, शिवाजी मोरे, अॅड. हेमंत कोेलेकर यांच्यासह अन्य सदस्यांनी ही मागणी केली.
वसंत भोसले यांचे अभिनंदन
‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांना ‘पत्रकार कल्याण निधीचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ मिळाल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. पक्षप्रतोद अरुण इंगवले यांनी हा ठराव मांडला.
अण्णा गेला कर्नाटकात!
इंगवले आक्रमक होऊन बोलत असताना सुषमा देसाई त्यांना, ‘अहो अण्णा’ असे म्हणून आपले म्हणणे सांगत होत्या. पण इंगवले यांनी, ‘अण्णा अण्णा, काय लावलाय? अण्णा गेला कर्नाटकात!’ अशी टिप्पणी केल्याने सर्व सदस्यांमध्ये हशा पिकला. मी गटनेता आहे की घटनेता हेच कळेना झालेय, असेही इंगवले म्हणाले.
सदस्य म्हणाले....
- रचना होलम, सभापती आजरा - वेळवट्टी उपकेंद्राच्या दुरुस्तीसाठी निधी द्या.
- विजय भोजे- पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया सक्तीची करा.
- शिवाजी मोरे- स्वतंत्र ग्रामपंचायतीचा प्रस्ताव नऊ महिने रेंगाळला आहे.
- रेश्म सनदी- ग्रामपंचायत विभागाचा कारभार कासवाच्या गतीने चालतो.
- अशोक माने- जनसुविधाच्या कामांना लवकर मंजुरी द्या.
- सुभाष सातपुते- २५/२५ च्या कामांमध्ये विरोधकांनाही सहभागी करून घ्या.
- अनिता चौगुले-औरनाळ जलस्वराज्य योजना सहा वर्षे झाली तरी अपूर्ण.
- प्रविण यादव- मिणचे गावची जागा सीईओंच्या नावावर करून घ्या.
- सचिन बल्लाळ- इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करा.
- डॉ. पद्माराणी पाटील- सर्वसाधारण मुलांनाही गणवेश द्या.
१३२ कोटींचा आराखडा मंजूर
जिल्हा नियोजन समितीने १३२ कोटी रुपये मंजूर केल्याने तितक्याच रकमेचा आराखडा यावेळी मंजूर करण्यात आला. कृषी (१ कोटी), पशुसंवर्धन (३ कोटी ७२ लाख), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (८० लाख १८ हजार), पाणी व स्वच्छता विभाग (२५ कोटी ३७ लाख), ग्रामपंचायत विभाग (१६ कोटी ३५ लाख), लघुपाटबंधारे (१0 कोटी ७४ लाख), बांधकाम विभाग (३0 कोटी ८५ लाख), प्राथमिक शिक्षण ( ८ कोटी १८ लाख), एकात्मिक बाल विकास (२ कोटी), आरोग्य (६ कोटी ६७ लाख), पाणीपुरवठा (२६ कोटी ५२ लाख), समाजकल्याण विभाग ( २५ लाख) अशा पद्धतीने विभागवार आराखडा मंजूर करण्यात आला.