कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने सांडपाणी रोखण्यासाठी सहा गावांमध्ये बंधारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 12:42 PM2019-02-16T12:42:58+5:302019-02-16T12:46:07+5:30
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने पंचगंगा नदीमध्ये मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी २५ लाख रुपये खर्चून बंधारे घालण्यात येणार आहेत. अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी ही माहिती दिली.
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या वतीने पंचगंगा नदीमध्ये मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी २५ लाख रुपये खर्चून बंधारे घालण्यात येणार आहेत. अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी ही माहिती दिली.
महाडिक म्हणाल्या, एकदम मोठ्या आकाराच्या योजना किंवा प्रकल्प आखले, तर त्याला राज्य, केंद्र शासनाची तातडीने परवानगी मिळत नाही. त्याचे परिपूर्ण प्रस्ताव तयार करण्यामध्ये वेळ जातो. त्याची प्रक्रियाही मोठी असते. म्हणूनच आम्ही जिल्हा परिषदेच्या वतीने दोन पातळ्यांवर सध्या काम करत आहोत.
‘नमामि पंचगंगा’ प्रकल्पाचा आराखडा केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्याचा अनुकूल निर्णय होईलच; परंतु तोपर्यंत आम्ही जिल्हा परिषदेच्या पातळीवर काही उपाययोजना सुरू केल्या आहेत. प्राथमिक पातळीवर ज्या नाल्यातून सांडपाणी वाहून नेले जाते, त्याचे रुंदीकरण आणि खोलीकरण करणे या कामाला प्राधान्य देण्यात आले आहे.
तसेच या नाल्यांवर बंधारे घालण्यात येणार असून, या बंधाऱ्यांच्या कडेला अळू आणि कर्दळी लावण्याचे नियोजन आहे. जेणेकरून प्रदूषित पाणी शोषून घेतले जाईल. यामुळे सांडपाणी नदीत जाणे बंद करण्यासाठी आम्ही प्राधान्य दिले आहे.
याअंतर्गत शिरोली (४ लाख ८१ हजार), नांदणी (३ लाख ४६ हजार), गांधीनगर (५ लाख ४४ हजार), वडणगे (५ लाख २१ हजार), शिंगणापूर (२ लाख ३४ हजार), हालोंडी (५ लाख २१ हजार) असा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या सहा कामांना लवकरच सुरुवात करणार असल्याचे पाणी आणि स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे यांनी सांगितले.