Kolhapur: लेखाधिकाऱ्याच्या अपहरण प्रकरणात जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याचा सहभाग, कनिष्ठ लिपिक संदीप ठमके निलंबित
By समीर देशपांडे | Published: April 19, 2024 06:18 PM2024-04-19T18:18:22+5:302024-04-19T18:19:25+5:30
लेखाधिकारी दीपक माने हे लोकसभेच्या कामकाजात असताना त्यांचे आठ जणांनी अपहरण करून केली लाथाबुक्क्यांनी मारहाण
कोल्हापूर : जिल्हा परिषदेतील लेखाधिकाऱ्याचे अपहरण करून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी येथील जिल्हा परिषदेच्याच प्राथमिक शिक्षण विभागातील कनिष्ठ लिपिक संदीप ठमके याला शुक्रवारी निलंबित करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी याबाबतचे आदेश काढले.
याच विभागातील शालेय पोषण विभागाचे लेखाधिकारी दीपक माने हे लोकसभेच्या कामकाजात असताना त्यांचे आठ जणांनी अपहरण करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. शालेय पोषण आहार विभागामध्ये २३ लाखांचा अपहार झाला असून त्याची जबाबदारी तुमच्यावर घ्या असा दबाव माने यांच्यावर टाकण्यात आला. या प्रकारानंतर आठ जणांना अटक करण्यात आली असून यामध्ये याच विभागात कार्यरत असणारा कनिष्ठ लिपिक संदीप ठमके याचाही समावेश आहे.
दरम्यान गुरूवारी न्यायालयात त्याला दोन दिवसांची पोलिस काेठडी मिळाल्याने शासकीय नियमानुसार तो ४८ तास पोलिस कोठडीत राहिल्याने त्याचे १७ एप्रिलपासून निलंबन करण्यात आले आहे. या काळात आजरा पंचायत समितीकडे रोज हजर राहण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.