‘माझी वसुंधरा’मध्ये कोल्हापूर जिल्हा परिषद, इचलकरंजी मनपा झळकली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 12:08 PM2024-09-28T12:08:12+5:302024-09-28T12:08:33+5:30

जिल्ह्यातील नगरपालिका, ग्रामपंचायतींना साडेतेरा कोटींची बक्षिसे

Kolhapur Zilla Parishad, Ichalkaranji Municipal Corporation featured in Mazi Vasundhara | ‘माझी वसुंधरा’मध्ये कोल्हापूर जिल्हा परिषद, इचलकरंजी मनपा झळकली

‘माझी वसुंधरा’मध्ये कोल्हापूर जिल्हा परिषद, इचलकरंजी मनपा झळकली

कोल्हापूर ‘माझी वसुंधरा अभियान ४.०’ मध्ये जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींनी राज्यात भरीव कामगिरी केली असून एकूण साडेतेरा कोटींची बक्षिसे पटकावली आहेत. राज्यस्तरावर इचलकरंजी महापालिका तिसऱ्या क्रमांकावर येत तीन कोटी रुपयांचे बक्षीस पटकावले आहे. तर कोल्हापूरजिल्हा परिषदेने पुणे विभागामध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाकडून पंचमहाभुतांवर आधारित ही स्पर्धा घेण्यात येते. सन २०२३/२४ चे हे निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आले.

पहिल्या अभियानापेक्षा सरस कामगिरीच्या ‘उंच उडी’ गटात राज्यस्तरावरील उत्तेजनार्थ म्हणून गडहिंग्लज आणि कागल नगरपालिकेची निवड करण्यात आली असून त्यांना प्रत्येकी दीड कोटी रूपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहे. विभागस्तरावर जयसिंगपूर नगरपालिकेने आठवा क्रमांक पटकावत ५० लाखांचे बक्षिस मिळवले आहे. पुणे विभागात मुरगूड नगरपालिका सातवी आली असून ७५ लाखांचे बक्षिस मिळाले आहे तर हातकणंगले नगरपालिका आठवी येत ५० लाखांच्या बक्षिसाची मानकरी ठरली आहे. उंच उडी प्रकारात कुरूंदवाड नगरपालिकेने सातवा क्रमांक पटकावत ७५ लाखांचे बक्षीस मिळवले आहे.

ग्रामपंचायत विभागामध्ये १० हजारपेक्षा अधिक लोकसंख्या गटात भूमी संकल्पनेत शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती ग्रामपंचायतीने राज्यस्तरीय उत्तेजनार्थ सहावा क्रमांक पटकावत ७५ लाखाचे बक्षीस मिळवले आहे. तर पुणे विभागात अंबपने आठवा क्रमांक मिळवत ५० लाखाच्या बक्षिसाचा मान मिळवला. पुणे विभागात उंच उडीमध्ये कागल तालुक्यातील अर्जुनी ग्रामपंचायतीने सतरावा क्रमांक मिळवून १५ लाखाचे बक्षीस मिळवले. भूमी संकल्पनेत शेळकेवाडी ग्रामपंचायतीने राज्यस्तरावरील उत्तेजनार्थ चौथा क्रमांक पटकावत ५० लाख रुपयांचे बक्षीस मिळवले आहे.

पन्हाळा, आजऱ्याला दीड कोटी

१५ हजारांपेक्षा कमी लोकसंख्येच्या गटात राज्यस्तरावर पन्हाळा नगरपालिका तिसऱ्या क्रमांकावर आली असून दीड कोटीच्या बक्षिस पात्र ठरली आहे.तर राज्यस्तरावर उत्तेजनार्थ चौथा क्रमांक पटकावत आजरा नगरपंचायतीनेही दीड कोटींचे बक्षीस मिळवले आहे. पुणे विभागात सर्वोत्तम जिल्हाधिकारी म्हणून कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.

Web Title: Kolhapur Zilla Parishad, Ichalkaranji Municipal Corporation featured in Mazi Vasundhara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.