कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यात पहिल्या तीनमध्ये, पंचायत राज सशक्तीकरण पुरस्कारासाठी चुरस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 01:02 PM2022-01-22T13:02:34+5:302022-01-22T13:02:57+5:30

कोल्हापूर, नागपूर आणि बुलडाणा या जिल्हा परिषदा राज्यात पहिल्या तीन क्रमांकामध्ये आहेत. 

Kolhapur Zilla Parishad in the top three in the state, Competition for Panchayat Raj Empowerment Award | कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यात पहिल्या तीनमध्ये, पंचायत राज सशक्तीकरण पुरस्कारासाठी चुरस

कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यात पहिल्या तीनमध्ये, पंचायत राज सशक्तीकरण पुरस्कारासाठी चुरस

googlenewsNext

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या पंचायत राज सशक्तीकरण २०२२ पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील कोल्हापूर, नागपूर आणि बुलडाणा या तीन जिल्हा परिषदांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. यासाठी आता पुढील आठवड्यात सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांचे पथक विभागीय क्षेत्रीय पडताळणीसाठी कोल्हापुरात येणार आहे.

सन २०२०-२१ मधील कामकाजावर आधारित पंचायत राज सशक्तीकरण पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहेत. यासाठी राज्यपातळीवरून मूल्यांकन होऊन ही नावे केंद्र शासनाकडे पाठवण्यात येणार आहेत. यासाठी प्रत्येक जिल्हा परिषदेने आपला प्रस्ताव गुणांसह ऑनलाईन पाठवायचा होता. त्यानुसार पाठविलेल्या प्रस्तावांमधून कोल्हापूर, नागपूर आणि बुलडाणा या जिल्हा परिषदा राज्यात पहिल्या तीन क्रमांकामध्ये आहेत. 

उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांनी संबंधित ग्रामपंचायतींना आवश्यक त्या सर्व सूचना दिल्या असून, सादर केलेल्या प्रस्तावामध्ये जी माहिती भरली आहे, त्यानुसार ती कागदपत्रे तयार ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

तीन ग्रामपंचायती स्पर्धेत

केंद्र शासनाच्या ग्रामपंचायत स्तरावरील विविध पुरस्कारांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील चार ग्रामपंचायती स्पर्धेत आहेत. त्यामध्ये श्रृंगारवाडी (ता. आजरा) दोन गटांमध्ये स्पर्धेत असून शिंदेवाडी (ता. कागल), वेतवडे (ता. गगनबावडा) या प्रत्येकी एका गटातून स्पर्धेत आहेत.

प्रशासन लागले तयारीला

पुढील आठवड्यात पडताळणी होणार असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला तयारीच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांनी शुक्रवारी सायंकाळी सर्व विभागांच्या अधीक्षकांची बैठक घेऊन याबाबतची सर्व माहिती अद्ययावत ठेवण्याच्या तसेच आवश्यक सर्व कागदपत्रे तयार ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.

Web Title: Kolhapur Zilla Parishad in the top three in the state, Competition for Panchayat Raj Empowerment Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.