यशवंत पंचायतमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषद पुणे विभागात पहिली 

By समीर देशपांडे | Published: March 13, 2023 06:23 PM2023-03-13T18:23:59+5:302023-03-13T18:24:18+5:30

कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज आणि सांगली जिल्ह्यातील शिराळा पंचायत समित्यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला 

Kolhapur Zilla Parishad in Yashwant Panchayat first in Pune division | यशवंत पंचायतमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषद पुणे विभागात पहिली 

यशवंत पंचायतमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषद पुणे विभागात पहिली 

googlenewsNext

कोल्हापूर : यशवंत पंचायत राज अभियानामध्ये पुणे विभागामध्ये कोल्हापूरजिल्हा परिषद पहिली आली. राज्यातील अत्योकृष्ट जिल्हा परिषदा व पंचायत समित्या पुरस्कार योजनेची (२०२२-२३) विभागीय स्तरावरील बैठक सोमवारी पुण्यात झाली. यामध्ये ही निवड करण्यात आली.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात ही बैठक झाली. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि सोलापूर या पाच जिल्हा परिषदांमधून कोल्हापूरला सर्वाधिक ३५७.२८ गुण मिळाले. पंचायत समित्यांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट पंचायत समिती पहिली आली. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज आणि सांगली जिल्ह्यातील शिराळा पंचायत समित्यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला.

यासाठी जिल्हा परिषदेने प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर केला होता. त्यानंतर सातारा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एम. एस. घुले यांच्या समितीने २२ फेब्रुवारी २३ रोजी जिल्हा परिषदेची तपासणी आणि पडताळणी केली. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, प्रकल्प संचालक सुषमा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) मनीषा देसाई-शिंदे यांच्यासह सर्व खातेप्रमुख व अधिकारी, कर्मचारी यांच्या सर्वांच्या सहकार्याने जिल्हा परिषदेने हे यश संपादन केले. आता राज्यस्तरीय मूल्यांकनासाठी लवकरच पुन्हा नवी समिती येणार आहे. गडहिंग्लजचे गटविकास अधिकारी शरद मगर यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीनेही दुसरा क्रमांक पटकावला आहे.

यावरून झाले मूल्यांकन

सामान्य प्रशासन विभागाकडील प्रशासकीय कामकाज, सभा कामकाज, कर्मचारी सेवा, निलंबन, निवृत्ती वेतन प्रकरणे, लोकायुक्त प्रकरणे, केंद्र शासन, राज्य शासन, जिल्हा नियोजन समिती तसेच स्वनिधीचा प्राप्त निधी व केलेला खर्च, अंगणवाडी कामकाज, लसीकरण, प्रसूती, जननी सुरक्षा योजना, पाणीपुरवठा योजना, बांधकामकडील पूर्ण – अपूर्ण कामे, घरकुल मंजुरी आदी कामांची दखल घेण्यात आली.

विकासकामे राबविणे आणि योजनांची अंमलबजावणी यामध्ये कोल्हापूर जिल्हा नेहमीच अग्रेसर आहे. हीच परंपरा याहीवेळी कायम राहिली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे अथक प्रयत्न, लोकप्रतिनिधींचे मार्गदर्शन यातूनच हे यश मिळाले आहे.-  संजयसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर

Web Title: Kolhapur Zilla Parishad in Yashwant Panchayat first in Pune division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.