कोल्हापूर जिल्हा परिषदेत एमटेक, डॉक्टर झाले शिपाई; अनुकंपामध्ये मिळाली ती नोकरी स्वीकारली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 01:36 PM2024-07-27T13:36:29+5:302024-07-27T13:38:02+5:30
कोल्हापूर : सरकारी नोकरी मिळणे दुरापास्त झाल्याने मिळेल ती नोकरी स्वीकारण्याकडे युवक-युवतींचा कल वाढला आहे. याचे प्रत्यंतर जिल्हा परिषदेच्या ...
कोल्हापूर : सरकारी नोकरी मिळणे दुरापास्त झाल्याने मिळेल ती नोकरी स्वीकारण्याकडे युवक-युवतींचा कल वाढला आहे. याचे प्रत्यंतर जिल्हा परिषदेच्या अनुकंपा तत्त्वावरील भरतीवेळी आले आहे. एनर्जी टेक्नॉलॉजीमध्ये एमटेक केलेल्या युवकाने आणि बीएएमएस डॉक्टर झालेल्या युवतीने शिपाईपदावर काम करण्यास तयारी दर्शवत नोकरीचा आदेश स्वीकारला आहे.
याच आठवड्यामध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने ५० जणांना अनुकंपा तत्त्वावरील भरतीचे आदेश देण्यात आले. यापैकी तब्बल ३५ जागा परिचर, म्हणजे शिपाईपदाच्या होत्या. परंतु मृत्यू पावलेल्या पालकांच्या मुलांचे शिक्षण जास्त असले तरी त्यांच्या शिक्षणासाठी पूरक असणाऱ्या जागा जिल्हा परिषदेत रिक्त नसल्याने, अखेर आहे त्या पदाच्या नोकऱ्या स्वीकाराव्या लागल्या आहेत. एक महिला बीएबीएड आहे, एका युवतीने बीएडीएड केले आहे, अन्य एका युवकाने बी.ई. मेकॅनिकल, बीकॉम असलेल्या युवकाने शिपाईपदाची मिळालेली नोकरी स्वीकारली आहे.
तसेच मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेल्या युवकाने कंत्राटी ग्रामसेवकपदाची नोकरी स्वीकारली असून, आयुर्वेद डॉक्टर झालेल्या एका युवतीनेही शिपाईपद स्वीकारले आहे. एकूणच बेरोजगारीची परिस्थिती पाहता ज्याच्या त्याच्या शिक्षणानुसार ज्याला-त्याला नोकरी मिळत नसल्याने मिळेल ती नोकरी स्वीकारून जगण्याची मानसिकता दिसून येत आहे.