कोल्हापूर जिल्हा परिषदेचा ३८ कोटींचा अर्थसंकल्प सादर : प्रत्येक सदस्याला ६ लाखाचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 06:20 PM2018-03-22T18:20:45+5:302018-03-22T18:20:45+5:30
गर्भसंस्कारापासून ते लॅपटॉप वितरणापर्यंतचा आणि पुस्तकांपासून ते मोफत सॅनिटरी नॅपकीन पुरवण्याच्या विविध योजनांचा समावेश असलेला कोल्हापूर जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प गुरूवारी सादर करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक होत्या.
कोल्हापूर : गर्भसंस्कारापासून ते लॅपटॉप वितरणापर्यंतचा आणि पुस्तकांपासून ते मोफत सॅनिटरी नॅपकीन पुरवण्याच्या विविध योजनांचा समावेश असलेला कोल्हापूर जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प गुरूवारी सादर करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक होत्या.
अर्थ समितीचे सभापती अंबरिष घाटगे यांनी राजर्षि शाहू सभागृहामध्ये हा ३८ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला असून यातून प्रत्येक सदस्याला ६ लाख रूपयांचा स्वनिधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. बहुतांशी सदस्यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले असून काही बाबींवरची तरतूद वाढवण्याची मागणी केली आहे. अनेक नाविन्यपूर्ण योजनांचा समावेश हे या अर्थसंकल्पाचे मोठे वैशिष्ट्य ठरलेआहे.
सदस्य प्रा. शिवाजी मोरे यांनी या अर्थसंकल्पाचे अभ्यासपूर्ण विश्लेषण करून जिल्हा परिषदेच्या मालमत्ता विकसित करण्यासाठी निधी वाढवण्याची मागणी केली. सौरउर्जेवरच्या साधनांची योजना आवश्यक असल्याचे ते म्हणाले. अॅड. हेमंत कोलेकर यांनी भजनी मंडळाना साहित्य देण्याची तर राहूल आवाडे यांनी वडगाव, हुपरी नगरपरिषद गोळा करणारा शिक्षण कर जिल्हा परिषदेकडे घेण्याची मागणी केली.
वंदना जाधव यांनी शोष खडड्यावरील निधी तर प्रविण यादव यांनी शिवा काशिद स्मारकावरील निधी वाढवण्याची मागणी केली. सेंद्रीय शेतीवर निधीची मागणी हंबीरराव पाटील यांनी तर राजवर्धन निंबाळकर यांनी लॅपटॉपची मागणी केली. सतीश पाटील यांनी अखर्चित निधीबाबत विचारणा केली.
नाविन्यपूर्ण योजनां
- राजमाता जिजाऊ गर्भसंस्कार योजना (तरतूद १0 लाख)-गरोदर मातांसाठी शिक्षण, प्रशिक्षण, योगाभ्यास, प्रसुतीपूर्व गर्भसंस्कार, नवजात बालकाची काळजी घेण्याची माहिती दिली जाणार आहे.
- शिक्षणतजज्ञ डॉ.जे. पी.नाईक शताब्दी शाळा सन्मान योजना, जिल्ह्यातील ७५ प्राथमिक शाळा यंदा १00 वर्षे पूर्ण करत आहेत. त्या शाळांच्या सन्मान करण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे.
- डॉ.जयंत नारळीकर विज्ञान जागृती अभियान (५ लाख), आयुका, इस्त्रो, नेहरू तारांगण मुंबईला विद्यार्थ्यांची भेट घडवून आणणे
- डॉ. विक्रम साराभाई विज्ञान मेळावा (१ लाख)
- डॉ. सी. व्ही. रामन समृध्द प्रयोगशाळा (२0 लाख), यातून जिल्हा परिषदेच्या शाळांना विज्ञानसाहित्य पुरवले जाणार आहे.
- कृषितजज्ञ डॉ. स्वामीनाथन भुसंजीवनी योजना, याअंतर्गत ७५ टक्के अनुदानावर हिरवळीच्या खतांचे बी बियाणे दिले जाणार आहे.
- कामधेनू महिला प्रशिक्षण योजना (७ लाख), यातून महिलांना दुग्ध व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
- दलित वस्तींमध्ये रमाई वाचनालय (४0 लाख)
- दिव्यांग मित्र अभियान (३0 लाख), यातून दिव्यांगाना अॅडाप्टरसह मोटारसायकल देण्यात येणार आहे.
- डॉ. पंजाबराव देशमुख दिव्यांग शेती साहित्य योजना
- तारांगणा, यातून कला व क्रीडा क्षेत्रात राज्यस्तरीय प्राविण्य मिळवलेल्या मुलींचा गौरव करण्यात येणार आहे.
अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये
१ पॉवर टिलर, रोटावेटर, बिडरसाठी (२५ लाख रूपये)
२ जैविक व घनकचरा विघटनासाठी (२५ लाख)
३ वर्गखोल्या डिजिटल करणे (४९ लाख)
४ प्राथमिक व माध्यमिक शाळांना सांस्कृतिक व क्रीडा साहित्य पुरवणे (२५ लाख)
५ कडबाकुट्टी, सुधारित औजारे, पाईप्स पुरवणे (१ कोटी ४0 लाख)
६ पशूधन जळितग्रस्त झाल्यास अर्थसहाय्य(३ लाख)
७ मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लॅपटॉप देणे (५0 लाख)
८ समाजमंदिरांमध्ये व्यायामशाळा उभारणे ( ५0 लाख)
९ मागासवर्गीय महिलांना स्वयंरोजगार साधने पुरवणे (९५ लाख)
१0 मागासवर्गीय मुलींना सायकल पुरवणे (२0 लाख)
११ पाझर, गाव तलावातील गाळ काढण्यासाठी ( ३१ लाख)
१२ पिठाची गिरणी, पिको फॉल मशिन,सायकल पुरवणे (४0 लाख)