कोल्हापूर जिल्हा परिषद देशात दुसरी, स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेचा निकाल जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 02:42 PM2019-06-21T14:42:33+5:302019-06-21T14:44:53+5:30
जागतिक शौचालय दिनानिमित्त केंद्र शासनाने घेतलेल्या ‘स्वच्छ सुंदर शौचालय’ स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा परिषदेने देशामध्ये दुसरा, तर महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे. गुरुवारी रात्री उशिरा याबाबतची घोषणा करण्यात आली. ३१ जानेवारी २0१९ पर्यंत केवळ १५ दिवसांमध्ये साडेपाच लाख शौचालयांपैकी चार लाख ३१ हजार ५८१ शौचालये रंगविण्याची कामगिरी जिल्हा परिषदेने केली होती.
समीर देशपांडे
कोल्हापूर : जागतिक शौचालय दिनानिमित्त केंद्र शासनाने घेतलेल्या ‘स्वच्छ सुंदर शौचालय’ स्पर्धेत कोल्हापूरजिल्हा परिषदेने देशामध्ये दुसरा, तर महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे. गुरुवारी रात्री उशिरा याबाबतची घोषणा करण्यात आली. ३१ जानेवारी २0१९ पर्यंत केवळ १५ दिवसांमध्ये साडेपाच लाख शौचालयांपैकी चार लाख ३१ हजार ५८१ शौचालये रंगविण्याची कामगिरी जिल्हा परिषदेने केली होती.
केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाकडून १९ नोव्हेंबर २0१८ रोजी ही स्पर्धा घेण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागामार्फत यासाठी ग्रामपंचायत स्तरावर विविध उपक्रम राबविण्यात आले होते. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जिल्हा तसेच तालुका स्तरावर कार्यशाळा घेऊन, या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त उपक्रम राबविले जातील, असे नियोजन करण्यात आले होते.
शाश्वत स्वच्छतेसाठी अंतर्व्यक्ती संवाद साधने, स्वच्छतेसाठी शालेय विद्यार्थ्यांमार्फत प्रबोधनपर प्रभातफेरीचे आयोजन करणे, स्वच्छतेमध्ये उत्कृष्ट काम केलेल्या व्यक्तींचा सत्कार करणे, ग्रामपंचायत स्तरावर हागणदारीमुक्तीबाबत फलक लावणे, शौचालयाच्या नियमित वापराबाबत ग्रामस्थांचे प्रबोधन करणे, असे विविध उपक्रम ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात आले होते. जिल्ह्यामध्ये घेण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती, छायाचित्र, व्हिडीओ हे केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर भरण्यात आली होती.
अधिकारी, पदाधिकारी रंगविण्यासाठी गावागावांत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्यासह अन्य पदाधिकारी, अधिकारी शौचालय रंगविण्यासाठी गावागावांत फिरले. प्रत्यक्ष हातात ब्रश घेऊन महाडिक आणि मित्तल यांनी शौचालये रंगवली. पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे यांनी या मोहिमेचे नेटके नियोजन केले. सर्व ग्रामपंचायती, पदाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या सर्व यंत्रणेने झोकून काम केल्याने देशात दुसऱ्या क्रमांकाचा मान कोल्हापूर जिल्हा परिषदेला मिळाला.
पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ एकत्र आले की काय होऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणून या निकालाकडे पाहिले पाहिजे. आम्ही सर्वांनी १५ दिवस एकच ध्येय ठेवून काम केले आणि आज कोल्हापूर जिल्हा परिषद देशामध्ये या स्पर्धेमध्ये दुसरी आली आहे. देशपातळीवरच्या या सन्मानाने कोल्हापूरचे नाव उंचावले असून, या मोहिमेमध्ये सहभागी असणाऱ्या सर्वांचे मी अभिनंदन करून आभार मानते.
शौमिका महाडिक
अध्यक्षा, जिल्हा परिषद कोल्हापूर