यशवंत पंचायत राज अभियानामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यात दुसरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 05:16 PM2020-02-29T17:16:02+5:302020-02-29T17:17:49+5:30
महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन २०१८/१९ सालामधील कामगिरीवर आधारित यशवंत पंचायत राज अभियानामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेने राज्यामध्ये दुसरा तर गडहिंग्लज पंचायत समितीने पुणे विभागामध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे. या दोन्ही संस्थांना अनुक्रमे २० लाख आणि ८ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन २०१८/१९ सालामधील कामगिरीवर आधारित यशवंत पंचायत राज अभियानामध्ये कोल्हापूरजिल्हा परिषदेने राज्यामध्ये दुसरा तर गडहिंग्लज पंचायत समितीने पुणे विभागामध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे. या दोन्ही संस्थांना अनुक्रमे २० लाख आणि ८ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
गतवर्षी कोल्हापूर जिल्हा परिषदेने स्वयं मूल्यमापनाद्वारे शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार मूल्यमापन आणि प्रत्यक्ष पाहणी झाल्यानंतर पुणे विभागात कोल्हापूर जिल्हा परिषद पहिली आली होती. त्यानंतर २८ जानेवारी २०२० रोजी राज्यस्तरीय समितीने जिल्हा परिषदेची तपासणी आणि पडताळणी केली होती.
सामान्य प्रशासन विभागाकडील प्रशासकीय कामकाज, सभा कामकाज, कर्मचारी सेवा, निलंबन, निवृत्तिवेतन प्रकरणे, लोकायुक्त प्रकरणे, महिला बालकल्याण, आरोग्य, पाणी व स्वच्छता, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, कृषी, बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा, समाजकल्याण, वित्त, ग्रामपंचायत, पशुसंवर्धन, शिक्षण या सर्व विभागांच्या योजनांची दखल घेत एकूण कामकाज पाहून राज्यातील हा दुसरा क्रमांक जाहीर करण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेला नुकताच केंद्र शासनाचा पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरणाचा ५० लाख रुपयांचा पुरस्कार प्राप्त झाला असून त्यापाठोपाठ हा पुरस्कार जाहीर झाल्याने जिल्हा परिषदेत आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि गावपातळीवरील कर्मचारी, पदाधिकारी यांनी एकदिलाने काम केल्याने आमचा हा गौरव झाला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली याच पद्धतीने जिल्हा परिषद प्रगती करत राहील.
बजरंग पाटील
अध्यक्ष, जिल्हा परिषद कोल्हापूर