कोल्हापूर जिल्हा परिषदेच्यावतीने दिव्यागांचे अर्ज भरण्यास पाचगावातून प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 11:19 AM2018-10-24T11:19:04+5:302018-10-24T11:19:59+5:30
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्यावतीने सुरू असलेल्या ‘दिव्यांग उन्नती अभियान’अंतर्गत पाचगाव येथे आज दिव्यांगांचे अर्ज भरून घेतले जाणार आहेत. यासाठी जिल्हा परिषदेने आपली स्वत:ची यंत्रणा तयार केली आहे.
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्यावतीने सुरू असलेल्या ‘दिव्यांग उन्नती अभियान’अंतर्गत पाचगाव येथे आज दिव्यांगांचे अर्ज भरून घेतले जाणार आहेत. यासाठी जिल्हा परिषदेने आपली स्वत:ची यंत्रणा तयार केली आहे.
दोन महिन्यांपूर्वी या अभियानातंर्गत कोल्हापूर जिल्ह्यातून चाळीस हजारांहून अधिक दिव्यांगांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. मात्र, प्रत्यक्षात त्यांना प्रमाणपत्रे देण्याबाबत अजूनही जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून कार्यवाही सुरू झालेली नाही. त्यांच्याकडे यंत्रणा असतानाही अजूनही आठ हजारांहून अधिक दिव्यांग प्रमाणपत्रांच्या प्रतीक्षेत आहेत.
या पार्श्वभूमीवर या सगळ्याच प्रक्रियेला वेळ लागणार असल्याने जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसुळ यांनी चार विशेष शिक्षकांची प्रतिनियुक्तीवर जिल्हा परिषदेकडे नियुक्ती करून घेतली आहे. त्यांना आणखी दोन कर्मचारी आणि चार लॅपटॉप उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
हे पथक आपल्या कामाला आजपासून सुरूवात करणार असून पाचगावमधील ९७ दिव्यांगांचे अर्ज भरून घेण्यात येणार आहेत. त्यानंतर हे अर्ज आॅनलाईन भरले जातील आणि त्यांना नंतर प्रमाणपत्र दिले जाईल. आॅनलाईन अर्ज भरणेच या दिव्यांगांसाठी जिकीरीचे असल्याने हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेने आपल्या शिरावर घेतली आहे.