कोल्हापूर : तंबाखूमुक्त शाळांसाठी जिल्हा परिषद आग्रही : अमन मित्तल, लवकरच घेणार कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 11:45 AM2018-08-25T11:45:32+5:302018-08-25T11:48:01+5:30
‘तंबाखूमुक्त शाळा’ उपक्रमामध्ये जिल्हा परिषद अग्रभागी राहील, त्यासाठी लवकरच एक कार्यशाळा आयोजित करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी दिली.
कोल्हापूर : ‘तंबाखूमुक्त शाळा’ उपक्रमामध्ये जिल्हा परिषद अग्रभागी राहील, त्यासाठी लवकरच एक कार्यशाळा आयोजित करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी दिली.
सलाम मुंबई फौंडेशन, शासनाचा शिक्षण विभाग आणि राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमतर्फे ‘सेहत की राखी’ या उपक्रमाचे जिल्हा परिषदेत आयोजन करण्यात आले होते. यावेळी मित्तल यांनी ही माहिती दिली.
सलाम फौंडेशनचे राज्य समन्वयक संजय ठाणगे यांनी या अभियानाचा हेतू सांगितला. जिल्हा समन्वयक शिक्षण दिनकर जगदीश, एकनाथ कुंभार यांनी जिल्ह्यात राबविलेले उपक्रम सांगितले. राज्यामध्ये यवतमाळ आणि वर्धा जिल्हे तंबाखूमुक्त शाळा अभियानामध्ये प्रथम आले आहेत.
सध्या नंदूरबार येथे मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. कोल्हापूर आणि सांगली येथेही या अभियानाला चांगला प्रतिसाद असल्याचे सांगण्यात आले. ३१ डिसेंबर २0१८ पर्यंत या शाळांचे प्रस्ताव दाखल करण्यात येणार आहेत.
यावेळी पीरवाडी आणि हसूर (ता. करवीर) येथील प्राथमिक शाळांच्या विद्यार्थिनींनी औक्षण करून मित्तल यांना राखी बांधली. गुरुवारीच जिल्ह्यातील सर्व मास्टर्स ट्रेनर्सची याबाबत बैठकही घेण्यात आली होती. आता पुन्हा जिल्ह्यातील ज्या शाळांनी यासाठी प्रस्ताव पाठवलेले नाहीत, त्यांना प्रवृत्त करण्यात येणार आहे.
शिक्षण सभापती अंबरीश घाटगे, प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी रविकांत आडसूळ यांचीही फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी भेट घेऊन त्यांनाही याबाबत आवाहन केले. यावेळी डॉ. सुरेश घोलप उपस्थित होते.
चिमुकलीच्या भाषणाने सीईओ भारावले
राखी बांधल्यानंतर सिद्धी बेरकळ या चिमुकलीने तंबाखूमुक्तीबाबत भाषण केले. तंबाखूमध्ये कोणते अपायकारक घटक असतात इथंपासून तिनं सविस्तर माहिती भाषणात दिली. हे ऐकून मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल प्रभावित झाले. त्यांनी अर्ध्या मिनिटातच तिचे भाषण थांबवले. तिला आपल्याशेजारी खुर्चीत बसवले आणि नंतर संपूर्ण भाषणाचे व्हिडिओ शुटिंग करून घेतले. यावेळी प्रणाली सुतार हिनेही नाटुकली सादर केली. या दोघींचेही मित्तल यांनी कौतुक केले.