कोल्हापूर जिल्हा परिषदेचे शैक्षणिक उपक्रम प्रेरणादायी- वर्षा गायकवाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 02:18 PM2020-10-15T14:18:21+5:302020-10-15T14:20:33+5:30
kolhapurnews, zp, educationsector, varshagaikhwad कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे उपक्रम हे प्रेरणादायी असल्याचे प्रशंसोद्गार शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काढले. उपाध्यक्ष सतीश पाटील, शिक्षण सभापती प्रवीण यादव, राजेश पाटील यांनी मंगळवारी (दि. १३) गायकवाड यांची मुंबई येथे मंत्रालयात भेट घेतली. त्यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेच्या कामकाजाचे कौतुक केले.
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे उपक्रम हे प्रेरणादायी असल्याचे प्रशंसोद्गार शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काढले. उपाध्यक्ष सतीश पाटील, शिक्षण सभापती प्रवीण यादव, राजेश पाटील यांनी मंगळवारी (दि. १३) गायकवाड यांची मुंबई येथे मंत्रालयात भेट घेतली. त्यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेच्या कामकाजाचे कौतुक केले.
कोल्हापूर जिल्ह्यातील प्रचंड महापुरामुळे नुकसान झाल्यानंतर शाळाखोल्या व इमारत दुरुस्तीसाठीचा निधी, शाळांना वेतनेतर अनुदान, रिक्त पदे भरती यांबाबत या पदाधिकाऱ्यांनी यावेळी गायकवाड यांच्याशी चर्चा केली. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता, शिष्यवृत्ती परीक्षा निकाल या बाबतींत कोल्हापूर जिल्हा नेहमी अग्रेसर राहिल्याबद्दल गायकवाड यांनी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
प्रचंड महापुरात शाळाखोल्या व इमारतींचे नुकसान झाले; पण या शाळांच्या दुरुस्तीसाठी अद्याप निधी मिळाला नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झाल्याने सद्य:स्थितीत कोणत्याही प्रकारचे अनुदान शाळाखोल्या व इमारत दुरुस्तीसाठी प्राप्त होणार नसल्याची वस्तुस्थिती शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनी मंत्री गायकवाड यांच्या निदर्शनास आणून दिली. याबाबत आपण सकारात्मक असून जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अर्थसाहाय्य करण्याबाबत लवकर निर्णय घेण्याची ग्वाही यावेळी गायकवाड यांनी दिली.