कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यात ‘लय भारी’
By admin | Published: March 5, 2015 12:21 AM2015-03-05T00:21:36+5:302015-03-05T00:25:35+5:30
‘यशवंत पंचायत राज’मध्ये प्रथम : कागल पंचायत समितीचा तिसरा क्रमांक
कोल्हापूर : यशवंत पंचायत राज अभियान तथा पंचायत सबलीकरण व उत्तरदायित्व प्रोत्साहन योजनेंतर्गत यंदा ‘अत्युत्कृष्ट’ म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यात प्रथम क्रमांक मिळवून ‘लय भारी’ ठरत तब्बल २५ लाखांच्या बक्षिसाची मानकरी झाली आहे. द्वितीय क्रमांक नाशिक, तर तृतीय क्रमांक सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने पटकाविला आहे. केंद्र शासनाकडून पंचायत राजव्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी २००५-०६ या वर्षापासून विभाग व राज्य अशा दोन्ही स्तरांवर ‘यशवंत पंचायत राज अभियान’ ही पुरस्कार योजना सुरू करण्यात आली. या योजनेतून प्रत्येक वर्षी पंचायत राज संस्थांमधून प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती यांना रोख बक्षीस, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविले जाते. शासकीय व्यवस्थापन, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, पूर्ण केलेले भौतिक व आर्थिक उद्दिष्ट, लेखापरीक्षण या महत्त्वाच्या मुद्द्यांवर मूल्यमापन केले जाते. विभागीय स्तरावर क्रमांक मिळविलेल्यांची राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी निवड होते. सन २०१४-१५ वर्षात येथील जिल्हा परिषदेने पुणे विभागात पहिला क्रमांक पटकावला व राज्य स्तरावरील क्रमांकासाठी पात्र ठरली होती. कोल्हापूरसह राज्यातील सहा विभागांतून पहिला क्रमांक मिळविलेल्या सहा जिल्हा परिषदा, नऊ पंचायत समित्या, ४२ ग्रामपंचायतींची तपासणी महिन्यापूर्वी झाली होती. त्याचा निकाल शासनाने मंगळवारी जाहीर केला आहे.विजेत्यांना मुंबई येथे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनी १५ मार्च रोजी जाहीर कार्यक्रम करून बक्षीस वितरण केले जाणार आहे. राज्यस्तरावर क्रमांक मिळविलेल्या जिल्हा परिषदांना अनुक्रमे २५ लाख, १५ लाख, १० लाख; तर पंचायत समित्यांना अनुक्रमे १५ लाख, १२ लाख, १० लाख असे रोख बक्षीस आणि स्मृतिचिन्ह दिले जाणार आहे. याशिवाय पुणे विभागात पहिला क्रमांक मिळविलेल्या कागल पंचायत समितीला दहा लाख, द्वितीय क्रमांक मिळविलेल्या गडहिंग्लज पंचायत समितीस सात लाख रुपये बक्षीस मिळणार आहे.
विजेते असे..
राज्यस्तरावरील अनुक्रमे जिल्हा परिषद - कोल्हापूर, नाशिक, सिंधुदुर्ग.
पंचायत समिती :
रेमणापूर (जि. लातूर), देवगड (जि. सिंधुदुर्ग), कागल (जि. कोल्हापूर).