कोल्हापूरकरांना संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेची पर्वणी, महाराष्ट्रासह सहा संघांचा सहभाग
By सचिन भोसले | Published: September 27, 2023 04:31 PM2023-09-27T16:31:04+5:302023-09-27T16:31:27+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन - विफाच्या माध्यमातून कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्टेडियमवर १३ ऑक्टोबर पासून राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा ७७ ...
कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन - विफाच्या माध्यमातून कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्टेडियमवर १३ ऑक्टोबर पासून राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा ७७ व्या संतोष ट्रॉफीतील एफ गटातील एकूण १५ सामने होणार आहेत. यात यजमान महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, लक्षद्वीप, अंदमान निकोबार, त्रिपुरा या संघांचा समावेश आहे. विशेष म्हणजे कोल्हापुरातील स्थानिक फुटबॉल पटूना महाराष्ट्र संघाकडून खेळण्याची अधिक संधी मिळण्याची शक्यता आहे.
मागील वर्षी याच मैदानावर संतोष ट्रॉफी तील काही सामने के.एस. ए. ने आयोजित केले होते. त्यात महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल संघ अंतिम स्पर्धेसाठी पात्र ठरला होता. सलग दुसऱ्या वर्षी ही संधी विफा चे उपाध्यक्ष व ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन चे अर्थ समितीचे उपाध्यक्ष मालोजीराजे यांच्या विशेष प्रयत्नातून कोल्हापूरला मिळाले आहे. छत्रपती शाहू स्टेडियमवर १३ ते २२ ऑक्टोंबर दरम्यान ग्रुप एफ मधील १५ सामने होणार आहेत.
१३ ऑक्टोबर पहिल्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता महाराष्ट्र विरुद्ध अंदमान निकोबार, त्यानंतर १५ ऑक्टोबर ला सकाळी ११.३० वाजता महाराष्ट्र विरुद्ध लक्षद्वीप यांच्यात सामना होणार आहे. सतरा ऑक्टोबर ला दुपारी ३.३० वाजता. आंध्र प्रदेश बरोबर होणार आहे. वीस ऑक्टोबर ला सकाळी ११.३० वाजता. त्रिपुराविरुद्ध, तर २२ ऑक्टोबर ला दुपारी ३.३० वाजता. तेलंगणा सोबत अखेरची लढत होणार आहे. राष्ट्रीय पातळीवरील फुटबॉल सामने पाहाण्याची फुटबॉल प्रेमींना यामुळे पुन्हा एकदा संधी मिळणार आहे.
कोल्हापूरच्या या खेळाडूंना संधी अधिक
कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू निखिल कदम, करण चव्हाण- बंदरे, अरबाज पेंढारी, ऋतुराज संकपाळ, ऋतुराज सूर्यवंशी, संकेत साळुंखे, प्रथमेश हे, प्रतीक बदामे,विशाल पाटील, राज अली यासह अन्य दोन असे बारा खेळाडूंमधून जास्तीत जास्त स्थानिक खेळाडूंना महाराष्ट्र संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. छत्रपती शाहू स्टेडियम हे होमटाऊन असल्याने या खेळाडूंना आपली कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे.