कोल्हापुरातील दिग्दर्शक अजय कुरणे यांचा ‘बलुतं’ ‘इफ्फी’मध्ये, मराठीतील अवघ्या दोनच लघुपटांचे होणार प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 07:46 PM2017-11-17T19:46:24+5:302017-11-17T20:47:58+5:30
गडहिंग्लजच्या शांताबाई यादव या महिला नाभिकाच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘बलुतं’ या मराठी लघुपटाचे प्रदर्शन सोमवार (दि. २०)पासून गोव्यात सुरू होणाऱ्या ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) होणार आहे.
संदीप आडनाईक
कोल्हापूर : गडहिंग्लजच्या शांताबाई यादव या महिला नाभिकाच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘बलुतं’ या मराठी लघुपटाचे प्रदर्शन सोमवार (दि. २०)पासून गोव्यात सुरू होणाºया ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) होणार आहे.
कोल्हापूरचे युवा दिग्दर्शक अजय कुरणे यांनी या लघुपटाचे दिग्दर्शन केले असून, लोकप्रिय अभिनेते स्वप्निल राजशेखर यांनी या लघुपटाची पटकथा लिहिली आहे. विशेष म्हणजे गोव्यात दाखविण्यात येणाऱ्या चित्रपट महोत्सवात इंडियन पॅनोरमा विभागात समाविष्ट असलेल्या अवघ्या दोनच मराठी लघुपटांमध्ये बलुतंचा समावेश आहे.
गोव्याच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दजेर्दार कथावस्तू असलेले ९ मराठी चित्रपट इंडियन पॅनोरमा विभागात यावर्षी दाखविण्यात येत आहेत. यंदा सर्वाधिक २६ मराठी चित्रपट शर्यतीत होते. शुक्रवारी जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार ‘बलुतं’ हा लघुपट प्रदर्शन २१ नोव्हेंबर रोजी आयनॉक्स टू स्क्रीनवर सायंकाळी ५.४५ वाजता दाखविण्यात येणार आहे.
प्रादेशिक विभागातर्फे मराठी भाषेतील अवघे दोनच लघुपट या महोत्सवात जगभरातील प्रेक्षकांसमोर दाखविण्यात येणार आहेत. त्यामध्ये कोल्हापूरचे युवा दिग्दर्शक अजय कुरणे यांच्या ‘बलुतं’ या लघुपटाचा यात समावेश आहे.
याशिवाय रोहन कानवडे यांचा ‘खिडकी’ हा लघुपटही या महोत्सवात दाखविण्यात येणार आहे. ‘बलुतं’ या लघुपटातून गडहिंग्लज येथील शांताबाई यादव या महिला नाभिकाच्या आयुष्यावर कुरणे यांनी प्रकाशझोत टाकला आहे. पुरुष नाभिकांच्या अधिकारक्षेत्रात जगण्यासाठी महिला नाभिक असलेल्या शांताबाइंनी आपला अधिकार कसा मिळविला, याचे चित्रण या छोटेखानी लघुपटात आहे.
पदार्पणातच १६ पुरस्कार
कोल्हापुरात वास्तव्य करणाऱ्या अजय कुरणे यांनी यापूर्वी विविध मालिका आणि चित्रपटांचे स्वतंत्रपणे दिग्दर्शन केले आहे. तुज्यात जीव रंगला, क्राइम पेट्रोलसारख्या मालिकांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. २०१६ मध्ये तयार केलेल्या ‘बलुतं’ या लघुपटाला विविध १६ पुरस्कार मिळालेले आहेत.
यामध्ये उत्कृष्ट पटकथा, उत्कृष्ट लघुपट, उत्कृष्ट छायाचित्रण, उत्कृष्ट अभिनेत्री, उत्कृष्ट दिग्दर्शन, उत्कृष्ट सिनेमॅटोेग्राफी या पुरस्कारांचा समावेश आहे. हा लघुपट आतापर्यंत हरियाणा, इंदापूर, नागपूर, पुणे, मुंबई, शेगाव, कोल्हापूर, छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, मुंबई आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव, सांगली, एपीजे अब्दुल कलाम फेस्टिव्हल, डॉन बास्को यूथ फिल्म फेस्टिव्हल, रामभाऊ चव्हाण शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल यासारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत दाखविण्यात आला आहे.
नवखे कलाकार
या लघुपटात तनुजा कदम, आर्या कुरणे यांच्यासह सर्व नवख्या कलाकारांनी काम केले आहे. निरिूल चुरी-कविता चुरी यांची निर्मिती असून लघुपटाची पटकथा लोकप्रिय अभिनेता स्वप्निल राजशेखर यांची आहे. या लघुपटात प्रत्यक्ष शांताबाई यादव यांनीही त्यांचीच छोटीशी भूमिका केली आहे.