गुजरातच्या प्रदर्शनात कोल्हापुरी कला

By admin | Published: December 24, 2014 11:45 PM2014-12-24T23:45:42+5:302014-12-25T00:02:37+5:30

कोल्हापूरचे चाळीस कलावंत : बडोदामध्ये १६ फेब्रुवारीपासून राष्ट्रीय कला प्रदर्शन

Kolhapuri art exhibition of Gujarat | गुजरातच्या प्रदर्शनात कोल्हापुरी कला

गुजरातच्या प्रदर्शनात कोल्हापुरी कला

Next

कोल्हापूर : बडोदा (गुजरात) येथे भरविण्यात येणाऱ्या स्पंदन नॅशनल आर्ट फेस्टिव्हल या राष्ट्रीय कला प्रदर्शनामध्ये कोल्हापुरातील तीन पिढ्यांचे कलावंत सहभागी होणार आहेत. एकशे चौसष्ठ वर्षांची परंपरा असलेल्या कोल्हापुरी स्कूलचे ४0 कलावंत १६ ते २५ फेब्रुवारी यादरम्यान दोन टप्प्यांत आपल्या कलाकृतींसह या राष्ट्रीय कला प्रदर्शनात सहभागी होणार आहे. परराज्यात एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने कोल्हापूरचे कलाकार सहभागी होण्याचा हा अलीकडील काळातील पहिलाच प्रसंग आहे.
बडोदा येथील आकृती आर्ट गॅलरी येथे भरणाऱ्या या प्रदर्शनामध्ये गुजरात आणि महाराष्ट्रातील चित्रकलेच्या विविध शैलींचीही देवाण-घेवाण होणार आहे. या प्रदर्शनामध्ये प्रत्येक कलावंतासाठी चार दिवस राखून ठेवण्यात आले असून त्या कलावंतांच्या चित्रांची विक्रीही या प्रदर्शनात होणार आहे.
ज्येष्ठ चित्रकार श्यामकांत जाधव यांच्यासह गतवर्षी चित्रकलेचे शिक्षण घऊन बाहेर पडणाऱ्या १९ वर्षीय नवोदित चित्रकारांचाही समावेश या प्रदर्शनामध्ये असणार आहे, हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य. आर्ट अ‍ॅसिलिटी या नावाने स्थापन झालेल्या आर्ट क्युरेटर विद्याश्री डाके यांच्या कला संस्थेचे वीस कलावंत गुजरात येथे जात आहेत. यावेळी चित्रकलेसोबत कोल्हापूरच्या शिल्पकलेचाही सहभाग या प्रदर्शनात आहे. क्रीएटिव्ह पेंटिंग, रिअ‍ॅलिटी पेटिंग, क्रिएटिव्ह क्लप्चर या प्रकारांचा समावेश या प्रदर्शनात असणार आहे.
स्पंदन नॅशनल आर्ट फेस्टिव्हल दरवर्षी विविध राज्यात भरते. यंदा ते गुजरातमध्ये बडोदा येथे भरत आहे. या प्रदर्शनामध्ये प्रत्येक राज्यातील कलावंतांना सहभागी करण्यात येते. असे असले तरी देशातील नामांकित आर्ट गॅलरीमध्ये एकाच शहरातील कलावंत इतक्या मोठ्या संख्येने अशाप्रकारच्या राष्ट्रीय कला प्रदर्शनात सहभागी होण्याचा हा अलीकडचा पहिलाच प्रसंग म्हणता येईल.

जगातील विविध ठिकाणी कोल्हापूरच्या कलापरंपरेचा गौरवही झाला होता; परंतु इतक्या मोठ्या संख्येने सहभागी होणारा कदाचित हा पहिलाच प्रसंग असेल. कोल्हापूरची आधुनिक कला यानिमित्ताने परराज्यातील कलाप्रेमींसाठी नजराना ठरू शकेल.
-अजय दळवी, प्राचार्य,
दळवीज आर्ट इन्स्टिट्युट, कोल्हापूर.


शाहू महाराज, राजाराम महाराजांनी चित्रकलेला प्रोत्साहन दिले, त्या पूर्वीच्या कोल्हापूर संस्थानामधून कलावंतांच्या स्वागतासाठी पूर्वीच्या बडोदा संस्थानचे राजे सयाजीराव गायकवाड यांच्या वारसदारांना या प्रदर्शनात सहभागी करुन घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
-अनंत विकास, संयोजक,
स्पंदन नॅशनल आर्ट फेस्टिव्हल, बडोदा.

Web Title: Kolhapuri art exhibition of Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.