‘कोल्हापुरी गुळा’ची चवच न्यारी, परदेशातही ठरतोय लय भारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2021 01:51 PM2021-12-09T13:51:24+5:302021-12-09T14:14:42+5:30
शेतकऱ्यांनी गूळनिर्मितीमध्ये बदल केल्याने ‘वड्या’, ‘मोदक’, ‘लहान ट्यूब’ या स्वरूपातही गूळ उपलब्ध होणे, हेच ग्राहकांच्या आकर्षणाचे कारण बनले आहे.
राजाराम लोंढे
कोल्हापूर : कोल्हापुरी गुळाला देशांतर्गत बाजारपेठेबरोबरच आता परदेशातही मागणी वाढली आहे. गेल्या सात-आठ महिन्यांत एक हजार टन गूळ निर्यात झाला आहे. टिकाऊपणा, कणीदार व शुद्धतेमुळे येथील गुळाला परदेशात मागणी वाढत आहे. त्यातच ५ ग्रॅमपासून १० किलो वजनात गूळ मिळत असून, बाजारातील मागणीप्रमाणे शेतकऱ्यांनी गूळनिर्मितीमध्ये बदल केल्याने ‘वड्या’, ‘मोदक’, ‘लहान ट्यूब’ या स्वरूपातही गूळ उपलब्ध होणे, हेच ग्राहकांच्या आकर्षणाचे कारण बनले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील सुपीक जमीन, पाणी व शेतकऱ्यांच्या कष्टांमुळे येथील गुळाने जगाला भुरळ घातली आहे. येथील गूळ पारंपरिक पद्धतीने तयार केला जात असला तरी काळानुरूप त्यामध्ये बदलही केेलेला आहे. हंगामात तयार होणाऱ्या गुळापैकी ९० टक्के गूळ हा गुजरातमध्ये जातो. उर्वरित गूळ स्थानिक व निर्यात होतो. गेल्या वर्षभरापासून परदेशात गुळाची मागणी काहीसी वाढली आहे. त्यामुळे गेल्या सात-आठ महिन्यात एक हजार टन गुळाची निर्यात झाली आहे. यामध्ये एक किलोसह वड्या, मोदक, पावडर आदींचा समावेश आहे. पूर्वी गुजरातमधून थेट गुळाची निर्यात व्हायची मात्र तेथे केवळ कोल्हापूरचा नव्हे देशातील इतर राज्यातूनही गूळ येतो. त्यामुळे टिकाऊपणा नसल्याने अलीकडे त्यांचे निर्यातीचे प्रमाण कमी झाले आहे.
येथे जातो कोल्हापुरी गूळ -
अमेरिका, सौदे अरेबिया, लंडन, दुबई, ऑस्ट्रेलिया.
अमेरिकेत ३००, तर मस्कतमध्ये १३० रुपये किलो
सध्या देशांतर्गत बाजारपेठेत गुळाच्या प्रतवारीनुसार ३५ ते ५० रुपये किलोपर्यंत दर आहेत. परदेशात तेथील आयात शुल्कानुसार दर पहावयास मिळतात. मस्कतमध्ये (सौदे अरेबिया) १३० रुपये, तर अमेरिकेत ३०० रुपये किलो दर आहे.
‘कोल्हापुरी गूळ’ म्हणूनच निर्यात
निर्यात पॅकिंगवर ‘कोल्हापुरी गूळ’ असा उल्लेख केला जातो. मूळ भारतीय वंशाचे परदेशातील लोकांना गुळाच्या रंगावरूनच तो कोणत्या राज्यातील आहे, हे समजते.
दिवाळीला गुळाचे गिफ्ट बॉक्स
कोल्हापुरातील शेतकऱ्यांबरोबरच व्यापाऱ्यांची ग्राहकांची बदलती मानसिकता जाणून घेणे व त्यानुसार गुळाची निर्मिती करण्याकडे कल असतो. त्यामुळेच दिवाळीसह इतर सणाला देण्यात येणाऱ्या गिफ्ट बॉक्समध्ये गुळाचा वापर सुरू आहे. गूळ पावडर, वड्या, काकवी याचा समावेश गिफ्ट बॉक्समध्ये असतो.
तुलनात्मक गुळाची आवक
महिना आवक रवे दर प्रतिक्विंटल
७ डिसेंबर २०२० ६,०८,२१७ ३२०० ते ३९०० रुपये
७ डिसेंबर २०२१ ७,०५,८०५ ३७०० ते ४२५० रुपये