रणधुमाळीत ‘कोल्हापुरी फटका’ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2015 11:28 PM2015-10-06T23:28:53+5:302015-10-06T23:55:02+5:30

मतदार जागृती अभियान : ७0 हून अधिक पोस्टर्स प्रसारित; उत्स्फूर्त दाद

'Kolhapuri Shot' viral in Rudhupala | रणधुमाळीत ‘कोल्हापुरी फटका’ व्हायरल

रणधुमाळीत ‘कोल्हापुरी फटका’ व्हायरल

googlenewsNext

संदीप आडनाईक - कोल्हापूर--महानगरपालिकेच्या निवडणुकीविषयी प्रबोधनासाठी चित्रकार, छायाचित्रकार विजय टिपुगडे यांनी खास कोल्हापुरी भाषेत टिप्पणी करणारी ७0 हून अधिक पोस्टर्स आतापर्यंत विविध सोशल मीडियावर प्रसारित केली आहेत. चित्र, छायाचित्राला मार्मिक शब्दरचनेची ‘कॅलिग्राफी’च्या माध्यमातून जोड देत ‘कोल्हापुरी फटका’ या नावाने ‘व्हायरल’ होणाऱ्या या आगळ्या-वेगळ्या मतदार जागृती अभियानाला प्रतिसाद मिळत आहे.
कोल्हापूरची मावळत्या सभागृहाने जी बदनामी केली, ती विजय टिपुगडे यांच्यासारख्या सर्वसामान्य कलाकाराला वेदनादायी वाटत होती. कोल्हापूरचे कलापूर हे नाव सातासमुद्रापार पोहोचले आहे, पण कोल्हापूरकर मात्र मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित आहेत.
मतदारांना वेगवेगळी आमिषे दाखविली जातात. त्याला बळी पडायचे का? वैयक्तिक स्वार्थाचा विचार करायचा की शहराच्या विकासाचा, लोकांचे प्रतिनिधी म्हणून सभागृहात जाणाऱ्यांनी कोणती ‘संस्कृती’ तयार केली आहे? याचा पथनाट्य, पोस्टर्स, कविता अशा विविध माध्यमांतून विचार करायला भाग पाडण्याचे काम टिपुगडे यांच्या या खास कोल्हापुरी भाषेत टिप्पणी करणाऱ्या या पोस्टर्सने केले आहे. त्याला इतका प्रतिसाद मिळाला आहे, की अनेकांनी हे पोस्टर्स सर्वच सोशल मीडियावर फॉरवर्ड केले आहेत. तीच पोस्टर परतून पुन्हा टिपुगडे यांच्याकडेच फॉरवर्ड होऊन आले आहे. याउलट ज्यांना हा फटका बसला आहे, त्यांनी तर हा फटका बंद करण्याची चक्क धमकीच दिल्याचे टिपुगडे यांनी सांगितले.
ते म्हणाले, मतदार जागृती अभियान ठोस विचाराने सुरू केले. किमान थोडातरी बदल होईल. सभागृहात किमान काही चांगले चेहरे यावेत, ही प्रत्येकाची अपेक्षा आहे. त्यासाठी मतदार जागृती हा प्राथमिक प्रयत्न आहे. याचाच एक भाग म्हणून सोशल मीडियावर काही विडंबनात्मक पोस्टर प्रसारित करत आहे.


लवकरच प्रदर्शन
विजय टिपुगडे व त्यांचे समविचारी सहकारी या कलाकृतींचे पथनाट्य, पोस्टर्स, कविता अशा विविध माध्यमांतून कोल्हापुरातील विविध प्रभागात फिरते प्रदर्शन भरविणार आहेत. ज्यांना निव्वळ प्रबोधनासाठी याचा वापर करावयाचा आहे, त्यांना कलासाधनातर्फे हे सर्व डिझाईन, पोस्टर्स जनजागृतीसाठी विनामूल्य देण्याची तयारी टिपुगडे यांनी दाखविली आहे.


व्हॉटस् अ‍ॅप, फेसबुक, टिष्ट्वटरवर चर्चा
चित्र, छायाचित्राला मार्मिक शब्दरचनेची जोड देत ‘कॅलिग्राफी’तील ही पोस्टर्स लक्षवेधी ठरत आहे. ‘व्हॉटस् अ‍ॅप’वर विजय टिपुगडे यांनी कोल्हापुरी फटका या नावाने ग्रुप सुरू केला आहे. ‘फेसबुक’च्या ‘वॉल’वरही ही पोस्टर्स झळकत आहेत. त्याला भरपूर ‘लाईक’ही मिळत आहेत. अनेकजण ही पोस्टर्स ‘शेअर’ करत आहेत. टिष्ट्वटरवरही अल्पावधीतच या पोस्टर्सच्या ‘पोस्ट’वर गंभीरपणे चर्चा सुरू आहे. ‘आॅनलाईन’ असल्याने आतापर्यंत ७0 हून अधिक पोस्टर्स अनेक ठिकाणी ‘व्हायरल’ झाली आहेत.


येणाऱ्या सभागृहामध्ये किमान काही चांगले चेहरे यावेत ही नागरिकांची अपेक्षा आहे. त्यासाठी मतदार जागृतीचा भाग म्हणून सोशल मीडियावर काही विडंबनात्मक पोस्टर्स मी प्रसारित केली. त्याला युवकांकडून भरघोस प्रतिसाद मिळतो आहे. काही महाभाग याचा स्वत:च्या प्रचारासाठी गैरवापर करीत आहेत. या डिझाईनचा वापर फक्त सामाजिक संस्थांसाठी आहे. इतर कोणत्याही उमेदवाराने अथवा डिजिटल व्यावसायिकाने याचा वापर केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- विजय टिपुगडे, कलासाधना मंच

Web Title: 'Kolhapuri Shot' viral in Rudhupala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.