‘कोल्हापुरी चप्पल’ उद्योगाला विद्यापीठाचे बळ, चर्मवस्तू उत्पादक संघासमवेत सामंजस्य करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 11:33 AM2018-10-26T11:33:03+5:302018-10-26T11:35:32+5:30

करवीरनगरीची वेगळी ओळख असलेल्या ‘कोल्हापुरी चप्पल’ उद्योगाला आता शिवाजी विद्यापीठाचे बळ मिळणार आहे. विद्यापीठाने कोल्हापुरी चप्पल क्लस्टरबाबत जिल्हा चर्मवस्तू उत्पादक संघासमवेत सामंजस्य करार केला.

 'Kolhapuri slippers' association with the University's strength, leather goods producer team | ‘कोल्हापुरी चप्पल’ उद्योगाला विद्यापीठाचे बळ, चर्मवस्तू उत्पादक संघासमवेत सामंजस्य करार

कोल्हापुरात गुरुवारी शिवाजी विद्यापीठ आणि जिल्हा चर्मवस्तू उत्पादक संघ यांच्यात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे आणि ‘क्लस्टर’चे अध्यक्ष अशोक गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी शेजारी जी. एस. गोकावी, ए. एम. गुरव, डी. टी. शिर्के, व्ही. एन. शिंदे, पी. एन. भोसले, व्ही. टी. पाटील, आदी उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)

Next
ठळक मुद्दे ‘कोल्हापुरी चप्पल’ उद्योगाला विद्यापीठाचे बळचर्मवस्तू उत्पादक संघासमवेत सामंजस्य करारक्लस्टर योजनेचा होणार उपयोग

कोल्हापूर : करवीरनगरीची वेगळी ओळख असलेल्या ‘कोल्हापुरी चप्पल’ उद्योगाला आता शिवाजी विद्यापीठाचे बळ मिळणार आहे. विद्यापीठाने कोल्हापुरी चप्पल क्लस्टरबाबत जिल्हा चर्मवस्तू उत्पादक संघासमवेत सामंजस्य करार केला.

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सभागृहात झालेल्या या सामंजस्य करारप्रसंगी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. ए. एम. गुरव, रसायनशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. जी. एस. गोकावी, डॉ. गजानन राशिनकर, आदी उपस्थित होते.

सामंजस्य करारावर प्रभारी कुलसचिव डॉ. शिंदे आणि क्लस्टरचे अध्यक्ष अशोक गायकवाड यांनी स्वाक्षऱ्या केल्या. रसायनशास्त्र विभागाचे डॉ. पी. एन. भोसले यांनी कोल्हापुरी चप्पलच्या संशोधन व संवर्धनासाठी गेल्या अनेक वर्षांपासून केलेल्या कामाची माहिती दिली. दरम्यान, या क्लस्टर आणि सामंजस्य कराराच्या माध्यमातून अद्ययावत कॉमन फॅसिलिटी सेंटर सुरू करणे, आधुनिक कलाकुसरीसाठी कारागिरांना प्रशिक्षण देणे, महिला कारागिरांसाठी सेल्फ हेल्प ग्रुप तयार करणे, शिवाजी विद्यापीठ अधिविभागामार्फत अनॅलिसिस मार्केटिंगसाठी चर्चासत्रे, लॅबोरेटरी, लायब्ररी संशोधनासाठी सुविधा पुरविणे. पेटंटसाठी प्रस्ताव सादर करणे, उद्योजक तयार होण्यासाठी व स्वयंरोजगारासाठी शॉर्ट टर्म कोर्सेस या सुविधा मिळणार आहेत.

 

क्लस्टरची वाटचाल
कोल्हापुरी चप्पल उद्योगाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी केंद्र शासनाने ‘एमएसएमई सीडीपी’ या योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्हा चर्मवस्तू उत्पादक विक्रेता संघटनेस कोल्हापुरी चप्पल क्लस्टर म्हणून दि. २४ जुलै २००८ ला पत्र दिले. ‘मिटकॉन’ या संस्थेने प्राथमिक निदानात्मक अहवाल पूर्ण करून लघुउद्योग मंत्रालयाला सादर केला. हा अहवाल मंजूर होऊन शासनाने क्लस्टर उभारणीसाठी १५ कोटी रुपयांची तरतूद केली. आरोग्याच्या दृष्टीने गुडघेदुखी, पायांची जळजळ, डोळे रखरखणे, मधुमेह, रक्तदाब, सुरळीत रक्ताभिसरण यांसाठी कॉपर सर्किट, मॅग्नेट, कुशनिंगचा वापर करून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ‘डॉक्टर कोल्हापुरी चप्पल’ची निर्मिती करण्याचा क्लस्टरचा मुख्य उद्देश असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
 


या सामंजस्य कराराद्वारे तरुण उद्योजक निर्माण करण्यासह जुन्या उद्योगांची क्षमतावर्धन करण्याची संधी निर्माण झाली आहे. त्यामध्ये शिवाजी विद्यापीठ इनोव्हेशन, इन्क्युबेशन, जागतिक लिंकेजिस आणि संशोधन या क्षेत्रांमध्ये सर्वतोपरी साहाय्य करील.
- कुलगुरू,
डॉ. देवानंद शिंदे

शहरी, ग्रामीण भागांमधील लघुउद्योजकांपर्यंत नवनवे तंत्रज्ञान पोहोचविणे; दर्जेदार कोल्हापुरी चप्पलची निर्मिती करणे; उत्पादकांना सर्व सोर्इंनिशी योग्य दर मिळवून देणे; नवीन उद्योजक, तंत्रज्ञ व तंत्रज्ञान निर्माण करणे हा क्लस्टरचा उद्देश आहे.
- अशोक गायकवाड
 

 

Web Title:  'Kolhapuri slippers' association with the University's strength, leather goods producer team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.