जगभरात प्रसिद्ध कोल्हापुरी चप्पलला ‘जीआय’ मानांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 12:51 AM2019-06-20T00:51:32+5:302019-06-20T00:52:48+5:30
कोल्हापूरची शान असलेल्या कोल्हापुरी चपलांना ‘जीआय’ अर्थात ‘भौगोलिक मानांकन’ प्राप्त झाले आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. परिणामी, जगभरात कोल्हापुरी चपलाची शान वाढली आहे.
कोल्हापूर : कोल्हापूरची शान असलेल्या कोल्हापुरी चपलांना ‘जीआय’ अर्थात ‘भौगोलिक मानांकन’ प्राप्त झाले आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. परिणामी, जगभरात कोल्हापुरी चपलाची शान वाढली आहे. आतापर्यंत देशभरातील ३२६ उत्पादनांना भौगोलिक मानांकन प्राप्त झाले असून, महाराष्टतील ३२ उत्पादनांचा यात समावेश आहे. यांपैकी कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापुरी गूळ आणि कोल्हापुरी चप्पल ही दोन उत्पादने आहेत.
गेल्या आठ-दहा वर्षांपासून कोल्हापुरी चपलांना ‘जीआय’ मानांकन मिळावे यासाठी कोल्हापुरातील चर्मकार समाजाच्यावतीने प्रयत्न सुरू होते. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता; पण जीआय मानांकनात शासनाने कोल्हापूरसह कर्नाटकातील जिल्ह्यांचा समावेश केल्याने कोल्हापुरातील चर्मकार समाजाकडून नाराजीचा सूर उमटत आहे. कर्नाटकात बनविणाऱ्या चपला या दर्जाहीन आणि बनावट असल्याच्या प्रतिक्रिया कोल्हापुरातील व्यावसायिकांतून उमटत आहेत.
याबाबत कोल्हापुरातील संत रोहिदास चर्मोद्योग आणि कोल्हापूर चप्पल औद्योगिक समूहाने (क्लस्टर), चर्मोद्योग विकास महामंडळाने नाराजी व्यक्त करून केंद्र आणि राज्य शासनांचा निषेध नोंदविला आहे. महाराष्टÑातील कोल्हापूरसह कर्नाटकातील अथणी भागात तयार केल्या जाणाºया चपलांनाच मानांकन देण्यात आले आहे. या व्यतिरिक्त इतर जिल्ह्णांत तयार होणाºया चपलांना कोल्हापुरी चप्पल ही ओळख प्राप्त होणार नाही. त्यामुळे कोल्हापुरी चपलाच्या नावाने सुरू असलेला बनावट धंदा कमी होण्यास मदत होणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्णाचा खरा हक्क असलेल्या या चपलाच्या बाजारात कालांतराने कर्नाटकानेही शिरकाव केला आहे. त्यानुसार त्यांनीही भौगोलिक मानांकनासाठी मागणी केली होती.
उच्च न्यायालयात तक्रार करणार
कोल्हापुरी चपलावर ‘जीआय’ मानांकनाचा फक्त कोल्हापूरचा हक्क असल्याने कर्नाटकातही ‘जीआय’ मानांकनाचा प्रस्ताव मंजूर करणाºया केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध नोंदवून या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे कोल्हापुरी चप्पल औद्योेगिक समूहाचे संचालक भूपाल शेटे यांनी सांगितले.
कोल्हापूरची शान
कोल्हापूर जिल्ह्याची शान म्हणून कोल्हापुरी चपलाला जगभरात मान आहे. राजर्षी शाहू महाराजांनीही हा कोल्हापूरची विशेष कला असलेला व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी चर्मकार समाजाला मदत केली होती. त्यामुळे कोल्हापुरात अनेक जणांनी कोल्हापुरी चपला बनविण्याची खासियत आजही जपली आहे.
कोल्हापुरी चप्पलचे मानांकन आठ जिल्ह्यांना
महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांतील तसेच कर्नाटकातील धारवाड, बेळगाव, बागलकोट आणि विजापूर या जिल्ह्यांत बनविण्यात येणाºया कोल्हापुरी चपलला ‘जीआय’ मानांकन देण्यात आले आहे. कोल्हापूरसह महाराष्ट्रातील व कर्नाटकातील या जिल्ह्यांचा समावेश केल्याने केंद्र व राज्य शासनाचा कोल्हापुरातील चर्मकार व्यावसायिकांनी निषेध केला आहे.
‘कोल्हापुरी चप्पल’ ही फक्त कोल्हापुरातच बनते. कर्नाटकातील धारवाड, बागलकोट, बेळगाव, विजापूर व इतर ठिकाणी कोल्हापूरच्या नावावर बनावट चप्पला तयार होतात. त्यांनी कोल्हापुरी चपलांचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे कर्नाटकातील कोल्हापुरी चपलांना जीआय मानांकन देणे म्हणजे कोल्हापूरच्या चप्पल कारागिरांवर अन्याय होणार आहे.
- भूपाल शेटे (उपमहापौर), संचालक, कोल्हापुरी चप्पल औद्योगिक समूह (क्लस्टर).