ऑस्करविजेत्या 'नाटू नाटू'ला कोल्हापुरी टच, गाण्यांसाठी दिले स्पेशल इफेक्टस
By संदीप आडनाईक | Published: March 13, 2023 05:52 PM2023-03-13T17:52:48+5:302023-03-13T17:56:01+5:30
कोल्हापूरच्या तीन कलाकारांनी त्यांच्या स्टुडिओत या गाण्यांना स्पेशल इफेक्ट्स दिले
संदीप आडनाईक
कोल्हापूर : ‘बाहुबली’चे दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा ब्लॉकबस्टर ‘आरआरआर’मधील नाटू नाटू या गाण्याने ऑस्कर जिंकल्याने या चित्रपटाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. देश-परदेशात बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने विक्रमी कमाई केली आहे. कोल्हापूरकरांचा या ऑस्करविजेत्या गाण्याच्या यशात वाटा आहे. नाटू नाटूसह दोन गाण्यांचे व्हीएफएक्सचे एडिटिंग कोल्हापुरात झाले आहे. चित्रपटातील ‘जननी’ गाण्यातील शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा वापर यात खास कोल्हापुरी टच आकर्षण बनले आहे. येथील तीन कलाकारांनी त्यांच्या स्टुडिओत या गाण्यांना स्पेशल इफेक्ट्स दिले आहेत.
राशिवडे (ता. राधानगरी) येथील मधुर अजित चांदणे आणि कोल्हापूरचा वसीम मुल्लाणी हे चौदा वर्षांपासून व्हीएफएक्स क्षेत्रात काम करत आहेत. त्यामुळे त्यांनी सहा वर्षांपूर्वी रुईकर कॉलनी येथे ‘कीफ्रेम स्टुडिओ’ ही इन्स्टिट्यूट सुरू केली. येथे अभ्यासक्रम शिकविण्याबरोबरच निर्मिती करण्यात येते. जवळपास दीडशेहून अधिक विद्यार्थी येथून शिकून बाहेर पडले आहेत.
राम चरण, ज्युनिअर एनटीआर, अजय देवगण, आलिया भट आणि श्रीया सरन यांच्यावर चित्रित केलेल्या सिनेमातील ‘नाटू नाटू आणि ‘जननी’ या गाण्यांनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या सिनेमातील या दोन गाण्यांसाठी कोल्हापुरातील रुईकर कॉलनी येथील ‘कीफ्रेम स्टुडिओ’चे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी व्हीएफएक्सचे काम पाहिले. या गाण्यांवर १५ जणांच्या टीमसह ५० विद्यार्थ्यांनी दोन महिने काम केले. या काळात ९० हून अधिक दृश्यांचे संकलन त्यांना करावे लागले.
या चित्रपटांचेही व्हीएफएक्स येथेच झाले
चांगला अनुभव असल्यामुळे त्यांना यशराज फिल्मस, प्राईम फोकस, रेड चिलीज, एनवाय व्हीएफएक्सवाला यासारख्या मोठ्या कंपन्यांकडून काम मिळाले. यापूर्वी या टीमने ‘टोटल धमाल, बाहुबली २, ८३, सिम्बा, घायल वन्स अगेन, व्हाय आय किल्ड गांधी’, ‘ब्रम्हास्त्र’ या हिंदी तसेच ‘माऊली, हिरकणी’सारख्या मराठी चित्रपटांबरोबरच ‘रंगबाज, ब्रिद, प्रोजेक्ट ९१९१, गुरू, प्यारवाली लव्ह स्टोरी’, नेटफ्लिक्सवरील ‘द कपिल शर्मा शो’ यासारख्या वेबसिरीज तसेच आयपीएलच्या यापूर्वीच्या दोन्ही सिझनच्या जाहिरातींचे एडिटिंग केले आहे.
या चित्रपटातील अनेक चित्तथरारक प्रसंग प्रत्यक्ष शूट न करता कॉम्प्युटर ग्राफिक्सच्या मदतीने समोर घडतायेत, असे व्हिज्युअल इफेक्ट या स्टुडिओत दिले. ती ऑन-स्क्रीन इमेजरीची निर्मिती किंवा हाताळणी आहे. -विशाल गुडाळकर, ‘कीफ्रेम स्टुडिओ’, कोल्हापूर.