कोल्हापुरी ऐक्याच्या परंपरेला तिलांजली

By admin | Published: June 2, 2014 01:15 AM2014-06-02T01:15:26+5:302014-06-02T01:17:23+5:30

हिंदूंची भक्कम तटबंदी

Kolhapuri unleashed a tradition of unity | कोल्हापुरी ऐक्याच्या परंपरेला तिलांजली

कोल्हापुरी ऐक्याच्या परंपरेला तिलांजली

Next

प्रशांत साळुंखे, कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ‘फेसबुक’वर विटंबना करणारे फोटो प्रसिद्ध झाले अन् कोल्हापूरमधील शिवप्रेमींतून एकच उद्रेक झाला. ज्या समाजकंटकाने हे कृत्य केले आहे, त्याचा मोर्चा, निदर्शनाद्वारे निषेध करण्याऐवजी काही तरुणांकडून सामान्य जनतेला वेठीस धरले गेले. अनेक दुकानांची त्यांच्याकडून लूट झाली. पर्यटकांच्या गाड्याही फोडल्या गेल्या. शिवरायांच्या राज्यकारभारात मुस्लिम समाजही पुढे होता, हा इतिहास विसरून ‘त्या’ तरुणांनी मशिदींवर चाल केली. हा घडलेला कोल्हापूरच्या इतिहासातील पहिलाच प्रकार शनिवारी पुरोगामित्त्वाला ‘काळिमा’ फासणारा ठरला. देशात १९९२ ला बाबरी मशीद दंगल घडली, त्यावेळी कोल्हापूरमध्ये उद्रेक होऊ नये यासाठी एन. डी. पाटील, गोविंदराव पानसरे, विष्णुपंत इंगवले, सखारामबापू खराडे या ज्येष्ठ मंडळींबरोबरच बहुजन समाजातील अनेक व्यक्ती पेठांमधील गल्ल्यांमध्ये जाऊन आवाहन करीत होते. मिरजेमध्ये ज्यावेळी हिंदू-मुस्लिम दंगल घडली, त्यावेळी त्याचा काडीमात्रही कोल्हापूरवर परिणाम झाला नाही. अशा अनेक घटना आहेत, देशात कोठेही काहीही होवो, मात्र शिवशाहूंचा वारसा लाभलेल्या पुरोगामित्वामुळे कोल्हापूरच्या हिंदू-मुस्लिम समाजात ऐक्य राहिले. मोहरम हा सण दोन्ही समाजाकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अनेक ठिकाणी मशिदीमध्ये गणपती बसविला जातो. मुस्लिमांवर होणार्‍या अत्याचारामुळे शाही इमाम यांनी १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारी हा काळा दिवस पाळण्यात यावा, असे भारतातील मुस्लिम जनतेला आवाहन केले होते. मात्र देशात सर्वप्रथम कोल्हापूरमधील मुस्लिम बोर्डाने या आवाहनाला विरोध करून सामाजिक बांधिलकी दाखविली. सीमेवर भारताच्या दोन जवानांचे शीर अतिरेक्यांनी कापून नेले. त्याचाही निषेध कोल्हापूरातील मुस्लीम समाजाने केला. पाकिस्तानचा झेंडाही जाळून आपला राग व्यक्त केला. हा कोल्हापूरचा इतिहास आहे. अनेक वर्षांपासून हा सामाजिक सलोख्याचा वारसा चालत आला आहे. मात्र, शनिवारी या वारशाला तडा १५ ते २५ वयोगटातील तरुणांनी दिला. या तरुणांना ना कोल्हापूरच्या पुरोगामित्वाबद्दल, ना शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल अभ्यास आहे. शेतकर्‍यांच्या पिकाच्या देठालाही धक्का लागता कामा नये, अशी शिवरायांची विचारसरणी होती. मात्र, ही विचारसरणी धुळीस मिळवून या तरुणांनी तोडफोड तर केलीच, त्याचबरोबर दुकानांमधील साहित्यांची लूटही केली. कोल्हापूरच्या महालक्ष्मी दर्शनासाठी आलेल्या पर्यटकांच्या गाड्याही फोडल्या. या सामान्य लोकांनी शिवरायांची बदनामी केली का? ज्याने हे कृत्य केले तो कोणासही माहीत नाही, मात्र कोल्हापूरमधील सर्वसामान्य हिंदू-मुस्लिम जनताच यासाठी वेठीस धरली गेली. या तरुणांना आवर घालण्यासाठी कोणताही नेता रस्त्यावर उतरला नाही, हा येथील नेतृत्वाचा पराभव आहे. हिंदूंची भक्कम तटबंदी शिवाजी पुतळा येथून अनेक तरुण बेभान होऊन मशीद तसेच मुस्लिमांच्या घरांवर चालून गेले. त्यावेळी नगरसेवक आदिल फरास यांचे घरही टारगेट करण्यात आले होते. मात्र बालगोपाल तालमीचे निवासराव साळोखे, संजय साळोखे, सुनील पिसे या ज्येष्ठ कार्यकर्त्यांसह पन्नास कार्यकर्त्यांनी फरास यांच्या घराला संरक्षण दिले. त्यांच्या घराकडे येणार्‍या तरुणांना या हिंदू समाजाच्या ‘तटबंदी’ने परतावून लावले. असाच हा पहारा आज(रविवार) सकाळपर्यंत होता. ‘एस.पीं’ची तत्परता कामाला तणाव निवळला : हिंदुत्ववाद्यांसह मुस्लीम नेत्यांशी ठेवला समांतर संपर्क कोल्हापूर : माथेफिरूने फेसबुकवर केलेल्या आक्षेपार्ह अपलोडमुळे शनिवारी रात्रीपासून कोल्हापूर शहर जातीय तणावाखाली होते. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसह मुस्लीम समाजातील नेत्यांशी समांतर संपर्क ठेवून होते. शिवसेनेला मोर्चा व अभिषेक कार्यक्रमापासून परावृत्त केले. तर मुस्लीम नेत्यांना संयम राखण्याचे आवाहन केले. रविवारी दिवसभर शिवाजी चौकात थांबून शर्मा यांनी परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. शनिवारी मध्यरात्री जमाव प्रक्षुब्ध होऊ लागल्याचा निरोप मिळताच रात्री सव्वाच्या सुमारास डॉ. शर्मा यांनी शिवाजी चौक गाठला. जमावाला शांततेचे आवाहन केले. दंगेखोरांना काबू करण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करण्याची मुभा त्यांनी दिली. दरम्यान, रविवारी सकाळी डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी सकाळपासून शिवसेनेसह हिंदुत्ववादी गटाच्या सर्व कार्यकर्त्यांना घटनेचे गांभीर्य समजावून सांगितले. मोर्चा रद्द झाल्याने शहरातील निम्मा तणाव निवळला. यानंतर डॉ. शर्मा यांनी मुस्लीम संघटनांच्या नेत्यांची मुस्लीम बोर्डिंग येथे भेट घेतली. दंगेखोरांना कोणत्याही परिस्थितीत अटक केली जाईल. दहशतीचा प्रकार पुन्हा घडणार नाही याची खात्री दिली. यामुळे शहरातील तणाव निवळण्यास मदत झाली.

Web Title: Kolhapuri unleashed a tradition of unity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.