बेभरवशाच्या विमानसेवेला वैतागले कोल्हापूरकर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 05:52 AM2021-11-15T05:52:05+5:302021-11-15T05:52:28+5:30
एसटीचा संप सुरू असल्याने राज्यभरात विमानसेवेला मागणी वाढली आहे. त्याचा फायदा करून घेण्याऐवजी कोल्हापूर - मुंबई मार्गावरील विमान फेऱ्या अचानक रद्द केल्या जात आहेत
मुंबई : मुंबई - कोल्हापूर विमानसेवेला अनियमिततेचे ग्रहण लागल्याने प्रवासी वैतागले आहेत. आठवड्यातून तीन दिवस चालणारी ही सेवा बहुतांशवेळा बंद असते. त्यामुळे आगाऊ बुकिंग केलेल्या प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
एसटीचा संप सुरू असल्याने राज्यभरात विमानसेवेला मागणी वाढली आहे. त्याचा फायदा करून घेण्याऐवजी कोल्हापूर - मुंबई मार्गावरील विमान फेऱ्या अचानक रद्द केल्या जात आहेत. त्यामुळे प्रवाशांना वन-स्टॉपओव्हर फ्लाइटसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. त्यासाठी बंगळुरू किंवा बेळगावला जाणाऱ्या विमानांचा आधार घ्यावा लागतो, असे प्रवासी वैभव पाटील यांनी सांगितले.
ट्रुजेट ही कंपनी मंगळवार, बुधवार व गुरुवारी मुंबई-कोल्हापूर मार्गावर विमानसेवा देते. पण या विमानावर भरवसा ठेवून तातडीच्या कामासाठी जायचे झाल्यास अचानक फेरी रद्द केल्याचा मेसेज येतो, अशी माहिती प्रवासी कुशल शेंडगे यांनी दिली. ७२ आसनी एटीआर विमान या मार्गावर तैनात करण्यात आले आहे. फेरीगणिक सरासरी ६० पेक्षा अधिक बुकिंग असते. यासंदर्भात विमान कंपनीच्या प्रवक्त्यांशी ई-मेलद्वारे संपर्क केअसता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.