कोल्हापूरकर धावले ‘बिनधास्त’ : ‘लोकमत महामॅरेथॉन’ला उदंड प्रतिसाद
By संदीप आडनाईक | Published: January 8, 2023 09:53 PM2023-01-08T21:53:45+5:302023-01-08T21:56:33+5:30
महाराष्ट्रभर लोकप्रियतेच्या शिखरावर पोहाेचलेल्या तसेच प्रत्येक वर्षी कमालीची उत्कंठा वाढविणाऱ्या ‘लोकमत महामॅरेथॉन’ स्पर्धेत रविवारी कोल्हापूरसह राज्यभरातून आलेले हजारो स्पर्धक अगदी ‘बिनधास्त’ धावले.
कोल्हापूर : महाराष्ट्रभर लोकप्रियतेच्या शिखरावर पोहाेचलेल्या तसेच प्रत्येक वर्षी कमालीची उत्कंठा वाढविणाऱ्या ‘लोकमत महामॅरेथॉन’ स्पर्धेत रविवारी कोल्हापूरसह राज्यभरातून आलेले हजारो स्पर्धक अगदी ‘बिनधास्त’ धावले. या महामॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने बोचऱ्या थंडीतील प्रसन्न वातावरणात स्पर्धकांसह क्रीडा रसिक, शालेय विद्यार्थी, झांजपथकांनी एक सळसळता उत्साह निर्माण केला आणि हा क्षण एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवला. व्यावसायिक धावपट्टूबरोबरच, हौशी धावपट्टूंचा विशेषत: महिला व लहान मुलांचा सहभाग लक्षवेधी ठरला.
‘लोकमत’चे इव्हेंट म्हणजे भन्नाटच..! वेगळेपण, उत्कंठावर्धक, लक्षवेधी, जोश, उत्साह अशा विशेषणांनी या इव्हेंट क्रीडा रसिकांच्या स्मरणात दीर्घकाळ राहतात. त्याचीच प्रचिती रविवारच्या महामॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा एकदा कोल्हापूरकरांना आली. ‘लोकमत’ने आवाहन करताच हजारो खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला. ‘भागो बिनधास्त’ ही टॅगलाइन असलेल्या स्पर्धेला क्रीडा रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाल्याने चार दिवस अगोदरच खेळाडूंची नोंदणी थांबवावी लागली. त्यामुळे अनेक खेळाडूंना सहभाग घेता आला नाही; परंतु, त्यांनी सहभागी खेळाडूंचा उत्साह मात्र रस्त्यावर येऊन वृद्धींगत केला.
रविवारची पहाट कोल्हापूरकरांसाठी जोश, सळसळता उत्साह घेऊन उगवली. एरवी शांत असणारे रस्ते पहाटे साडेचार वाजल्यापासून खेळाडू, नातेवाईक, क्रीडा रसिकांच्या गर्दीने गजबजून गेले. त्यामुळे पोलिस कवायत मैदानावरील शांतता खेळाडूंच्या लगबगीने, ढाेल- ताशाच्या गजराने भेदली. मैदानावरील चैतन्यमय माहौल पाहून खेळाडू, त्यांचे नातेवाईक भारावून गेले. ‘बिनधास्त’ धावण्यासाठी सज्ज झाले. प्रत्यक्ष धावण्यापूर्वी खेळाडूंनी गाणी तसेच संगीताच्या ठेक्यावर वॉर्मअप केला.
अखेर उत्कंठा संपली....
सकाळी सहा वाजता २१ किलोमीटर हाफ मॅरेथॉनला उपस्थित मान्ववरांची झेंडा दाखविला. हाफ मॅरेथॉन ही व्यावसायिक धावपट्टूंसाठी असल्याने पाच...चार...तीन...दोन... एक असे म्हणत झेंडा दाखविताच क्षणाचाही विलंब न करता धावपट्टूंनी आपल्या लक्ष्याच्या दिशेने धाव घेतली. या गटात राज्यभरातील विविध शहरात होणाऱ्या महामॅरेथॉन स्पर्धेतील स्पर्धकही भोठ्या संख्येने सहभागी झाले. त्यानंतर अर्ध्या तासाने दहा किलोमीटर पॉवर रनला सुरुवात झाली.
मान्यवरांची उपस्थिती
पालकमंत्री दीपक केसरकर, माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ, आमदार ऋतुराज पाटील, प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, माजी आमदार चंद्रदीप नरके, गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील, प्रा. सविता शिंदे, प्रा. अजय उगले (एमआयटी पुणे), चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, जनसुराज्य शक्तीचे समित कदम, वारणा दूध संघाचे संचालक प्रदीप देशमुख, राजवर्धन मोहिते, अभिजित पाटील, इंडोकौंटचे प्लान्टहेड शैलेश सरनोबत, विद्या आराधनाचे संचालक संजय लड्डा, भाजपाचे महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे, सिद्धीविनायक रुग्णालयाचे संचालक डॉ. संदीप पाटील, कृष्णा कॉलेज ऑफ फिजिओथेरपी कराडचे डॉ. प्रसनजीत निकम, कृष्णराज महाडिक, ‘लाेकमत’चे सहायक उपाध्यक्ष मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले, आशिष शेट्टी, राजेंद्र पाटील, रामचंद्र पुजारी, उत्तम कणेरकर, सचिन माने, नवनाथ सूर्यवंशी, शहाजी भापकर अन्य मान्यवर उपस्थित होते.
हौशी धावपट्टूंनी वाढविली रंगत
स्पर्धेतील पाच किलोमीटर फन रन आणि तीन किलोमीटर फॅमिली रनमध्ये मोठ्या संख्येने स्पर्धकांनी भाग घेतला. या दोन्ही गटात तीन वर्षांपासून सत्तरी गाठलेल्या स्पर्धकांनी भाग घेताना ‘हम भी फिट है’ याची साक्ष देत धावले. या गटात अनेक कुटुंबातील आई, वडील, मुले असा एकत्रित भाग घेत धावण्याचा आनंद लुटला. कधी धावत, तर कधी चालत जात त्यांनी स्पर्धेचे अंतर पूर्ण करत उपस्थितांची मने जिंकली. स्पर्धेत शासकीय, महानगरपालिका, पोलिस विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही धावण्याचा मोह आवरला नाही. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही स्पर्धा पूर्ण करत आपली शारीरिक तंदुरुस्ती सिद्ध केली.
जोश वाढविणारे वातावरण
चारही गटातील स्पर्धेच्या मार्गावरील वातावरण जोश वाढविणारे होते. चौकाचौकात, प्रमुख रस्त्यावर झांजपथक, बँडपथक, ढोल- ताशे पथक, लेझीम पथकातील वादकांनी वाद्यांचा दणदणाट करीत स्पर्धकांना ‘चेअरअप’ केले. फुले उधळत विद्यार्थ्यांनी तर ठिकठिकाणी मोठ्या संख्येने जमलेल्या क्रीडाशौकिनांनी टाळ्यांच्या गजरात प्रोत्साहित केले.