नाट्य कलावंतांच्या अदाकारीने कोल्हापूरकर रसिक मंत्रमुग्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 11:44 AM2018-10-09T11:44:14+5:302018-10-09T11:46:29+5:30
महावितरणच्या पुणे परिमंडळच्या ‘प्रेमात सगळंच माफ’ व कोल्हापूर परिमंडळच्या ‘कार्टी नं. १’ या नाटकातून एकापेक्षा एक सरस संवादफेक व उत्कृष्ट अदाकारी करून नाट्य कलावंतांनी कोल्हापूरकर रसिकांची मने जिंकली.
कोल्हापूर : महावितरणच्या पुणे परिमंडळच्या ‘प्रेमात सगळंच माफ’ व कोल्हापूर परिमंडळच्या ‘कार्टी नं. १’ या नाटकातून एकापेक्षा एक सरस संवादफेक व उत्कृष्ट अदाकारी करून नाट्य कलावंतांनी कोल्हापूरकर रसिकांची मने जिंकली. केशवराव भोसले नाट्यगृहात महावितरण पुणे प्रादेशिक विभागांतर्गत आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस ही स्पर्धा सुरू राहणार आहे.
महावितरणचे कोल्हापूरचे मुख्य अभियंता अनिल भोसले, पुणेचे मुख्य अभियंता सचिन तालेवार, बारामतीचे मुख्य अभियंता सुनील पावडे व महापारेषणचे प्रभारी मुख्य अभियंता ए. बी. दडमल यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने स्पर्र्धेचे उद्घाटन झाले.
यावेळी कोल्हापूरचे अधीक्षक अभियंता शैलेंद्र राठोर, सांगलीचे अधीक्षक अभियंता संजय साळे, कोल्हापूरचे अधीक्षक अभियंता (पा. आ.) मनोज विश्वासे, प्रभारी सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भरत पवार, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुणे परिमंडलाच्या वसंत कानेटकर लिखित ‘प्रेमात सगळंच माफ’ या नाटकाने स्पर्धेला सुरुवात झाली. सुखाने चालू असलेल्या संसारात १0 वर्षांपूर्वी नवऱ्याचे आकस्मिक आलेले विवाहबाह्य संबंध एका प्रसंगातून पुढे येतात; त्यामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा येतो, संघर्ष होतो. अशा प्रसंगातही पत्नी पतीला समजून घेत, त्याला खंबीर साथ देत ‘प्रेमात सगळंच माफ’ असतं हे दाखवून देते. यामध्ये पत्नी मधुरा, पती डॉ. अनिरुद्ध व मुलगी सुंदर यांच्या उत्कृष्ट अभिनयाला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
सायंकाळी पाच वाजता कोल्हापूर परिमंडलाचे शिवाजी देशमुख लिखित तुफान विनोदी ‘कार्टी नं-१’ हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. सुरुवातीपासूनच पोट धरून हसायला लावणाऱ्या या नाटकात महाविद्यालयीन जिवनात वसतिगृहात राहणारे मित्र एका गरीब कुटुंबातून आलेल्या, प्रसंगी उपासमार सहन करणाऱ्या आपल्या मित्राला आधार देत, त्याच्या पाठीशी राहतात. यातून निखळ मैत्रीचा संदेश देण्यात आला आहे. यावेळी नाट्यरसिकांची गर्दी झाली होती.