दीपोत्सवासाठी कोल्हापूरकर सज्ज
By admin | Published: October 28, 2016 11:40 PM2016-10-28T23:40:36+5:302016-10-28T23:40:36+5:30
अभ्यंगस्नान आज : खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दीचा महापूर; रोषणाईने शहरात झगमगाट
कोल्हापूर : आकाशकंदील लागले दारात, उजळले ज्योतिदीप अंगणात, सडासमार्जने सजल्या अंगणी, आली दिवाळी! गेल्या वर्षभरापासून ज्या सणाची आतुरतेने वाट पाहिली जाते, ठेवणीतल्या साड्या, पैठणीची घडी मोडते, अनेक अनुभवांनी सुरकुतलेल्या वृद्धांपासून ते निरागस लहान मुलांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू उमटते. आप्तेष्टांच्या भेटीने प्रेमळ आठवणींची उजळणी होत नातेसंबंधांची वीण अधिक घट्ट होते, त्या दिवाळीची पहाट आज, शनिवारी उगवली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून उत्सवाच्या तयारीत गुंतलेल्या कोल्हापूरकरांनी शुक्रवारची पूर्वसंध्या खरेदीसंध्या ठरवत प्रमुख बाजारपेठांत अलोट गर्दी केली होती.
वसुबारसनंतर धनत्रयोदशीच्या निमित्ताने सुरू होणाऱ्या या प्रकाशाच्या उत्सवाचे स्वागत करण्यासाठी घरांसमोर काढलेली रंगीबेरंगी रांगोळी, विद्युत रोषणाई, आकाशकंदीलांचा झगमगाट... या वातावरणाने दिवाळी आगमनाच्या उत्साहात अनेकविध रंग भरले आहेत; नरकचतुर्दशीपासून खऱ्या अर्थाने दिवाळी सुरू होते. त्यामुळे एक दिवसावर आलेल्या दिवाळीच्या स्वागतासाठी घरोघरी लगबग सुरू होती. बेसण-कळीचे लाडू, चकल्या, करंज्या, चिवडा असा स्वादिष्ट फराळ बनविल्यानंतर महिलांनी घराची साफसफाई करून घर अधिकाधिक सुंदर बनविण्यासाठी, सुरेख सजावटी करून आपले कौशल्य पणाला लावले आहे; तर पुरुष मंडळींनी आकाशकंदील, विद्युतमाळा लावत आपल्या दारात अधिकाधिक प्रकाश कसा पडेल, घराचे बाह्यरूप कसे खुलून दिसेल यावर लक्ष केंद्रित केले.
फराळाच्या पसाऱ्यानंतर आता प्रत्येकाचे अंगण आकाशकंदिलांच्या प्रकाशाने उजळून निघाले. धनत्रयोदशीपासून दारात दिवे लावण्याची पद्धत आहे; त्यामुळे शुक्रवारपासून दारात लावलेल्या पणत्यांचा मंद प्रकाश दिवाळीचा आनंद घेऊन आला. विद्युत रोषणाई आणि पणत्यांच्या प्रकाशाने अवघे कोल्हापूर प्रकाशाच्या झगमगाटात न्हाऊन निघाले आहे.
बाजारपेठा पॅक
ठेवणीतल्या वस्तूंपासून वर्षभर पै न पै जमवून केलेली बचत केवळ या सणासाठी राखीव ठेवलेली असते. ही बचत कुटुंबाच्या सुखासाठी आणि आप्तेष्टांच्या आनंदासाठी खर्च करत कोल्हापूरकरांनी मनसोक्त खरेदीचा आनंद लुटला. कोल्हापूरच्या मध्यवर्ती परिसरात असलेला महाद्वार रोड, जोतिबा रोड, भाऊसिंगजी रोड, ताराबाई रोड आणि लक्ष्मीपुरी या प्रमुख बाजारपेठांमध्ये नागरिकांनी अलोट गर्दी केली होती.
बुकिंगसाठी ई-मॉल
मुहूर्ताची खरेदी म्हणजे सोनं हे समीकरण मागे पडून आता नागरिक त्यांच्या गरजेच्या, सोयीच्या आणि चैनीच्या वस्तूंना प्राधान्य देत आहेत. त्यात प्रथम क्रमांक लागतो इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा. त्यामुळे मोबाईल, टीव्ही, एलईडी, फ्रीज, ओव्हन, फूड प्रोसेसर, वॉशिंग मशीन, होम अप्लायन्सेस, अॅक्सेसरीज अशा विविध वस्तूंचे पाडव्यादिवशी आपल्या घरी आगमन व्हावे, यासाठी ई-मॉलमध्ये ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली होती.
उटणे, साबण, पूजेचे साहित्य
सुवासिक उटणे, तेल, साबणासह अत्तर, डिओ, सेंट अशा सुवासिक साहित्यांची खरेदी केली जात होती. नंतरचा दुसरा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. या पूजनासाठी लक्ष्मी कुबेराची प्रतिमा असलेले फोटो, लाह्या, बत्तासे, झेंडूची फुले, पाने, सुपारी, वस्त्रमाळ, धने, पाच फळे, केळी, धूप, कापूर, सुवासिक अगरबत्ती, अशा पूजेच्या साहित्यांची जोतिबा रोड, शिंगोशी मार्केट, टिंबर मार्केट येथे खरेदी केली जात होती.