अक्षयच्या मदतीसाठी सरसावले कोल्हापूरकर
By admin | Published: February 6, 2017 01:05 AM2017-02-06T01:05:00+5:302017-02-06T01:05:00+5:30
आवाहनाला प्रतिसाद : आर्थिक, पुस्तकची मदत
कोल्हापूर : आयएसएस अधिकारी होण्याच्या जिद्दीने अपंगत्वावर मात करून ध्येयाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या अक्षय पाटीलच्या मदतीसाठी कोल्हापूरकर सरसावले. पुस्तके, आर्थिक मदतीसाठी रविवारी समाजातील अनेक संवेदनशील व्यक्तींनी अक्षयशी संपर्क साधत मदतीचा हात पुढे केला.
जन्मत:च अक्षयला मेनिंगोमायलोसिस (पाठीच्या मणक्यावरील ट्यूमर)मुळे अपंगत्व आले; परंतु तो खचला नाही दहावी-बारावीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला पण ‘या पुढे उभा राहीन तर आयएएस बनूनच’ अशी जिद्द उराशी बाळगून वाटचाल सुरूच ठेवली.
आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने अक्षयच्या आयएएस होण्याच्या स्वप्नांना बळ देत त्याला चांगले मार्गदर्शन मिळावे, पुस्तकांची खरेदी करता यावी यासाठी मदतीचे आवाहन करणारे वृत्त रविवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यास कोल्हापूर शहरासह कळंबा, राधानगरी, जयसिंगपूर आदी भागांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
अक्षयला मदतीसाठी अनेकजण सरसावले. त्यामध्ये कळंब्यातील श्रीकांत गावकर यांनी दहा हजार रुपयांपर्यंतची पुस्तके देण्याचे आश्वासन दिले तर राधानगरी येथील दत्तात्रय सावंत यांनी आर्थिक मदत देऊ, असे फोन करून सांगितले. यासह अनेक निवृत्त शासकीय अधिकाऱ्यांसह नागरिकांनी फोन करून लागेल ती मदत करू, असे सांगितलेच त्याचबरोबर अक्षयला प्रोत्साहनही दिले.