कोल्हापूरकरांनी करून दाखविलं--डॉल्बीमुक्त मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 01:02 AM2017-09-07T01:02:34+5:302017-09-07T01:05:21+5:30

 Kolhapurkar showed up - Dolby free procession | कोल्हापूरकरांनी करून दाखविलं--डॉल्बीमुक्त मिरवणूक

कोल्हापूरकरांनी करून दाखविलं--डॉल्बीमुक्त मिरवणूक

Next
ठळक मुद्दे चंद्रकांतदादांच्या प्रयत्नांना यश; पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणरायाला निरोप तटाकडील तालीम वगळता अन्य मंडळांनी आकर्षक लेसर शो आणले सुमारे पाचशेहून अधिक कार्यकर्त्यांनी डोक्यावर भगव्या टोप्या घालून तसेच पालखीतून वाद्यांशिवाय साध्या पद्धतीने गणेश विसर्जन

कोल्हापूर : डॉल्बीबंदीबाबत झालेली जनजागृती, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेले विशेष प्रयत्न आणि प्रशासनाची कणखर भूमिका या पार्श्वभूमीवर यंदाची गणेश विसर्जनाची मिरवणूक डॉल्बीविरहित पार पडली. मंगळवारी (दि. ५) डॉल्बीमुक्त मिरवणुकीचा आनंद आबालवृद्धांनी लुटलाच; शिवाय प्रत्येक वर्षी दीर्घकाळ रेंगाळणारी मिरवणूक यंदा अपेक्षेपेक्षा लवकर संपली. विधायक भूमिका घेतलेल्या शहरातील अनेक मंडळांनी डॉल्बीला फाटा देत राज्यासमोर आदर्श निर्माण केला. महिलांनी मोठ्या संख्येने घेतलेला सहभाग, सामाजिक प्रश्नांची जनजागृती, पारंपरिक वाद्यांची रेलचेल हे यंदाच्या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले.

मंगळवारी सकाळी नऊ वाजता सुरू झालेली गणेश विसर्जनाची मिरवणूक तब्बल २५ तासांनंतर बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता संपली. अपूर्व उत्साह तसेच भक्तिरसात न्हाऊन गेलेल्या या मिरवणुकीद्वारे पंचगंगा नदीघाट येथे ४८५, इराणी खाण येथे २७२, तर कोटीतीर्थ व राजाराम तलाव येथे १६८ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. याशिवाय पंचगंगा नदी येथे ८३, तर राजाराम व कोटीतीर्थ येथे १२५ गणेशमूर्ती दान करण्यात आल्या. महानगरपालिकेच्या प्रशासनाने विसर्जनाची चोख व्यवस्था ठेवली; तर पोलीस प्रशासनाने कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
गणेशोत्सवाला सुरुवात होण्याच्या आधी काही दिवसांपासून मिरवणुकीतील डॉल्बीचा विषय चांगलाच गाजला. त्यामुळे डॉल्बी लागणार की नाही एवढी एकच चर्चा सुरू होती. त्यामुळे या मिरवणुकीकडे केवळ कोल्हापूरकरांचेच नव्हे, तर राज्याचेही लक्ष लागले होते. मंडळांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे अखेरीस सर्वांच्याच प्रयत्नांना यश आले आणि डॉल्बीविरहित मिरवणूक पार पडली.

दिवसभर स्टेरिओही वाजला नाही
सायंकाळी सात वाजेपर्यंत मिरवणुकीच्या मार्गावर आलेल्या शेकडो मंडळांनी डॉल्बीच काय, तर साधा स्टेरिओदेखील लावला नाही. केवळ ढोल-ताशा, धनगरी ढोल, झांज, लेझीम, बेंजो, बॅँड यासारख्या पारंपरिक वाद्यांचाच वापर केला. त्यामुळे मिरवणुकीच्या मार्गावर जो काही गजर झाला, तो पारंपरिक वाद्यांचाच झाला. काही मंडळांनी तर आपले गणपती टाळ्यांच्या गजरातच मिरवणुकीत आणले. त्यामुळे मिरवणूक गतीने पुढे सरकत होती. खंडोबा तालीम, हिंदवी, बागल चौक मित्र मंडळ, पाटाकडील तालीम मंडळ, फिरंगाई तालीम यांनी पारंपरिक वाद्येच आणली होती. वेताळ तालीम मंडळाच्या सुमारे पाचशेहून अधिक कार्यकर्त्यांनी डोक्यावर भगव्या टोप्या घालून तसेच पालखीतून वाद्यांशिवाय साध्या पद्धतीने गणेश विसर्जन केले.
सायंकाळनंतर स्टेरिओ लागले
सायंकाळी सात वाजेर्यंत मिरवणूक अत्यंत शिस्तबद्धतेने तसेच गतीने सुरू होती; पण मिरजकर तिकटीकडून बालगोपाल तालीम, दिलबहार तालीम, संयुक्त जुना बुधवार पेठ मित्र मंडळाचे कार्यकर्ते, ताराबाई रोडवरून तटाकडील तालीम मंडळाचे कार्यकर्ते; तर खरी कॉर्नरकडून अवचित पीर तालीम मंडळाचे कार्यकर्ते मुख्य मिरवणुकीत सहभागी झाले तशी मिरवणूक रेंगाळली. अवचित पीर तालीम मंडळाने बिनखांबी गणेश मंदिर चौकात येताच लेसर शोबरोबरच प्रथमच साउंड सिस्टीम लावली. ते पोलिसांना कळताच त्यांनी आवाजाची तपासणी केली. त्यामुळे तत्काळ सिस्टीम बंद करण्यात आली. पोलीस गेल्यानंतर मात्र ती पुन्हा वाजविण्यास सुरुवात झाली. पाठोपाठ दिलबहार, बालगोपाल तालीम व जुना बुधवार मित्र मंडळ, यूके बॉईज, दयावान, बीजीएम, पीएम बॉईज, ऋणमुक्तेश्वर, झुंजार क्लब, शहाजी तरुण मंडळ, व्ही. के. ग्रुप, साकोली कॉर्नर, आयडियल स्पोर्टस्, वाय. पी. पोवारनगर मित्र

सामाजिक जागर
महाद्वार रोडवरील दत्त महाराज तालीम मंडळाच्या महिलांनी ‘पर्यावरण वाचवा, देश वाचवा; जल हे तो कल है; अशी घोषवाक्ये असलेले फलक हाती घेतले होते. बुधवार पेठेतील डांगे गल्ली मित्रमंडळाच्या महिलांनी पर्यावरण वाचविण्याचा संदेश दिला. भेंडे गल्ली येथील कॉर्नर मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पाणी फौंडेशनचा माहितीपर फलक मिरवणुकीत आणला होता. मंगळवार पेठ रिक्षा मित्र मंडळाने ‘शाहू मैदानाजवळ उड्डाणपूल’ उभारण्याच्या मागणीचा फलक आणला होता. मंडळ, जय पद्मावती, फिनिक्स ग्रुप, आदी मंडळांनी साउंड सिस्टीम लावली; परंतु आवाजाची मर्यादा मात्र सर्वांनी पाळली. तटाकडील तालीम वगळता अन्य मंडळांनी आकर्षक लेसर शो आणले होते. त्यामुळे रोषणाईच्या झगमगाटाला सुरांचीही साथ मिळाली. तशी तरुणाईसुद्धा थिरकायला लागली. अन्य मंडळांचे कार्यकर्तेही या मंडळांसमोर नाचू लागले.
व्हीआयपींचा उत्साही सहभाग
विसर्जन मिरवणुकीत राजकारणी, प्रशासकीय अधिकारी तसेच छत्रपती घराण्यातील सदस्यांनीही मोठ्या हिरिरीने सहभाग घेतला. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीच मिरवणुकीचे उद्घाटन केल्यानंतर अग्रभागी असलेल्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणपतीची पालखी खांद्यावरून वाहिली. महापौर हसिना फरास, आमदार सतेज पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, महापालिकेचे आयुक्त अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, प्रशांत अमृतकर यांनीही पालखी वाहिली.
मिरवणुकीतील उत्साह वाढला तसे येईल तसे शाहू छत्रपती, खासदार संभाजीराजे, मालोजीराजे, याज्ञसेनी राणीसाहेब, संयोगिताराजे, मधुरिमाराजे या राजपरिवारसह खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनीही मिरवणुकीत भाग घेतला. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी उद्घाटनावेळी धनगरी ढोल वाजविला, ते लेझीम खेळले; तर रंकाळवेश तालमीच्या लालबागच्या राजासमोर हातात ध्वज घेऊन नृत्य केले. खासदार महाडिक मिरजकर तिकटी चौकात मर्दानी खेळ खेळले. मधुरिमाराजे यांनी लेझीमचा फेर धरला; विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी खंडोबा तालीम मंडळाच्या गणपतीसमोर लेझीम खेळण्याचा आनंद लुटला.

महिलांसाठी स्वच्छतागृहे
सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील फौंडेशनच्यावतीने गणेशोत्सव कालावधीत महिलांच्या सोयीसाठी एकूण २६ वेगवेगळ्या ठिकाणी तात्पुरती स्वच्छतागृहे उभारली होती. त्यापैकी १२ स्वच्छतागृहे ही गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर होती.

Web Title:  Kolhapurkar showed up - Dolby free procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.