लॉकडाऊन संपण्याआधीच कोल्हापूरकर मनाने अनलॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:22 AM2021-05-23T04:22:45+5:302021-05-23T04:22:45+5:30
कोल्हापूर : निकालाची तारीख जवळ येईल तशी हुरहुर आणि उत्सुकता मनात दाटते अगदी तशीच हुरहुर कोल्हापूरकरांना लागून राहिली आहे. ...
कोल्हापूर : निकालाची तारीख जवळ येईल तशी हुरहुर आणि उत्सुकता मनात दाटते अगदी तशीच हुरहुर कोल्हापूरकरांना लागून राहिली आहे. कोरोनाचे आकडे कितीही भयावह वाटत असले तरी कधी एकदा बाहेर पडू आणि लागेल ते खरेदी करू अशीच भावना प्रत्येकाच्या मनात आहे. त्यामुळे आज लाॅकडाऊनबाबत प्रशासन काय निर्णय घेईल तो घेईल, लोक मनातून आधीच अनलॉक झाले आहेत.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात १५ मेच्या मध्यरात्रीपासून शंभर टक्के कडक लॉकडाऊन पाळण्यात आला आहे. प्रशासनाने जाहीर केलेल्या मुदतीनुसार तो आज रविवारी रात्री १२ वाजता संपणार आहे. तत्पूर्वी लॉकडाऊन वाढणार की संपणार यावरून शनिवारी दिवसभर तर्क-वितर्कांना उधाण आले होते. जिल्ह्याचा लॉकडाऊन संपला तरी राज्याचा लॉकडाऊन ३१ मेपर्यंत सुरूच राहणार आहे. त्यामुळे प्रशासनाने शंभर टक्के लॉकडाऊन मागे घेतले तरी संचारबंदी कायम राहणार आहे. सकाळी ७ ते ११ याच वेळेतच व्यवहाराची मुभा राहणार आहे. असे असले तरी थोडे निर्बंध असू देत; पण आता कडक लॉकडाऊन नको असाच कोल्हापूरकरांचा कल आहे.
कडक लॉकडाऊन सुरू झाल्यापासून रुग्ण वाढीच्या वेगावर मर्यादा आल्या आहेत. मागील सात दिवसांत रुग्णसंख्येचा वेग लॉकडाऊन जाहीर झाल्याच्या पहिल्या दोन दिवसांचा अपवाद वगळता स्थिर राहिला आहे. मृत्यूतही चढउतार दिसत आहे. आजची परिस्थिती पाहिली तर आणखी थोडे दिवस निर्बंध पाळले तर दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी करता येऊ शकते; पण एकूणच कोल्हापूरकरांची विशेषत: व्यापारी, उद्योजकांची मानसिकता पाहिली तर लॉकडाऊन नको अशीच आहे.
घराघरातील बाजार संपला
लॉकडाऊनच्या भीतीने आठ दिवसांची बेगमी करण्यात आली होती, ती आता बऱ्यापैकी संपली आहे. त्यामुळे कधी एकदा दुकाने उघडतात आणि बाजार भरतोय अशी परिस्थिती घराघरात दिसत आहे. भाजीमंडई बंद असल्याने सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत भाजी विक्रेते दारोदार फिरून भाजीपाला विक्री करत आहेत; पण दरात प्रचंड वाढ केल्याने सर्वसामान्य ग्राहक घायकुतीला आला आहे. कोणतीही भाजी ७० ते ८० रुपये किलोच्या खाली नाही. पालेभाज्या व कोंथिबिरीची जुडी देखील २० ते ३० रुपयांना एक, अशी विकली जात आहे. कांदा, बटाटेदेखील ५० रुपये किलोने विकले जात आहेत.
शहर अजूनही चिडिचूपच
लॉकडाऊनची शासकीय मुदत संपण्याच्या आदल्या दिवशी दुपारी शहरात फेरफटका मारला तर अजूनही सामसूम दिसत आहे. मुख्य रस्त्यांवर अत्यावश्यक सेवेतील वाहने, पोलीस, ॲम्ब्युलन्स वगळता कोणीही दिसत नाही. शहर अजूनही चिडिचूपच आहे, गल्लीतील क्रिकेट हाच काय तो रस्त्यांवरचा आनंदाचा क्षण ठरत आहे.
मागच्या दाराने विक्री
कोल्हापूरकर आणि मांसाहार याचे अतूट नाते आहे. आठ दिवस दुकाने बंद असल्याने कडधान्यावर वेळ मारून न्यावी लागल्याने वैतागलेल्या नागरिकांनी यातूनही पळवाट काढली आहे. शटर बंद करून दुकानदारही हळूच माल आणून देत आहेत. शहरात जागोजागी असे चित्र शनिवारी दृष्टीस पडले.