कोल्हापूरकरांच्या वाहनहौसेला ब्रेक, विक्रीत घट; बीएस ६, मंदीचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 04:36 PM2019-11-07T16:36:53+5:302019-11-07T16:44:47+5:30
: देशात कोणतेही आणि कितीही मोठ्या किमतीचे वाहन येऊ दे; ते आपल्या दारात पाहिजेच, असा अट्टहास बाळगणाऱ्या कोल्हापूरकरांनी यंदा वाहन खरेदीच्या हौसेला आवर घातल्याचे चित्र आहे. विशेषत: जागतिक बाजारपेठेतील मंदी, पश्चिम महाराष्ट्राला बसलेला पुराचा फटका आणि प्रदूषण नियंत्रणासाठी वाहनांमध्ये येऊ घातलेली बी. एस. ६ मानांकन प्रणालीचे इंजिन हे घटक कारणीभूत ठरल्याचे जाणकारांकडून बोलले जात आहे.
सचिन भोसले
कोल्हापूर : देशात कोणतेही आणि कितीही मोठ्या किमतीचे वाहन येऊ दे; ते आपल्या दारात पाहिजेच, असा अट्टहास बाळगणाऱ्या कोल्हापूरकरांनी यंदा वाहन खरेदीच्या हौसेला आवर घातल्याचे चित्र आहे. विशेषत: जागतिक बाजारपेठेतील मंदी, पश्चिम महाराष्ट्राला बसलेला पुराचा फटका आणि प्रदूषण नियंत्रणासाठी वाहनांमध्ये येऊ घातलेली बी. एस. ६ मानांकन प्रणालीचे इंजिन हे घटक कारणीभूत ठरल्याचे जाणकारांकडून बोलले जात आहे.
एकेकाळी मर्सिडीज, जग्वार, रोव्हर अशा जगविख्यात कंपन्यांची कोट्यवधी किमतीची वाहने देशाच्या बाजारपेठेत आल्यानंतर त्यांतील पहिली वाहने कोल्हापूरच्या रस्त्यांवर हमखास दिसणार, अशी ख्याती होती. गेल्या काही वर्षांपासून ऊसदराचा फटका, जागतिकीकरणामुळे आलेली मंदी, आदी कारणांमुळे वाहनेखरेदीचा वेग मंदावला.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे ५० टक्क्यांहून अधिक प्रमाणात वाहनविक्रीत घट झाली आहे. एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ यादरम्यान एकूण सर्व प्रकारची ८४ हजार ८०२ वाहने रस्त्यांवर आली; तर यंदा आॅक्टोबर २०१९ अखेर ३२ हजार ४१२ वाहने रस्त्यांवर आली आहेत. विशेषत: बीएस फोर ही इंजिन प्रणालीही मागे पडली आहे. त्यामुळे थेट बीएस सिक्स मानांकन असलेली इंजिन प्रणाली प्रत्येक वाहनात येऊ लागली आहे. अशी वाहने नव्या वर्षात बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात दाखल होतील. त्यानंतर वाहनविक्रीत वाढ होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती, मंदीचे सावट आणि पर्यावरण समतोल राखणारी बीएस सिक्स मानांकनाची इंजिन प्रणाली वाहन व्यवसायात येऊ लागली आहे. त्याचा थेट परिणाम वाहनविक्रीवर झाला असण्याची शक्यता आहे.
- डॉ. स्टीव्हन अल्वारिस,
प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर
दोन वर्षांतील वाहनसंख्या
वाहनाचा प्रकार साल २०१८-१९ साल २०१९-२०२०
- मोटारसायकल ४०,८२१ २५,२५६
- मोटार कार ५४३२ ५,०३१
- टॅक्सी - ०७
- लक्झरी टुरिस्ट कॅब ४८ ३२
- आॅटो रिक्षा ४९१ २२०
- स्टेज कॅरेज २२ -
- मिनी बस (कंत्राटी) १०१ ४४
- स्कूल बस २६ -
- खासगी वाहने ०६ ०२
- रुग्णवाहिका ०५ ०९
- मल्टी आर्टिक्युलेट वाहने २६ ०२
- ट्रक, लॉरी ३२४ २२०
- टँकर - -
- डिलिव्हरी व्हॅन (चारचाकी) १४८० ५४३
- डिलिव्हरी व्हॅन (तीनचाकी) १२६ ८६
- ट्रॅक्टर ७५४ ७४८
- ट्रेलर ३०३ १३५
- अन्य वाहने १२५ ७७
- एकूण ५०,०९० ३२,४१२