कोल्हापूरकरांना प्रतीक्षा कलामहोत्सवाची!

By admin | Published: July 21, 2016 12:26 AM2016-07-21T00:26:07+5:302016-07-21T01:01:38+5:30

आर्ट फौंडेशन : गेल्या दोन वर्षांपासून उपक्रमात पडला खंड : कलाकारांतील दुफळीचाही फटका

Kolhapurkar waiting for Kalamohotsav! | कोल्हापूरकरांना प्रतीक्षा कलामहोत्सवाची!

कोल्हापूरकरांना प्रतीक्षा कलामहोत्सवाची!

Next

इंदुमती गणेश -- कोल्हापूर --कोल्हापुरातील चित्र, शिल्पकलेला प्रोत्साहन देणाऱ्या कलामहोत्सवाची कोल्हापूरकरांना प्रतीक्षा आहे. कोल्हापूर आर्ट फौंडेशनतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या या उपक्रमात गेल्या दोन वर्षांपासून खंड पडला आहे.
गायन, वादन, नृत्य, नाट्य अशा विविध कलांनी बहरलेल्या कोल्हापूरला चित्रकला आणि शिल्पकलेची परंपरा लाभली आहे. दरबारी चित्रकार आबालाल रेहमान, कलामहर्षी बाबूराव पेंटर आनंदराव पेंटर यांच्यापासून सुरू झालेला प्रवाह आजच्या पिढीपर्यंत वाहत आला आहे. मात्र, अन्य कलांच्या तुलनेत चित्र आणि शिल्पकलेला म्हणावी तशी प्रसिद्धी मिळाली नाही. ही परंपरा अशीच प्रवाही राहावी, या उद्देशाने आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकाराने २०१२ साली कोल्हापूर आर्ट फौंडेशनची स्थापना झाली.
या संस्थेच्या माध्यमातून विविध स्पर्धा, प्रदर्शन, कार्यशाळांचे आयोजन केले गेले. प्रत्येक वर्षाच्या अखेरीस होणारा कलामहोत्सव म्हणजे या संस्थेचा सर्वांत मोठा आणि महत्त्वपूर्ण उपक्रम. कोल्हापुरातील सर्व चित्र-शिल्प व त्याच्याशी संबंधित क्षेत्रातील कलाकारांना एकाच छताखाली आणणाऱ्या या कलामहोत्सवामुळे कोल्हापूरला लाभलेली ही कला जगभर पोहोचली. या प्रदर्शनामुळे अनेक कलाकारांना व्यासपीठ मिळाले. चार-पाच दिवस चालणारा हा महोत्सव पाहण्यासाठी दसरा चौकात नागरिकांची अलोट गर्दी होत होती.
या महोत्सवासाठी आमदार सतेज पाटील यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीतील त्यांच्या पराभवानंतर संस्थेची चळवळ थंडावली. दोन वर्षांपासून कलामहोत्सवही झालेला नाही. त्यातच काही मोजकेच कलाकार संस्थेचे काम चालवीत असल्याने अन्य कलाकारांमध्ये नाराजी होती. मात्र, यामुळे कोल्हापूरकरांची वेगवेगळ्या कलाकृती पाहण्याची संधी हुकली. हा महोत्सव पुन्हा सुरू व्हावा, अशी कोल्हापूरकर रसिकांची अपेक्षा आहे.


कलामहोत्सव फक्त कोल्हापुरात न करता अन्य शहरांपर्यंत पोहोचविण्याचा संस्थेचा मानस आहे. त्याचाच एक भाग म्हणून जहाँगीर आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शन भरविण्याचे नियोजन आहे. त्यासाठी तेथील व्यवस्थापनाशी बोलणी सुरू असून योग्य तारखा मिळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
- प्राचार्य अजेय दळवी, कार्याध्यक्ष,
कोल्हापूर आर्ट फौंडेशन

Web Title: Kolhapurkar waiting for Kalamohotsav!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.