एकच नाम, जय श्रीराम..जय श्रीराम; कोल्हापूरकर श्रीरामाच्या जयघोषात दंग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 12:14 PM2024-01-22T12:14:32+5:302024-01-22T12:15:09+5:30

कोल्हापूर : श्रीरामाची प्रतिमा व मंदिराची प्रतिकृती काढलेले भगवे झेंडे, स्कार्फ, शहरात ठिकठिकाणी श्रीरामाचे उभारलेले भव्य कटआऊटस, विद्युत रोषणाईने ...

Kolhapurkar was stunned by the chanting of Sri Ram | एकच नाम, जय श्रीराम..जय श्रीराम; कोल्हापूरकर श्रीरामाच्या जयघोषात दंग

एकच नाम, जय श्रीराम..जय श्रीराम; कोल्हापूरकर श्रीरामाच्या जयघोषात दंग

कोल्हापूर : श्रीरामाची प्रतिमा व मंदिराची प्रतिकृती काढलेले भगवे झेंडे, स्कार्फ, शहरात ठिकठिकाणी श्रीरामाचे उभारलेले भव्य कटआऊटस, विद्युत रोषणाईने उजळलेले चौक, शोभायात्रा, सर्वामुखी एकच नाम जय श्रीराम जय श्रीराम असे भक्तिमय वातावरण अयोध्येत श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला कोल्हापुरात होते.

समस्त हिंदू बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीरामांच्या मूर्तीची आज अयोध्येत प्राणप्रतिष्ठापना होत आहे. यानिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. हा भव्य सोहळा वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा केला जात आहे. दिवाळीनंतर पुन्हा एकदा दिवाळी साजरी केली जात आहे. रविवार तसा सुटीचा दिवस, त्यात शासनाने आज सोमवारीदेखील सुटी जाहीर केल्याने या सोहळ्याचा आनंद द्विगुणीत झाला. श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला कोल्हापूर राम रंगी रंगले होते.

सकल मराठा समाजच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. त्यामुळे मिरजकर तिकटी ते बिंदू चौक, पुढे लक्ष्मीपुरी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या शहराच्या मध्यवर्ती परिसरात फक्त आणि फक्त श्रीराम नामाचा गजर सुरू होता. याशिवाय शहराच्या चौकाचौकात, पेठापेठांमध्ये, तसेच तालीम मंडळांच्या वतीने धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ऐतिहासिक दसरा चौकात भव्य शामियाना उभारण्यात आला आहे.

भगवे झेंडे आणि स्कार्फ

शहरात सर्वत्र मोठ्या प्रमाणात श्रीरामाची प्रतिमा व मंदिराच्या प्रतिकृतीचे चित्र असलेल्या भगव्या स्कार्फ व झेंड्यांची विक्री केली जात होती. मिरजकर तिकटी चौकात भगवे झेंडे लावले होते. श्रीरामाची प्रतिकृती उभारली होती. बिंदू चौकातही तसेच वातावरण होते. महापालिका चौक व माळकर तिकटी येथे नजर जाईल तिथे फक्त भगवाच दिसत होता.

वाहतुकीची कोंडी

शाेभायात्रा व विविध संस्था, संघटनांच्या वतीने सुरू असलेली तयारी त्यात रविवारची बाजारपेठ. यामुळे शहरात सायंकाळी प्रचंड वाहतुकीची कोंडी झाली. शोभायात्रेमुळे मिरजकर तिकटी ते बिंदू चौक व लक्ष्मीपुरी आईसाहेब महाराजांचा पुतळा या परिसरात वाहनांना सोडले जात नव्हते त्यामुळे वाहतूक खासबाग मैदान, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल चौक, उमा टॉकीज चौक, फोर्ड कॉर्नर मार्गे वळविण्यात आली होती. या रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

छत्रपती शिवाजी महाराज चौकात रोषणाई

कोल्हापूरचे हृदय असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्याभोवती रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. तर, ाचौकाच्या चारही रस्त्यांवर विद्युत रोषणाई, विशेष लाइट इफेक्ट करण्यात आले होते. येथे श्रीरामाची प्रतिकृती उभारली असून भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे.

इचलकरंजीत शोभायात्रा, महिलांचा लक्षणीय सहभाग

इचलकरंजी : अयोध्येतील श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर रविवारी शहरातून अभूतपूर्व उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये हजारो रामभक्तांनी सहभाग घेतला. भगवी साडी परिधान केलेल्या महिलांची संख्याही लक्षणीय होती. वाद्यांच्या निनादात निघालेल्या शोभायात्रेत श्रीरामांच्या मूर्तीसह देखाव्यांचा सहभाग होता.
रामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या पूर्वसंध्येला श्री काळामारुती आरती भक्त मंडळाच्यावतीने शोभायात्रेचे आयोजन केले होते. मंदिरापासून या शोभायात्रेस प्रारंभ झाला. भगव्या साड्या परिधान करून शहराबरोबरच परिसरातील महिलांनी यामध्ये सहभाग घेतला. हातामध्ये श्रीरामांचे छायाचित्र असलेल्या भगव्या झेंड्यांनी परिसर व्यापला होता. शोभायात्रेचे पहिले टोक के. एल. मलाबादे चौकात, तर शेवटचे टोक शिवतीर्थाजवळ होते. इतक्या मोठ्या प्रमाणात रामभक्तांनी यामध्ये सहभाग नोंदविला.

राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, आदींच्या वेशभूषा परिधान केलेले सजीव देखावे साकारण्यात आले होते. अयोध्येतील राममंदिराची प्रतिकृती, राम-लक्ष्मण यांना खांद्यावर घेतलेल्या हनुमानाचा देखावा शोभायात्रेच्या मध्यभागी होता. अयोध्येहून आलेल्या मूर्तीचा समावेश शोभायात्रेत होता. शोभायात्रेवर जेसीबीच्या साहायाने शिवतीर्थाजवळ फुलांची उधळण करण्यात आली. मार्गावर सुंदर रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या.

टाळ-मृदुंगाचा जयघोष, धनगरी ढोल, झांजपथक, लेझीम, आदी वाद्यांचा निनाद पाहावयास मिळाला. महिलांनी फुगड्यांचा फेरा ठिकठिकाणी धरला. गावभागातील रामजानकी मंदिराजवळ शोभायात्रा आल्यानंतर आरती म्हणून या शोभायात्रेची सांगता करण्यात आली. आमदार प्रकाश आवाडे, किशोरी आवाडे, सपना आवाडे, स्वप्निल आवाडे, राहुल आवाडे, वैशाली आवाडे, मौसमी आवाडे, नंदू पाटील, प्रकाश दत्तवाडे, प्रकाश मोरे, श्रीकांत टेके, आदींसह श्री काळामारुती आरती भक्त मंडळाचे सदस्य, आदींचा सहभाग होता.

मुख्य मार्ग भगवा

मुख्य मार्गावरून हातात भगवे झेंडे घेऊन शोभायात्रा निघाल्यानंतर शिवतीर्थकडून मलाबादे चौकाकडे पाहिले असता संपूर्ण रस्ता गर्दीने फुलला होता. सगळे वातावरणच भगवे झाले होते. रविवारची मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दीही केली होती.

Web Title: Kolhapurkar was stunned by the chanting of Sri Ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.