नववर्षाच्या स्वागताची कोल्हापूरकरांकडून जय्यत तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 12:14 PM2019-12-31T12:14:19+5:302019-12-31T12:17:10+5:30
नववर्षाचे स्वागत करण्याचे आणि सरत्या वर्षाला निरोप देण्याचे क्षण अविस्मरणीय करण्यासाठी कोल्हापूरकरांनी जय्यत तयारी केली आहे. विविध स्वरुपातील नियोजन त्यांनी केले आहे. ‘थर्टी फर्स्ट’च्या मंगळवारी होणाऱ्या पार्टीसाठी शहरासह जिल्ह्यातील विविध हॉटेल्स् सज्ज झाली आहेत.
कोल्हापूर : नववर्षाचे स्वागत करण्याचे आणि सरत्या वर्षाला निरोप देण्याचे क्षण अविस्मरणीय करण्यासाठी कोल्हापूरकरांनी जय्यत तयारी केली आहे. विविध स्वरुपातील नियोजन त्यांनी केले आहे. ‘थर्टी फर्स्ट’च्या मंगळवारी होणाऱ्या पार्टीसाठी शहरासह जिल्ह्यातील विविध हॉटेल्स् सज्ज झाली आहेत.
शहरातील रंकाळा, पंचगंगा नदीघाट, पिकनिक पॉर्इंट, बाग-बगीचासह हॉटेल, फास्टफूड रेस्टॉरंटमध्ये मित्र-मैत्रिणी, नातेवाईक अथवा कुटुंबीयांसमवेत नववर्षाचे स्वागत करण्याचे नियोजन केले आहे. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करणारे फलक शहरातील प्रमुख चौक आणि मार्गावर झळकले आहेत.
शहरासह जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिक, काही इव्हेंट संस्थांनी विविध स्वरूपातील पार्टींचे आयोजन केले आहे. हॉटेल व्यावसायिक ग्राहकांना लज्जतदार जेवणाचा आस्वाद देण्यासाठी सज्ज झाले आहेत. या दिवसासाठी काही स्पेशल डिशेस बनविण्यात आल्या आहेत.
आइस्क्रीम पार्लर, केक शॉपी, न्यू इयर पार्टीसाठी सज्ज झाल्या आहेत. बच्चेकंपनीसाठी चॉकलेट हाऊसमध्ये विशेष योजना जाहीर केल्या आहेत. नववर्षाच्या स्वागताचे नियोजन, थर्टी फर्स्टच्या पार्टीचे आयोजनाबाबतच्या व्हॉटस् अॅपवरील ग्रुप चर्चा रंगत आहेत. त्यात अगदी जेवणाचा मेन्यू ते जल्लोष करण्याच्या ठिकाणापर्यंत चर्चा होत आहे. काही ग्रुपवर थर्टी फर्स्टबाबतच्या मनोरंजनात्मक संदेशांची देवाण-घेवाण सुरू आहे.
स्वागताला विधायक उपक्रमांची किनार
कोल्हापूरमधील काहींनी अक्कलकोट, शिर्डी, पंढरपूर, गणपतीपुळे अशा धार्मिक ठिकाणी जाण्याचे ठरविले आहे. त्यानुसार काहीजण सोमवारी रवाना झाले आहेत. येथील अक्षरदालन आणि निर्धार यांच्यावतीने आज, मंगळवारी सायंकाळी पाच वाजता काव्यवाचन आणि दुग्धपान असा संयुक्त कार्यक्रम होणार आहे. कोळेकर तिकटी येथील ‘अक्षरदालन’च्या कार्यालयातील या कार्यक्रमात कोल्हापूरसह विविध परिसरातील कवी सहभागी होणार आहेत.
आज रात्री बारापर्यंत उद्याने खुली
नववर्षाच्या स्वागतानिमित्त नागरिकांना सहभोजनाचा आनंद घेता यावा, म्हणून महापालिका प्रशासनाने शहरातील सर्व उद्याने आज, मंगळवारी रात्री बारावाजेपर्यंत खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रंकाळा तलाव उद्यान, पदपथ, पद्माराजे, नाळे, शेळके, पद्मावती, मंगेशकर, नेहरू बालोद्यान, रंकाळा चौपाटी, शाहू उद्यान, राजाराम हॉल उद्यान, दादासोा शिर्के, महावीर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, नाना-नानी पार्क, ताराबाई पार्क, लालबहाद्दूर शास्त्री उद्यान, मुक्त सैनिक, रुईकर ओपन, सम्राटनगर, टेंबलाई, श्रीराम, हुतात्मा पार्क उद्यान, आदी उद्याने रात्री १२ वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येणार आहेत.