कोल्हापूरच्या कुस्तीप्रेमींना यंदा 'महाराष्ट्र केसरी'ची आशा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 11:28 AM2022-03-21T11:28:13+5:302022-03-21T11:47:55+5:30
सातारा येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी खुल्या गटातून पृथ्वीराज पाटील, संग्राम पाटील (गादी) तर माती गटातून कौतुक डाफळे, शुभम सिद्धनाळे यांची निवड कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाकडून करण्यात आली आहे.
कोल्हापूर : सातारा येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी खुल्या गटातून पृथ्वीराज पाटील, संग्राम पाटील (गादी) तर माती गटातून कौतुक डाफळे, शुभम सिद्धनाळे यांची निवड कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाकडून करण्यात आली आहे. याशिवाय अन्य जिल्ह्यांचे प्रतिनिधीत्व करणारे, पण कोल्हापुरातील तालमींमध्ये सराव करणारे सिकंदर खेख, माउली जमदाडे, प्रकाश बनकर, भैरु माने, अक्षय मनगवडे, सुनील खेचाळ हेही दावेदार आहेत. त्यामुळे यंदा महाराष्ट्र केसरीची गदा कोल्हापुरात येण्याची आशा कुस्तीप्रेमींतून व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत आतापर्यंत कोल्हापुरातील दादु चाैगुले (१९७०,१९७१), लक्ष्मण वडार ( १९७२, १९७३), युवराज पाटील (१९७४), नामदेव मोळे (१९८४), विष्णू जोशीलकर (१९८५), विनोद चौगुले (२०००) यांच्यानंतर आजपर्यंत कोल्हापूरला महाराष्ट्र केसरी स्पर्धेची गदा आणता आलेली नाही. सद्यस्थितीत कोल्हापूर संघातून पृथ्वीराज पाटील (देवठाण व सध्या आर्मी), संग्राम पाटील (आमशी, सध्या आर्मी) दोघेही गादी गटातून, तर माती गटातून कौतुक डाफळे (कागल), महान भारत केसरी (कर्नाटक) शुभम सिद्धनाळे (इचलकरंजी) हे आपले कसब महाराष्ट्र केसरी किताबासाठी पणाला लावणार आहेत. यांच्याकडून मोठ्या अपेक्षा कोल्हापुरातील तमाम कुस्ती प्रेमींना आहेत.
हेही कोल्हापूरकरच ..
- जिल्हा संघातून निवडलेल्या चौघांशिवाय सिकंदर शेख (वाशिम), माउली जमदाडे (सोलापूर), प्रकाश बनकर(मुंबई उपनगर), , भैरू माने (गोंदीया) शाहू विजयी गंगावेश तालमीतून वस्ताद विश्वास हारूगले यांचेकडून तंत्रशुद्ध कुस्तीचे मार्गदर्शन घेत आहेत. तर अक्षय मनगवडे (सोलापूर), सुनील खेचाळ (सोलापूर) हे दोघे राष्ट्रकुल सुवर्ण विजेते राम सारंग यांच्याकडून कुस्तीचे धडे घेत आहेत. हे जरी बाहेरच्या जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करीत असले तरी आतापर्यंतची प्रशिक्षण कोल्हापुरातच घेत आहेत.
- महाराष्ट्र केसरीत दिग्गज समजले जाणारे विजय चौधरी, अभिजीत कटके आदी मल्ल जखमी आहेत. केवळ खुल्या गटात केवळ सातारच्या घरचा मल्ल म्हणून किरण भगतच दावेदार आहे. त्यामुळे कोल्हापूरच्याच; परंतु विविध जिल्ह्यातून प्रतिनिधीत्व करणाऱ्या या मल्लाकडून कुस्तीप्रेमींना मोठ्या आशा आहेत.
जिल्हा संघातून पृथ्वीराज, संग्राम, कौतुक, शुभम यांच्याकडून कुस्तीप्रेमींना मोठ्या आशा आहेत. तर अन्य गटातही कोल्हापूरचे मल्ल दावेदार ठरतील. - प्रकाश खोत, उपाध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघ
जिल्हा संघातून निवडलेल्या मल्लांबरोबर इतर जिल्ह्यांचे प्रतिनिधीत्व करणारे मल्लांचे बहुतांशी आयुष्य कोल्हापूरच्या मातीतच प्रशिक्षण घेण्यात गेले आहे. त्यामुळे यंदा महाराष्ट्र केसरी स्पर्धेची गदा कोल्हापुरात येणार आहे. आम्हाला विजयी उमेदवाराची हत्तीवरून मिरवणूक काढण्याची निश्चितच संधी मिळेल. - संग्राम कांबळे, प्रवक्ते, कुस्ती मल्ल विद्या.