उस्ताद झाकीर हुसेन यांच्या तबल्याची जादू कोल्हापूरकरांनी अनेकदा अनुभवली
By संदीप आडनाईक | Updated: December 17, 2024 15:46 IST2024-12-17T15:42:15+5:302024-12-17T15:46:53+5:30
उस्तादजींच्या नावाने झालेल्या एका शास्त्रीय संगीत कार्यक्रमाची तिकिटे चक्क काळ्याबाजाराने विकली गेली होती

उस्ताद झाकीर हुसेन यांच्या तबल्याची जादू कोल्हापूरकरांनी अनेकदा अनुभवली
संदीप आडनाईक
कोल्हापूर : तबलानवाज उस्ताद झाकीर हुसेन यांच्या तबल्याची जादू कोल्हापूरकरांनी तब्बल सात ते आठ वेळा अनुभवली होती. सामान्यत: चित्रपटांची तिकिटे काळ्या बाजारात विकली जातात; परंतु शास्त्रीय कार्यक्रमांच्या इतिहासात प्रथमच केशवराव भोसले नाट्यगृहातील उस्तादजींच्या नावाने झालेल्या एका शास्त्रीय संगीत कार्यक्रमाची तिकिटे चक्क काळ्याबाजाराने विकली गेली होती.
कोल्हापुरात १९८२, १९९०, १९९५, २००९, २०१०, २०११, २०१२ आणि २०१९ मध्ये झालेल्या कार्यक्रमांना उस्तादांनी हजेरी लावली होती. कधी शिवाजी स्टेडियम, कधी संगीतसूर्य केशवराव भोसले, कधी पद्माराजे हायस्कूलचे मैदान, कधी राम गणेश गडकरी सभागृह, कधी देवल क्लब, रमण मळा, सेंट झेव्हिअर हायस्कूल, हाॅटेल सयाजीमध्ये झालेल्या कार्यक्रमांसाठी कोल्हापूरकर धावले होते. गुणीदास फाउंडेशनचे राजभूषण सहस्रबुद्धे आणि शिवाजी विद्यापीठाच्या संगीत आणि नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विनोद ठाकूरदेसाई यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
बेळगावहून आले होते टॅक्सीने
सन १९८१ मध्ये इंडियन टोबॅको कंपनीने देवल क्लबसोबतच्या पद्माराजे हायस्कूलच्या मैदानावर भरलेल्या मैफिलीसाठी ते बेळगावहून टॅक्सीने कोल्हापुरात आल्याची आठवण सहस्रबुद्धे यांनी सांगितली. या दरम्यान त्यांच्या घरीच उस्तादजींची प्रत्यक्ष भेट झाल्याचेही ते म्हणाले. १९९० मध्ये संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात सुरेंद्र मोहिते आयोजित कार्यक्रमात उस्तादजींनी तब्बल २ तास १० मिनिटे तबला वाजवून रसिक श्रोत्यांचे कान तृप्त केले होते. याच कार्यक्रमाची तिकिटे तेव्हा काळ्याबाजारात विकली गेली होती.
लहान मुलांसोबत रमायचे उस्ताद
गुणीदास फाउंडेशनसोबत उस्तादजींनी चार कार्यक्रम केले. २००९ मध्ये रमणमळा येथे, २०११ मध्ये सेंट झेव्हिअर हायस्कूल, २०१२ मध्ये केशवराव भोसले नाट्यगृह आणि २०१९ मध्ये हॉटेल सयाजी येथे त्यांचे कार्यक्रम झाल्याची आठवण सहस्रबुद्धे यांनी सांगितली. विद्यार्थ्यांसोबत त्यांनी दोन तास तबल्याविषयी संवाद साधला होता. लहान मुलांना शिकवताना ते रमून जात असेही सहस्रबुद्धे म्हणाले.
वडिलांसोबत जुगलबंदी
वडील अल्लारखाँ, शंकर महादेवन यांच्यासोबतची उस्तादांची जुगलबंदीही श्रोत्यांनी अनुभवली आहे. १९९० च्या सुमारास शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू संगीत रजनी कार्यक्रमात पद्माराजे हायस्कूलच्या मैदानातील कार्यक्रमात वडील अल्लारखाँसोबत त्यांनी जुगलबंदी सादर केली होती. त्यानंतर गायक शंकर महादेवन यांच्यासोबत एका कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. त्यानंतरही १९९५ च्या सुमारासही शाहू रजनीत ते सहभागी झाले होते. त्यांच्या दिल्ली घराण्याच्या तबल्यासोबत ते नव्या पिढीशीही जुळवून घेत, असे ठाकूरदेसाई यांनी सांगितले.