अतिवृष्टीमुळे कोल्हापुरकरांची दाणादाण, खान्देश, व-हाडातही मुसळधार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 04:04 AM2017-09-15T04:04:49+5:302017-09-15T04:05:10+5:30
वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या अतिवृष्टीने कोल्हापूरकरांची दाणादाण उडाली. बुधवारी मध्यरात्री पाऊसधारा कोसळल्या आणि थोड्यात वेळात शहर आणि परिसरात चहूबाजूंनी पाण्याचे लोंढे धडकले. पाचशेहून अधिक घरांत पाणी शिरले, तीन ठिकाणीरस्ते खचले. कितीतरी झाडे उन्मळून पडली एवढेच नव्हे तर अनेक वाहने लहान मुलाच्या खेळण्यासारखी वाहून गेली. पावसाचे हे रौद्र रुप काळजाचे धडकी भरवणारे होते.
मुंबई/ कोल्हापूर : वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या अतिवृष्टीने कोल्हापूरकरांची दाणादाण उडाली. बुधवारी मध्यरात्री पाऊसधारा कोसळल्या आणि थोड्यात वेळात शहर आणि परिसरात चहूबाजूंनी पाण्याचे लोंढे धडकले. पाचशेहून अधिक घरांत पाणी शिरले, तीन ठिकाणीरस्ते खचले. कितीतरी झाडे उन्मळून पडली एवढेच नव्हे तर अनेक वाहने लहान मुलाच्या खेळण्यासारखी वाहून गेली. पावसाचे हे रौद्र रुप काळजाचे धडकी भरवणारे होते.
कोल्हापूरात मध्यरात्री बाराच्या सुमारास धो-धो पावसाला सुरुवात झाली. दोन तास अखंड पाऊस कोसळत होता. अवघ्या काही मिनिटांत शहरातील ओढे, नाले, गटारी ओसंडून वाहायला लागले. जयंती नाला, गोमती नाला, शाम हौसिंग सोसायटी नाल्यासह अन्य छोट्या-छोट्या बारा नाल्यांनी मर्यादा सोडली आणि घरांमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली. सखल भागातील घरांना सर्वाधिक फटका बसला.
शास्त्रीनगर, मोरेवाडी, अॅस्टर आधार, रायगड कॉलनी, ज्योतिर्लिंग हौसिंग सोसायटी परिसरातील सुमारे १२ दुचाकी तसेच चारचाकी आणि रिक्षा पुराच्या पाण्यात वाहून गेली.पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर ही वाहने क्रेन व दोराच्या साहाय्याने नागरिकांनी ओढून बाहेर काढली. पाचगाव आणि जरगनगर हा रस्ता खचला. रस्त्यावर उभी असलेली दोन चारचाकी वाहने वाहून गेली.अग्निशमन दलाकडे काही तासांत २५ तक्रारी आल्या.
खान्देश, व-हाडात मुसळधार
खान्देशात भुसावळ आणि यावल येथे दुपारी मुसळधार पाऊस झाला. वेल्हाळे (ता. भुसावळ) येथे गोठ्यावर वीज पडल्याने चार म्हशी, बैलजोडीसह बकरी ठार झाली. व-हाडातही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. बुलढाणा जिल्ह्यात पावसाचा जोर होता. मराठवाड्यातील बदलापूर, परांडा, औरंगाबाद तसेच मध्य महाराष्ट्रातील पन्हाळा, बारामती, कागल, फलटण, साक्री येथेही मुसळधार पाऊस झाला.
वीज पडून चौघांचा मृत्यू
बुलडाणा जिल्ह्यात वीज पडून तीन जण मृत्युमुखी पडले. शेगाव तालुक्यातील जानोरी शिवारात काम करीत असलेल्या मीरा ढोले (२१) व रेखा लक्ष्मण वानखडे (३७) या दोघींचा अंगावर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर मोताळा तालुक्यातील रिधोरा खंडोबा येथे विशाल भागवत कानडजे (२२) हा युवक मृत्युमुखी पडला. अहमदनगर तालुक्यातील सारोळा कासार येथील राजाराम एकनाथ धामणे (४५) हे जनावरांना घेवून जात असताना वीज पडून मृत्युमुखी पडले.
लवकरच मान्सूनच्या परतीला सुरवात
पुणे : पूर्व मध्य अरबी समुद्र आणि लगतच्या कर्नाटकाची किनारपट्टी या भागात जोरदार वारे असल्याने येत्या आठवड्यातील पहिल्या काही दिवसात राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भासह केरळ, लक्ष्यद्वीप, कर्नाटक किनारपट्टी भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे़
मान्सूनच्या परतीच्या येत्या ५ -६ दिवसांत राजस्थानमधून सुरुवात होईल. आर्द्रता वाढल्यामुळे सध्या सायंकाळनंतर पाऊस पडत आहे़ २ दिवसात विदर्भात जोरदार पावसाची सुरुवात होण्याची शक्यता आहे़
- डॉ़ ए़ के़ श्रीवास्तव, वरिष्ठ हवामानशास्त्रज्ञ, पुणे हवामान विभाग
रात्रीच का पडतोय पाऊस?
दिवसभर कडक उन्ह आणि रात्री धो-धो पाऊस असे दृश्य राज्यात सर्वत्र आहे़ त्यामुळे रात्रीच इतका जोराचा पाऊस का पडतो, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे़ येत्या काही दिवसात मान्सूनचा परतीचा प्रवास राजस्थानमधून सुरु होणार आहे़ या मधल्या काळात वातावरणात आर्द्रता अधिक प्रमाणात असते पण त्याचवेळी आकाशात ढग फारसे नसतात़ त्यामुळे दिवसभर कडक उन्ह जाणवते़ त्यात आर्द्रता असल्याने घामाचा धारा लागतात़ दिवसभर जमीन तापल्याने स्थानिक पातळीवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन सायंकाळनंतर किंवा रात्री जोरदार पाऊस पडतो़