कोल्हापूरकरांचे कृतिशील दातृत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 12:32 AM2018-09-02T00:32:58+5:302018-09-02T00:33:30+5:30
पंधरा दिवसांपूर्वी केरळमध्ये अस्मानी संकट आले. गावेच्या गावे पाण्यात बुडाली. अशा आपत्तीवेळी मदतीला धावून जाण्याची कोल्हापूरची परंपरा आहे. ‘व्हाईट आर्मी’च्या माध्यमातून कोल्हापूर हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर यांनी केरळला धाव घेत दहा दिवस तेथील मदतकार्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला. त्यांनीच घेतलेला या कामाचा हा आढावा........
पंधरा दिवसांपूर्वी केरळमध्ये अस्मानी संकट आले. गावेच्या गावे पाण्यात बुडाली. अशा आपत्तीवेळी मदतीला धावून जाण्याची कोल्हापूरची परंपरा आहे. ‘व्हाईट आर्मी’च्या माध्यमातून कोल्हापूर हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर यांनी केरळला धाव घेत दहा दिवस तेथील मदतकार्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला. त्यांनीच घेतलेला या कामाचा हा आढावा........
मी कामानिमित्त गोव्यात होतो. १८ आॅगस्टला सकाळी केरळमधील भयावह परिस्थिती टीव्हीवरून पाहिली. ‘व्हाईट आर्मी’च्या अशोक रोकडेंना फोन लावला. काडसिद्धेश्वर मठामध्येही संपर्क साधला. रिकाम्या हातांनी जाऊन उपयोग नव्हता. अमोल कोरगावकरांनी रुग्णवाहिका दिली. चालक विशाल, सचिन भोसले, सुधाकर लोहार, सुरेश लोखंडे त्याच दिवशी गोव्यात आले. गाडीत पिण्याच्या पाण्यापासून ते धान्य, सिलिंडरसह सर्व साहित्य घेतले आणि रुग्णवाहिकेतूनच
१९ आॅगस्टला पहाटे केरळकडे रवाना झालो.
तिथली आम्हाला काहीच माहिती नव्हती. उद्योगपती सचिन मेनन हे मूळचे केरळचे. त्यांनी आणि गायत्री मेनन यांनी त्यांच्या सर्कलमधून माहिती मिळवली आणि आम्ही केरळपर्यंत पोहोचेपर्यंत ते आम्हाला दिशादर्शन करू लागले. तामिळी चित्रपट दिग्दर्शकाची वेदा ही मुलगीही आम्हाला नेमकी माहिती पुरवत होती. त्यानुसार आम्ही २० आॅगस्टला पहाटे केरळमध्ये आलुवा या ठिकाणी पोहोचलो. तेथील एका कॉलेजवर गेलो. तेथून आम्हाला आलप्पी जिल्ह्यातील चेंगनूर येथे जाण्यास सांगण्यात आले. तेथे आम्हाला पुण्याचा तिसन क्रूप हागट सामील झाला. नेमकं कामरेस्क्यू, मेडिकल किंवा रिलिफ कशामध्ये करायचं, हे आम्हाला माहिती नव्हतं.हरिपाड्याच्या पुढं असलेल्या कायमकुलम् येथील हरिकृ ष्ण मठातील स्वामींना भेटण्यास सांगण्यात आले.
तिथल्या अनाथाश्रम, आदिवासी आश्रमामध्ये आमची व्यवस्था झाली. तेथून जवळच असलेलं वायपीन हे गाव पूर्ण बाधीत झाले होतं. या परिसरातील शाळा, सांस्कृतिक हॉलमध्ये कॅम्प लावण्यात आले होते. पुण्याच्या टीममध्ये इंजिनिअर आणि मल्याळी बोलणारे दोघेजण होते. त्यामुळे काम करणे सोपे गेले. २०ला रात्री कोल्हापूर जनरल प्रॅक्टिशनर्सचे डॉक्टर, स्वयंसेवक औषधांसह दाखल झाले.
अशा परिस्थितीत तेथील स्थानिक शासकीय कर्मचारीही त्यांची घरे पुरात असल्याने हवालदिल झाले होते. आम्ही तातडीने जिथे जिथे कॅम्प सुरू आहेत तिथे आरोग्य तपासणी सुरू केली. एक टेबल डॉक्टरचे, एक औषधे देणाऱ्याचे असे करून शिस्तबद्ध पद्धतीने काम सुरू केले. दिवसाला सरासरी ६00/७00 रुग्ण तपासण्याचे काम आठ दिवस सुरू होते. बॅकवॉटरमुळे अनेक खेडेगावांमध्ये मदतच पोहोचली नव्हती. तिथल्याच बोटी घेऊन आम्ही अन्न, धान्य, कपडे, औषधे त्या गावांपर्यंत पोहोचवली.
जसजसे पाणी उतरायला सुरुवात झाली तसे कामाचे स्वरूप बदलले. आरोग्य तपासणीकडील स्वयंंसेवक कमी करून गावागावांत स्वच्छता सुरू केली. रस्ता मोकळा कर, घरातील साहित्य बाहेर काढून देणे असे काम सुरू केले. स्थानिक पोलिसांनी हे काम पाहून आमच्याबरोबर काही पोलीसही दिले. शेवटचे तीन दिवस आम्ही मुक्काम हलवला आणि तिसवला येथील गोशाळेत राहून कामाला सुरुवात केली. या परिसरातील जनावरांसाठी कोल्हापूरहून २० टन चारा आणि पशूखाद्यही पाठवण्यात आले होते.
ओणमच्या आदल्या दिवशी धान्य पोहोचविले घरोघरी
केरळमध्ये ओणम सणाला मोठे महत्त्व. मात्र, घरोघरी किराणा साहित्याचा अभाव. तोपर्यंत सिद्धगिरी मठाकडून एकू ण ४०० टन साहित्य तेथे पोहोचले होते. त्यामध्ये तांदूळ, साखर, गहू, रवा, सॅनिटरी नॅपकिन, नवीन कपडे, ब्लँकेट यांचा समावेश होता. या सगळ्याचे स्थानिकांच्या सहकार्याने आम्ही मोठ्या प्लास्टिक पिशव्यांचे पॅकेटस् तयार केले आणि सुमारे ७५ किलोमीटरच्या गावांमध्ये ही पॅकेटस् पोहोचविण्यात आली. त्यांच्या सणाच्या आधी आम्ही पूरग्रस्तांच्या घरांमध्ये अन्नधान्य पोहोचवू शकलो, याचे मोठे समाधान आम्हाला मिळाले.
स्थानिकांचेही मोठे सहकार्य
आम्ही एकीकडे आरोग्य तपासणी करत असताना कोल्हापूरहून आणलेली औषधे वितरित केली. नंतर रोज लागतील ती औषधे मग तेथील सरकारी इस्पितळातून आम्हाला पुरवण्यात येऊ लागली. कस्तुरी रोकडे दुसºया दिवशी कोणती औषधे लागणार याची यादी करत असे. तर बेळगावला फार्मसी शिकलेले गृहस्थ त्या इस्पितळात होते. ते दुसºया दिवशी ही औषधे आम्हाला पुरवत असत.
त्वचा मलमापासून पावडरपर्यंत पुरवठा
या ठिकाणी अनेकांना तासन् तास पाण्यात रहावे लागल्याने त्यांच्या त्वचेला खाज सुटणे, त्वचा कुजणे असे प्रकार सुरू झाले होते. तिथे कुठे मलमही मिळत नव्हते. कोल्हापुरातून त्वचा मलम, पावडर सर्व साहित्य आल्याने येथील पूरग्रस्तांना त्याचे वाटप करण्यात आले.
बाटलीबंद पाण्यामुळे आजार नाहीत
केरळमधील या पुरानंतर चोहोबाजुंनी जी मदत आली त्यामध्ये बाटलीबंद पाणी प्रचंड प्रमाणात पाठवण्यात आले होते. त्यामुळे आमच्यासह सर्व स्थानिकांना हेच पाणी पिण्यासाठी दिले जात होते. परिणामी, दूषित पाण्यामुळे होणारे आजार येथे फार झाले नाहीत, हे देखील मोठे यश म्हणावे लागेल.
- शब्दांकन : समीर देशपांडे