कोल्हापूरकरांचे कुस्तीवर जिवापाड प्रेम

By admin | Published: November 18, 2014 10:26 PM2014-11-18T22:26:07+5:302014-11-18T23:35:11+5:30

योगेश्वर दत्त : प्रशिक्षक करजगार यांच्या कुस्ती छायाचित्र संग्रहाने दत्त प्रभावित

Kolhapurkar's wrestling love affair | कोल्हापूरकरांचे कुस्तीवर जिवापाड प्रेम

कोल्हापूरकरांचे कुस्तीवर जिवापाड प्रेम

Next

कोल्हापूर : कोल्हापुरात कुस्ती मोठ्या प्रमाणात खेळली जाते हे माहीत होते. मात्र, येथील लोक कुस्तीवर इतके जिवापाड प्रेम करतात हे माहीत नव्हते, अशा भावना आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू योगेश्वर दत्त याने व्यक्त केल्या. योगेश्वर दत्त काल, सोमवारी आॅलिम्पिक गोल्ड क्वेस्ट (ओजिक्यू)तर्फे आयोजित कार्यक्रमासाठी कोल्हापुरात आला होता. आज, मंगळवारी कुस्ती प्रशिक्षक मुकुंदराव करजगार यांच्या घरी भेट दिली तेव्हा त्यांच्या घरातील कुस्तीच्या छायाचित्रांचा संग्रह पाहून त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
पुणे येथे होणाऱ्या कार्यक्रमाला जाण्याआधी योगेश्वरने आपल्या निवडक मित्रांसोबत सकाळी सात वाजता अंबाबाईचे दर्शन घेऊन करजगार यांच्या उद्यमनगर येथील घरी भेटीसाठी गेला. यावेळी योगेश्वर करजगार भेटल्यावर म्हणाला, माझ्या अनेक मित्रांनी तुमच्याबद्दल मला सांगितले होते. तुम्हाला खूप दिवसांपासून भेटण्याची इच्छा होती, ती इच्छा आज पूर्ण झाली. यावेळी करजगार यांनी त्याला आपल्या घरातील कुस्तीच्या छायाचित्रांचा संग्रह दाखविला. हे सर्व पाहून तो आणखीच भारावून गेला. या संग्रहातून मला कुस्ती खेळण्यासाठी आणखी प्रेरणा मिळाली आहे. तुमच्या संग्रहाचे मोल नाही. कोल्हापुरातील लोक कुस्तीवर जिवापाड प्रेम करतात हे येथे आल्यानंतर समजले, अशी भावना योगेश्वरने व्यक्त केली.
यावेळी प्रशिक्षक मुकुंदराव करजगार यांनी कुस्तीसम्राट युवराज पाटील यांचे तैलचित्र योगेश्वरला देऊन त्यांचा कोल्हापुरी फेटा बांधून सत्कार केला. यावेळी सरदार पाटील, उदय पाटील, संतोष पाटील, सागर पाटील, राजू करजगार, गणेश करजगार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)


कोल्हापुरात मंगळवारी राष्ट्रीय कुस्तीपटू योगेश्वरचा कुस्तीसम्राट युवराज पाटील यांचे तैलचित्र देऊन सत्कार करताना कुस्ती प्रशिक्षक मुकुंदराव करजगार, शेजारी सरदार पाटील, उदय पाटील, आदी.

योगेश्वरने कुस्तीमध्ये भारताचा नावलौकिक केला आहे. कुस्तीपंढरीत या कुस्तीवीराचे जंगी स्वागत करण्याची तयारी कुस्ती प्रशिक्षक मुकुंदराव करजगार यांनी केली होती. त्यानुसार नियोजित वेळेप्रमाणे मंगळवारी करजगार यांच्या घरी योगेश्वर भेटीसाठी सकाळी नऊ वाजता येणार होता. तो आल्यानंतर हत्तीवरून मिरवणूक काढण्याचा मानस करजगार यांनी आखला होता. त्यानुसार त्यांनी हत्तीसुद्धा सांगून ठेवला होता. मात्र, योगेश्वर नेमका सकाळी साडेसात वाजता भेटीसाठी आला. सकाळी अर्धा तास त्यांच्या घरी थांबून तो गेला आणि काही वेळानंतर हत्ती आला. त्यामुळे हत्तीवरून त्याची मिरवणूक काढण्याची कुस्तीप्रेमींची इच्छा अपूर्णच राहिली.

Web Title: Kolhapurkar's wrestling love affair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.