कोल्हापूरच्या अमोलची एकाच मोहिमेत बारा सुळक्यांवर यशस्वी चढाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 11:54 AM2021-02-23T11:54:12+5:302021-02-23T11:57:27+5:30
fort kolhapur- कोल्हापुरातील एस. टी. महामंडळाच्या संभाजीनगर आगारात वाहक असलेल्या अमोल आळवेकर यांनी पाच दिवसांच्या मोहिमेत पालघर जिल्ह्यातील खोडकोना-मेंढवण जवळच्या (केएम) या बारा सुळक्यांच्या समूहावर यशस्वी चढाई केली.
कोल्हापूर : कोल्हापुरातील एस. टी. महामंडळाच्या संभाजीनगर आगारात वाहक असलेल्या अमोल आळवेकर यांनी पाच दिवसांच्या मोहिमेत पालघर जिल्ह्यातील खोडकोना-मेंढवण जवळच्या (केएम) या बारा सुळक्यांच्या समूहावर यशस्वी चढाई केली.
खोडकोना-मेंढवण सुळके समूह हा अशेरी गडासमोर व अडसूळ सुळक्यांमध्ये आहे. या सर्व सुळक्यांच्या एका बाजूला खोडकोना, तर दुसऱ्या बाजूला मेंढवण आहे. त्यामुळे सुळक्यांना खोडकोना-मेंढवण अर्थात केएम नावाने ओळखले जाते. या समूहात नऊ सुळके असून, पैकी पाच सुळके खोडकोना गावाकडील बाजूला, तर चार सुळके मेंढवणच्या बाजूला आहेत. त्यांची आरोहण उंची दीडशे फूट इतकी आहे.
या समूहाजवळ अडसूळ हा सुळका असून, त्याची उंची शंभर फूट आहे. त्याच्या शेजारी वाचाढुक सुळका असून, त्याचीही उंची शंभर फूट आहे. खोडका गावापासून तीस किलोमीटरवर महालक्ष्मी सुळका असून, त्यांची उंची १२० फूट आहे. या सर्व बारा सुळक्यांवर अमोल यांनी दिनांक १४ ते १८ फेब्रुवारी दरम्यान यशस्वी चढाई केली.
त्यांनी क्लायम्बिंगमधील क्रॅक क्लायम्बिंग, ट्रिव्हासींग, ओव्हर हँग, अशीवल, चिमणी क्लायम्बिंग या गिर्यारोहणातील तंत्राचा वापर केला. सर्वच सुळके घसरणीचे असल्याने सावधगिरीने अमोल यांनी हे सर्व आरोहण केले. त्यांच्यासोबत या मोहिमेत अरविंद नेवले, मंगेश कोयडे यांनीही सहभाग घेतला होता.