कोल्हापुरच्या बहाद्दर पोलिसांचा महासंचालकांचे हस्ते सत्कार-- किणी टोलनाका चकमक थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 06:17 PM2020-02-03T18:17:39+5:302020-02-03T18:23:39+5:30
किणी टोल नाक्यावर २८ जानेवारीला रात्री राजस्थान येथील कुख्यात बिष्णोई टोळीतील तीन गुंडांना जेरबंद केल्याबद्दल पोलीस कर्मचाऱ्यांवर सर्वस्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत व त्यांच्या टीमने जिगरबाज कामगिरी करून कोल्हापूर पोलीस दलाची शान वाढविली.
कोल्हापूर : किणी (ता. हातकणंगले) येथील टोल नाक्यावर धाडसाने व प्राणाची बाजी लावून राजस्थान येथील गुंडांशी दोन हात करणाऱ्या कोल्हापूर दलातील बहाद्दर पोलिसांचा सोमवारी राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायसवाल यांच्या हस्ते मुंबईत सत्कार झाला. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत, सहायक निरीक्षक किरण भोसले, प्रशांत निशाणदार, कॉन्स्टेबल नामदेव यादव, पांडुरंग पाटील आणि रणजित कांबळे या शिलेदारांनी जिवाची बाजी लावली.
किणी टोल नाक्यावर २८ जानेवारीला रात्री राजस्थान येथील कुख्यात बिष्णोई टोळीतील तीन गुंडांना जेरबंद केल्याबद्दल पोलीस कर्मचाऱ्यांवर सर्वस्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत व त्यांच्या टीमने जिगरबाज कामगिरी करून कोल्हापूर पोलीस दलाची शान वाढविली. या आॅपरेशनमधील बहाद्दर पोलिसांना पोलीस महासंचालक जायसवाल यांनी निमंत्रण केले होते. त्यानुसार सोमवारी मुंबईतील महासंचालक कार्यालयात पथकाचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले, संतोष पोवार, किरण भोसले, नामदेव यादव, पांडुरंग पाटील, सुनील इंगवले, संतोष माने, रणजित कांबळे, सुजय दावणे, सुभाष नरुटे, वैभव पाटील, सुरेश पाटील, रवी कांबळे, रमेश ठाणेकर, मच्छिंद्र पटेकर, समीर मुल्ला, दादासाहेब माने, नरसिंग कुंभार, अमरसिंह वासुदेव, सुरेश गायकवाड, प्रशांत निशानदार, चंदू नणवरे, नितीन चोथे आदींचा समावेश होता.
राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायसवाल यांच्या हस्ते आमचे पथकाचा झालेला गौरव आम्हाला प्रेरणा देणारा आहे.
-तानाजी सावंत : पोलीस निरीक्षक